धर्मयुद्धे : मध्ययुगीन यूरोपमध्ये मुस्लिम सत्तेच्या ताब्यात गेलेली ख्रिस्ती लोकांची ‘पवित्र भूमी’ (पॅलेस्टाईनमधील जेरूसलेम, बेथलिएम इ. शहरे) परत मिळविण्यासाठी वेळोवेळी केलेल्या लष्करी प्रयत्नांना (इ. स. १०९६ ते १२९१) सर्वसाधारणपणे ‘क्रूसेड’ ही संज्ञा देण्यात येते. या मुक्तिसंग्रामात लढणारे सैनिक आपल्या छातीवर क्रूसचे चिन्ह वापरीत म्हणून त्यांस क्रूसेड हे नाव पडले असावे. पश्चिम यूरोपमध्ये त्या काळात पाखंडी, धर्मद्रोही व पोपचे शत्रू यांच्या विरुद्धही धर्माच्या नावाखाली काही मोहिमा हाती घेण्यात आल्या होत्या. (उदा., दक्षिण फ्रान्समधील पाखंडी लोकांविरुद्धची मोहीम,  इ. स. १२१०) त्यांचाही अंतर्भाव ‘धर्मयुद्धात’ केला जातो. तेव्हा कोणत्याही पवित्र वाटणाऱ्या कार्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी हा शब्द इंग्रजी भाषेत रूढ झाला. त्याला मराठीत धर्मयुद्ध हा प्रतिशब्द वापरण्यात येतो. धर्म व नीती यांनुसार चालविलेले युद्ध हा त्याचा अर्थ येथे अभिप्रेत नाही. परधर्माच्या लोकांचे धर्मांतर करणे हासुद्धा त्याचा उद्देश नव्हता. त्या अर्थाने इस्लामी ‘जिहाद’च्या कल्पनेहून क्रूसेडची कल्पना थोडी वेगळी आहे. धर्माच्या संरक्षणासाठी त्याच्या शत्रूंचा निःपात करणे ही धर्मयुद्धाची कल्पना त्याकाळाच्या यूरोपीय जनमानसात होती असे दिसते. त्यास अनुसरून त्या काळात यूरोपमध्ये ज्यू धर्मीयांचे अनेक ठिकाणी शिरकाण करण्यात आले. स्पेन व सिसिली हे यूरोपचे भाग मुस्लिम राजकर्त्यांकडून परत जिंकून घेण्याच्या प्रयत्नांनाही पोपने धर्मयुद्धांचा दर्जा दिला होता परंतु  प्रामुख्याने पॅलेस्टाईन जिंकून तेथे ख्रिस्ती लोकांची सत्ता स्थापन करण्यासाठी ही चळवळ उभारण्यात आली.

धर्मयुद्धाच्या कल्पनेने अनेकांना विविध कारणांमुळे आकर्षित केले होते आणि त्यांवर या सर्वांचा प्रभाव पडलेला दिसतो : (१) बाराव्या शतकात यूरोपमध्ये धार्मिकतेची एक लाट उसळली होती. त्यामुळे या चळवळीस सामान्य जनतेचा पाठिंबा मिळाला आणि अनेक शिलेदार स्वेच्छेने या चळवळीत येऊन मिळाले. यांतील अनेक मोहिमा पोपच्या प्रेरणेने हाती घेण्यात आल्या. या धर्मयुद्धात लढणाऱ्या लोकांना पापक्षालनासंबंधी काही विशेष सवलती पोपने जाहीर केल्यामुळेही सामान्य लोक यांत सहभागी झाले असावेत. (२) या काळात यूरोपमध्ये सरंजामी व्यवस्था असल्यामुळे अंतर्गत यादवीस ऊत आला होता. या मूलतः युद्धप्रिय प्रवृत्तीस यूरोपबाहेर वाट काढून देऊन यूरोपमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी धर्मयुद्धाची कल्पना सोयीची होती. (३) सरंजामी व्यवस्थेत वडील मूलगा हाच वारस असल्यामुळे कनिष्ठ पुत्रांना आपले कर्तृत्व दाखविण्याची, मध्य आशियात स्वतःचे राज्य कमविण्याची संधी धर्मयुद्धाच्या रूपात दिसणे स्वाभाविक होते. अशा अनेक सरदारपुत्रांनी या धर्मयुद्धांचे नेतृत्व केल्याचे दिसते. (४) बायझंटिनच्या सम्राटांना धर्मयुद्धाच्या साहाय्याने आपली सत्ता सिरिया व आशिया मायनर येथे पुनःस्थापित करता येईल व आपल्या साम्राज्याचे तुर्कांपासून रक्षण करता येईल, असे वाटत होते. (५) इटलीतील व्हेनिस, जेनोआ यांसारख्या व्यापारी शहरांनी मध्य आशियात आपल्या बाजारपेठा स्थापन करण्यासाठी तसेच व्यापारी सवलती मिळविण्यासाठी धर्मयुद्धांस मदत केली. (६) धर्मयुद्धांस चालना देण्यामागे स्वतः पोपचा हेतूसुद्धा ग्रीक व लॅटिन या दोन्ही चर्च संघटना आपल्या नेतृत्वाखाली आणणे हाही एक होता. जर्मन सम्राटाबरोबर सतत चाललेल्या संघर्षात धर्मयुद्धामुळे आपणास लोकप्रियता मिळेल, असेही त्यास वाटले असावे. (७) अकराव्या शतकापर्यंत यूरोपमधील ख्रिस्ती जगास दक्षिणेकडून इस्लामी सत्तेने अर्धचंद्राकृती वेढा दिला होता. त्याचे एक टोक म्हणजे स्पेनमधील मूर लोकांचे राज्य, तर पूर्वेस दुसरे टोक म्हणजे सेल्जुक तुर्कांचे आशियातील राज्य होय. या विळख्यातून सुटण्यासाठी यूरोपची प्रतिक्रिया धर्मयुद्धांच्या रूपाने प्रकट झाली, असेही म्हणता येईल. साधारणपणे इ. स. १०९७ ते १२९१ या दरम्यान आठ धर्मयुद्धे झाली असे मानण्यात येते. खरे तर ही एक अखंड चाललेली चळवळ होती. प्रतिवर्षी अनेक (सशस्त्र) ‘यात्रेकरू’ जेरूसलेमला जात, काही काळ तेथे राहत आणि तेथील ख्रिस्ती राज्यांच्या संरक्षणास मदत करीत. परंतु या मालिकेतील काही प्रमुख जय किंवा पराजय यांना धरून झालेल्या प्रयत्नांना धर्मयुद्धांचे क्रम दिले आहेत एवढेच.

