नाकतोडा: ऑर्थॉप्टेरा गणातील ॲक्रिडिडी व टेट्टिगोनिडी कुलांमधील कीटकांना सामान्यतः नाकतोडे असे म्हणतात. ॲक्रिडिडी कुलातील नाकतोड्यांच्या शृंगिका (सांधेयुक्त स्पर्शेंद्रिये) आखूड असून त्यांच्या जातींची संख्या सु. ५,००० आहे. टेट्टिगोनिडी कुलातील नाकतोड्यांच्या शृंगिका लांब असून त्यांच्या जाती ४,००० च्या जवळपास आहेत. हे दोन्ही प्रकारचे नाकतोडे मुख्यत्वेकरून उष्ण व समशीतोष्ण कटिबंधांत आढळून येतात. हे कीटक विविध रंगांचे असून काळसर, पिवळे, वाळलेल्या गवताच्या रंगाचे किंवा शरीरावर रंगीत पट्टे असलेले सामान्यतः आढळतात. त्यांच्यापैकी बहुतेक सर्व कीटकांना पूर्ण वाढलेल्या, चामड्यासारख्या लवचिक पंखांच्या दोन जोड्या असतात परंतु काही पंखहीन किंवा नाममात्र पंख असलेले असे असतात. त्यांची मुखांगे (तोंडातील अवयव) चर्वणास उपयुक्त असून त्यांच्या शेवटच्या पायांची जोडी उडी मारण्यासाठी रूपांतरित झालेली असते. ह्या दोन्ही कुलांपैकी ॲक्रिडिडी कुलातील बरेच नाकतोडे निरनिराळ्या पिकांवरील किडी असून त्यांच्यामुळे पिकांची दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हानी होते. त्यांपैकी भारतात खुरपाडी, बिनपंखी नाकतोडा, पट्टेदार नाकतोडा, भातावरील नाकतोडा इ. नाकतोडे पिकांची हानी करतात. यांशिवाय पिकांचा संपूर्ण नाश करणारे व जागतिक दृष्ट्या महत्त्वाचे वाळवंटी टोळही ह्याच कुलात येतात [→ टोळ]. वाळवंटी टोळ हा देखील नाकतोड्याचाच एक प्रकार आहे. फरक एवढाच की, ते प्रचंड संख्येने दूरदूर जाऊन उभ्या पिकांचा फडशा पाडतात. आखूड शृंगिका असलेले नाकतोडे अंडनिक्षेपकाच्या (अंडी घालावयाच्या साधनाच्या) साहाय्याने जमिनीत अंडी घालतात. अंडी घालण्यासाठी पडीत जमिनी, माळराने अथवा शेताचे बांध अशा जागा ते निवडतात. पावसाळ्यात अंड्यांतून लहान डिंभ किंवा अर्भके (अळ्या) बाहेर पडून ती सुरुवातीस गवतावर उपजीविका करतात. डिंभ थोडे मोठे झाले म्हणजे ते पिकांवर आक्रमण करतात. प्रौढावस्था प्राप्त होण्यासाठी ह्या कीटकांना साधारणतः ५–६ आठवडे लागतात.
टेट्टिगोनिडी कुलातील नाकतोडे मांसाहारी अथवा सर्वभक्षी असतात. भारतामध्ये ह्या कीटकांना कीड म्हणून महत्त्व नाही. हे कीटक प्रायः झुडपासारख्या झाडांवर आढळून येतात. मादीस खुरप्याच्या वा तलवारीच्या आकाराचा लांब अंडनिक्षेपक असतो. त्याच्या साहाय्याने मादी झाडांच्या पेशीत अंडी घालते. हिवाळ्यानंतर अंड्यांतून अर्भके बाहेर पडून ती ५–६ आठवड्यांत पहिल्या प्रकारच्या नाकतोड्यांप्रमाणेच प्रौढावस्थेत जातात. साधारणतः वर्षातून नाकतोड्याची एकच पिढी तयार होते.
नाकतोड्याच्या अंड्यांवर हिंगे नामक कीटकांच्या जमिनीतील अळ्या उपजीविका करीत असल्यामुळे नाकतोड्याच्या संख्यावाढीस थोडाफार आळा बसतो. यांशिवाय काही कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती) व सूक्ष्मजंतूंमुळेही नाकतोड्यांच्या अंड्यांचा नाश होतो. पिकांवर रासायनिक कीटकनाशकांचे फवारे मारून उपद्रवी नाकतोड्यांचा नाश करता येतो.
पहा : टोळ.
जमदाडे, ज. वि.
“