ध्वन्यालोक : अलंकारशास्त्राच्या इतिहासात ⇨आनंदवर्धन हा युगप्रवर्तक ग्रंथकार होऊन गेला. ध्वन्यालोक हा ग्रंथ लिहून त्याने साहित्यचर्चेला जे वळण लावले ते उत्तरकाली मान्य झाले. आनंदवर्धन काश्मीरचा असून काश्मीरचा राजा अवंतिवर्मा याच्या विद्वत्सभेत होता. अवंतिवर्म्याचा काळ इ. स. ८५५ ते ८८३ आहे. तेव्हा आनंदवर्धनाचे लेखनकार्य नवव्या शतकाच्या मध्यात चालू होते, असे मानावयास हरकत नाही. आनंदवर्धन हा कवी, तत्त्वज्ञ आणि साहित्यमीमांसक होता. अर्जुनचरित हे संस्कृत महाकाव्य, विषमबाणलीला हे प्राकृत काव्य देवीशतक हे स्तोत्र, तत्त्वालोक व धर्मोत्तमाविवृत्ति हे दार्शनिक ग्रंथ आणि ध्वन्यालोक हा साहित्यशास्त्रीय ग्रंथ अशी त्याची ग्रंथसंपत्ती आहे. यात आनंदवर्धनाचे नाव चिरस्थायी झाले ते ध्वन्यालोकामुळेच.
कारिका, वृत्ती आणि उदाहरणे असे ध्वन्यालोकाचे स्वरूप आहे. उदाहरणे प्रसिद्ध काव्यनाटकांतून घेतली आहेत. वृत्ती आनंदवर्धनाची आहे. कारिकांच्या बाबतींत मात्र अभ्यासकांत मतभेद दिसतात. कारिकांचा लेखक आनंदवर्धनाहून वेगळा आहे, असे कित्येक मानतात तर कारिका आणि वृत्ती या दोहोंचाही लेखक आनंदवर्धनच आहे असे दुसरे काही मानतात. कसेही असो, उत्तरकाली मात्र ध्वनिकार म्हणून आनंदवर्धनच प्रसिद्ध झाला आणि कारिका व वृत्ती या दोहोंचेही संदर्भ त्याच्याच नावावर देण्याची प्रथा पडली.
ध्वन्यालोक ह्या ग्रंथाचे चार उद्योत आहेत. ‘काव्यस्यात्मा ध्वनिः’ या प्रसिद्ध वाक्याने ग्रंथाचा आरंभ होतो. रसिकाला आकृष्ट करणाऱ्या काव्यार्थात दोन अंश आढळतात. एक वाच्यार्थ आणि दुसरा प्रतीयमान. वाच्यार्थ हा उपमादिक अलंकारांच्या रूपात प्रकट होतो. या वाच्यार्थाहून वेगळ्या असा जो अर्थ महाकवींच्या काव्यांत रसिकांना प्रतीत होतो तो प्रतीयमान होय. हा प्रतीयमानच काव्याचा आत्मा आहे. काव्यातून प्रतीयमान जेव्हा प्राधान्याने अवभासित होतो, तेव्हा तो ध्वनी होय.
ध्वनीला स्वतंत्र स्थान द्यावयास काही आलंकारिक अनुकूल नव्हते. ध्वनी म्हणून वेगळी अशी वस्तू नाहीच, असे कित्येक म्हणत ध्वनी असला तरी तो लक्षणेतच अंतर्भूत होतो असे दुसरे कित्येक म्हणत, तर तो स्वतंत्रपणे जाणवत असला, तरी त्याचे निर्वचन करता येत नाही असे तिसरे कोणी म्हणत. या सर्व आक्षेपकांचे समाधान करून आनंदवर्धनाने प्रथमोद्योतात ध्वनीचे सामान्य लक्षण केले आहे. द्वितीयोद्योतात ध्वनिप्रभेदांचे व्यङ्ग्यमुखाने विवेचन करून रसभावस्वरूप असंलक्ष्यक्रमध्वनीच्या संदर्भात रसवत्, गुण, अलंकार इ. काव्यांगांची व्यवस्था लावली आहे. तृतीय उद्योतात व्यंजकमुखाने ध्वनिविवेचन करून पद, वाक्य, प्रकरण, प्रबंध, रीती, वृत्ती हे सर्व रसादींचे अभिव्यंजक कसे होतात, हे दाखविले आहे आणि शेवटी ध्वनी, गुणीभूतव्यंग्य आणि चित्र या काव्यप्रकारांची उपपत्ती लावली आहे. चौथ्या उद्योतात काव्याचे प्रधान कारण जी प्रतिभा तिचे वर्णन असून प्रतिभेच्या बळावर महाकवी जुन्या गोष्टींनासुद्धा नवीन रूप कसे देतात हे दाखविले आहे व अखेर सत्कवीने शब्दचमत्कृतीच्या मागे न लागता रसभावयुक्त काव्यच निर्माण करावे, असे सांगितले आहे. आनंदवर्धनाने अशा प्रकारे सर्व काव्यांगांची व्यवस्था लावून काव्यचर्चेला योग्य वळण लावले म्हणून जगन्नाथपंडिताने आलंकारिकांच्या सरणीचा व्यवस्थापक म्हणून त्याचा गौरव कैला आहे.
