नवसागर: अमोनियम क्लोराइड, अमोनियम म्यूरिएट आणि साल अमोनियाक या नावांनीही नवसागर ओळखला जातो. आयुर्वेदामध्ये नवसागराला चूलिका लवणं (क्षार) म्हटले आहे. रेणवीय सूत्र NH4Cl. नवसागर प्राचीन काळापासून लोकांना माहीत आहे. ईजिप्तमध्ये पूर्वी उंट, घोडे, मेंढ्या इ. जनावरांच्या विष्ठेपासून ऊर्ध्वपातनाने (तापवून घटक द्रव्ये अलग करण्याच्या क्रियेने) नवसागर तयार करीत असत. इ. स. १६२० मध्ये अँजेलस सेला यांनी अमोनिया व हायड्रोक्लोरिक अम्ल यांच्यापासून प्रथम कृत्रिम रीतीने नवसागर तयार केला. मीठ तयार केल्यावर उरलेल्या द्रवात कित्येक दिवसांचे शिळे मूत्र मिसळून त्याच्यापासून नवसागर तयार करण्याचा कारखाना गुडविन यांनी अठराव्या शतकात काढला होता. पंजाबमधील काही खेड्यांत ‘पझवास’ नावाच्या विटा भाजण्याच्या भट्टीच्या थंड भागापासून अशुद्ध नवसागर मिळविला जातो. या भट्टीत विटा भाजण्यासाठी शेण वापरतात. असा नवसागर शुद्ध करून मग विकण्यात येतो.

निर्मिती: ज्वालामुखींच्या जवळपासच्या भागात नवसागर नैसर्गिक रीत्या आढळतो. हायड्रोक्लोरिक अम्ल व अमोनिया वायू यांच्या पासून शुद्ध नवसागर मिळतो. अमोनियम सल्फेट आणि सोडियम क्लोराइड यांचा जलीय विद्राव तापविला म्हणजे सोडियम सल्फेट वेगळे होते व नवसागर विरघळलेल्या रूपात विद्रावात राहतो. या विद्रावापासून स्फटिकीकरणाने नवसागर वेगळा करून शुद्ध करतात. सॉल्व्हे पद्धतीने धुण्याचा सोडा बनविताना उपपदार्थ म्हणून नवसागर मिळतो [→ सोडा ॲश]. वापरानुसार नवसागराच्या प्रती ठरविल्या जातात.

गुणधर्म: शुद्ध नवसागर शुभ्र रंगाचा, तंतुमय संरचनेचा स्फटिकी पदार्थ असतो. हा गंधहीन, खारट व थोडासा चिघळणारा असून पाण्यात सहजपणे विरघळतो. हा पाण्यात विरघळला असता पाण्याचे तापमान कमी होते. याचा पाण्यातील विद्राव अम्लधर्मी असून त्याचा लोह, तांबे इ. धातूंवर परिणाम होतो. साठवणीत असताना व उघडा राहिल्यास नवसागरातून अमोनिया निघून जातो. नवसागराचे वि.गु. १·५२६ असून ३४०° से. तापमानाला त्याचे संप्लवन (घनरूपातून एकदम वायुरूपात जाण्याची क्रिया) होते. या वेळी याचे अंशतः अपघटन (लहान घटकांत तुकडे होण्याची क्रिया) होते व ३५०° से. तापमानाला त्याचे ८३% अपघटन होते.

उपयोग: गॅल्व्हानीकरण (जस्ताचा मुलामा देणे), रंजनक्रिया, कॅलिको छपाई इत्यादींमध्ये नवसागराचा उपयोग होतो. तसेच विद्युत् घट (शुष्क घट) निर्मितीत, विद्युत् विलेपनात आणि डाखकाम व कल्हई (कथिलाच्छादन) यांमध्ये अभिवाह (एखादी धातू कमी तापमानाला वितळावी म्हणून वापरण्यात येणारा पदार्थ) म्हणूनही नवसागर वापरला जातो. खोकल्यावरील, मूत्रल (लघवी साफ होण्यासाठी घ्यावयाच्या) व कफोत्सारक (कफ काढून टाकणाऱ्या) औषधांत तसेच नाकाने ओढावयाच्या औषधांतही नवसागराचा उपयोग होतो. रंजके, लोहयुक्त सिमेंट, अमोनियाची इतर लवणे इत्यादींच्या निर्मितीत नवसागर वापरतात. खत म्हणूनही नवसागर वापरतात व अशा नवसागरात २४% नायट्रोजन असतो. हे खत कंदमुळापेक्षा तृणधान्यांना अधिक मानवते परंतु जेथे पोटॅशियम क्लोराइड हे खत वापरतात, तेथे नवसागराचा खत म्हणून उपयोग होत नाही.

कारेकर, अ. न.