धृतराष्ट्र : कौरवांचा सम्राट व दुर्योधन, दुःशासनादी शंभर कौरवांचा पिता. भीष्माचार्यांच्या देखरेखीखाली त्याचे शिक्षण झाले. गांधारदेशाचा राजा सुबल याची मुलगी गांधारी हिच्याबरोबर त्याचा विवाह झाला. गांधारीपासून त्याला दुर्योधन, दु:शासन इ. शंभर मुलगे व दुःशला नावाची मुलगी झाली. पंडू राजा वनात निघून गेल्यामुळे धृतराष्ट्र हा हस्तिनापूरचा राजा झाला. त्याने पंडूचा मुलगा युधिष्ठिर याला युवराजपद दिले. त्यामुळे धृतराष्ट्राचे मुलगे व पांडव यांच्यात कायमचे वैर निर्माण झाले. पांडवांबद्दल त्याच्या मनात द्वेष नसला, तरी दुर्योधनाच्या आहारी जाण्याचा कमकुवतपणा त्याच्या ठायी होता. भीष्म, विदुर यांच्या आग्रहाने धृतराष्ट्राने युधिष्ठिरास अर्धे राज्य दिले. द्यूतात पांडवांना जिंकण्याच्या कपटकारस्थानास त्याने मूक संमती दिली. वनवासातून परत आल्यावर पांडवांना राज्य परत न देण्याच्या दुर्योधनाच्या निर्णयामुळे धृतराष्ट्रास खेद झाला पण त्याने युधिष्ठिरालाच उपदेश केला, की दुर्योधनाबरोबर युद्ध न करता भिक्षा मागून उदरनिर्वाह करावा (महाभारत, उद्योगपर्व १२९). कौरवांकडे शिष्टाईसाठी आलेल्या कृष्णाने धृतराष्ट्रास विश्वरूपदर्शन घडविले पण त्याचा उपयोग झाला नाही. त्याला कुळाचा सर्वनाश पाहावा लागला. शेवटी वनात जाऊन त्याने तपाचरणास सुरुवात केली पण वणव्यात जळून त्याचा शेवट झाला.
महाभारतकारांनी धृतराष्ट्राच्या रूपाने अंधत्वाने नाडलेल्या पण चंचल, संशयग्रस्त स्वभावाच्या व्यक्तिचा एक अत्यंत परिणामकारक नमुना उभा केला आहे.
भिडे, वि. वि.