नागेट्टा : नगेट्ट लॅ. गॉर्डोनिया ऑब्च्यूसा कुल-थीएसी). ह्या उंच सदापर्णी वृक्षाचा प्रसार पश्चिम घाटात कोकणापासून खाली दक्षिणेस, तमिळनाडूत, निलगिरीच्या पूर्वेस रुक्ष भागात, त्रावणकोरमध्ये व समुद्रसपाटीपासून ७५०–२,२५०मी. उंचीपर्यंत आहे. याची साल तपकिरी व गुळगुळीत असून पाने एकाआड एक, साधी, अरुंद, लांबट, गुळगुळीत व आखूड देठाची असतात. सु. ४सेंमी. व्यासाची पांढरी फुले एकाकी व जून–सप्टेंबरात येतात. संदले पाच, प्रदले पाच व खाली किंचित जुळलेली आणि बाहेरून लवदार असतात. केसरदले असंख्य व अंशतः पंचसंघ (पाच झुबक्यांत) किंजपुट ३–५कप्प्यांचा [→फूल]. बोंडलांबट, ३सेंमी. व पंचकोनी बिया चपट्या, तिरप्या व टोकास पंखधारी असतात. इतर सामान्य लक्षणे ⇨थीएसी कुलात (चहा कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. फुले असताना हा वृक्ष सुंदर दिसतो. याच्या पानांचा फांट (थंड पाण्यात भिजवून काढलेला अर्क) उत्तेजक व दीपक (भूक वाढविणारा) असतो. लाकूड कठीण, जड, लवचिक आणि तांबूस पांढरे असून सुतारकामास चांगले असते परंतु बाक येण्याचा संभव अधिक. घरबांधणीत फळ्या, वासे व तुळ्यांसाठी वापरतात. पानांची चहात भेसळ करतात किंवा ती चहाऐवजी वापरतात.
जमदाडे, ज. वि.
“