नागकुडा: (पांढरा कुडा क. नागर कुडा लॅ. टॅबर्निमोंटॅना हेनियाना, एर्व्हाटॅमिया हेनियाना कुल-ॲपोसायनेसी). सु. ३–९ मी. उंचीच्या या चिकाळ झुडपाचा किंवा लहान पानझडी वृक्षाचा प्रसार कोकणापासून दक्षिणेस त्रावणकोरपर्यंत व समुद्रसपाटीपासून सु. ९३० मी. उंचीपर्यंत खुल्या जंगलात आहे. साल करडी व खरबरीत पाने साधी, संमुख (समोरासमोर), ७–२० X २·५ – ७·५ सेंमी., चिवट, लांबट व कुंतसम (भाल्यासारखी) यातील मुख्य शिरांच्या १२–१६ जोड्या. फुले पांढरी तगरीसारखी पण एकेरी पाकळ्यांची, मार्च-एप्रिलमध्ये वल्लरीत येतात. पेटिकाफळे सु. २·५ सेंमी. लांब, पक्व झाल्यावर शेंदरट पिवळी व काहीशी वाकडी असून त्यांत लाल अध्यावरणयुक्त (बीजावरील विशिष्ट वाढीने युक्त) २–३ बिया असतात. या वनस्पतीची सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ ॲपोसायनेसी कुलात (करवीर कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. बुबुळाच्या दाहावर फुलांचा उपयोग करतात. नागकुड्याचे इतर उपयोग साधारणपणे तगरीप्रमाणे असतात [→ तगर–२].
जमदाडे, ज. वि.