ध्वनिविवेचन आनंदवर्धनाने केलेले असले, तरी ध्वनिविचार हा त्याच्या पूर्वीचा आहे. या विचाराचा उगम स्फोटवादात आहे असे ग्रंथकारच सांगतो. भामह, उद्भट, वामन यांनाही ध्वनीची कल्पना आली होती पण त्यांचे ते स्फुरण अस्फुट होते. आनंदवर्धनाने ते स्फुटतेने विवेचित करून शास्त्रीय आधारावर प्रतिष्ठित केले.
ध्वन्यालोकावर ⇨ अभिनवगुप्ताचीलोचननामक टीका आहे. आलंकारिकांच्या क्षेत्रात लोचन टीकेला मूळ ग्रंथाइतकेच महत्त्व प्राप्त झाले. किंबहुना टीकेच्या मिषाने अभिनवगुप्ताने स्वतंत्र प्रबंधच लिहिला आहे, असे म्हणण्याइतपत त्या टीकेला महत्त्व लाभले आहे.
काव्याचे काव्यत्व किंवा काव्यसौंदर्य नेमके कशात आहे, याचा विचार काव्यशास्त्राला अभिप्रेत आहे. या विचारात अलंकार, गुण, रीती इ. तत्त्वे पुढे आली पण ही तत्त्वे काव्यशरीराच्या, म्हणजे आविष्काराच्या, सौंदर्याची गमके म्हणून मानता आली, तरी ती काव्याच्या आत्म्यापर्यंत, म्हणजे आशयापर्यंत, पोहोचतात असे वाटले नाही. आविष्करणाच्या सौंदर्यापासून आशयगत सौंदर्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात असे लक्षात आले, की भावोत्कट अनुभव हा सौंदर्यपूर्ण असतो. त्याला शब्दरूप देताना काही वेळेस अगदी सरळ, अनलंकृत रूप येईल काही वेळेस आविष्कारातही चमत्कृती येईल पण ही आविष्काराची चमत्कृती आनुषंगिक होय. म्हणूनच काव्यरूप आविष्कारात समग्र अलंकारवर्ग, गुण-रीती इ. साहाय्यरूप होतात, गौण ठरतात. काव्याची आस्वाद्यता मुळात भावोत्कट अनुभूतीची असते आणि ही अनुभूती काव्यामध्ये सूचकपणानेच प्रकट झालेली असते. या विचारात भावोत्कट आशयाच्या रूपाने भरताची रससंकल्पना आलेली आहे आणि अनुभूतीची सूचकता हे व्यंजनाव्यापाराचे तसेच ध्वनीचे तत्त्व आहे. या विचारसरणीने काव्यसौंदर्याचा शोध घेण्याची दृष्टीच बदलली आणि आस्वादालाही घनता आली. आनंदवर्धन आणि त्याचा मातबर टीकाकार अभिनवगुप्त हे काव्यशास्त्राच्या चर्चेत युगप्रवर्तक ठरले, ते त्यांनी ही विचारसरणी शास्त्रीय पद्धतीने दृढमूल केली म्हणून.
‘काशी संस्कृत सीरीझ’ मध्ये ध्वन्यालोक हा ग्रंथ अभिनवगुप्ताच्या लोचन ह्या टीकेसहित प्रसिद्ध झालेला आहे (१९४०). हिंदीमध्येही ध्वन्यालोक अनुवादिला गेला आहे. त्याच्या मराठी अनुवादाचा प्रथम खंड १९७४ मध्ये प्रकाशित झाला. डॉ. कृष्णमूर्ती ह्यांनी ध्वन्यालोकाचा इंग्रजी अनुवाद केला आहे. (१९७४).
देशपांडे, ग. त्र्यं.