पहिले धर्मयुद्ध : अकराव्या शतकाच्या शेवटी बायझंटिन साम्राज्य दुर्बल झाले होते. पूर्वेकडील सेल्जुक तुर्कांचा राजा हा त्यास प्रमुख शत्रू निर्माण झाला होता. सरदार व लष्करी अधिकारी यांच्यातील स्पर्धेमुळे ते आतून पोखरले गेले होते. याची परिणती म्हणजे इ. स. १०७१ मध्ये सम्राट रोमेनस याचा तुर्की सुलतान आल्प आर्सलान याने मालाझगिर्ट येथे केलेला दारूण पराभव होय. त्यानंतरच्या सम्राट अलेक्सिअस याने आपल्या राज्याच्या रक्षणासाठी पोप दुसरा अर्बन याकडे मदतीची याचना केली. यापूर्वीही अनेकदा बायझंटिन सम्राटांनी पश्चिम यूरोपमधून भाडोत्री सैनिकांचे साहाय्य घेतले होते आणि कदाचित आताही या स्वरूपातील मदतीचीच त्यांची अपेक्षा असवी. परंतु या निमित्ताने धर्मयुद्ध झाल्यास पॅलेस्टाईनची मुक्तता होऊन शिवाय ग्रीक धर्मपीठ आपल्या वर्चस्वाखाली येईल असे वाटल्यावरून पोपने क्लेरमाँ येथील धर्मपरिषदेत हा प्रश्न उपस्थित केला आणि धर्मयुद्धाची घोषणी केली. १५ ऑगस्ट १०९६ हा दिवस कूच करण्यासाठी मुक्रर झाला. याचे नेतृत्व लप्वीचा बिशप आदेमार याने करावे असे ठरले. पीटर नावाच्या साधूने जनतेत या धर्मयुद्धाचा प्रचार केला. त्याच्या प्रेरणेने अनेक लोक या ‘यात्रे’साठी जमा झाले. त्यात अनेक निःशस्त्र युद्धास अयोग्य असेही लोक होते. पापमुक्तीसाठी जेरूसलेमची यात्रा करण्याची कल्पना तशी जुनी होती. स्वसंरक्षणासाठी हे यात्रेकरू अनेकदा सशस्त्र असत. तेव्हा हे धर्मयुद्ध म्हणजे अशा यात्रेचाच एक प्रकार त्यांना वाटला असावा. अधिकृत सैन्य संघटित होण्यापूर्वीच या ‘यात्रेकरूं’नी पॅलेस्टाईनकडे कूच केली परंतु तेथे पोहोचण्यापूर्वीच तुर्कांनी त्यांचा संहार केला (एप्रिल –ऑक्टोबर १०९६). याला जनतेचे धर्मयुद्ध असे नाव आहे.

संघटित धर्मयुद्धाची सुरुवात १०९७ मध्ये झाली. यूरोपमधील अनेक सरदारांनी यात भाग घेतला. लरेनचा ड्यूक गॉडफ्री व त्याचा भाऊ बॉल्डबिन हे हंगेरीमार्गे, तर तूलूझचा काउंट रेमाँ आणि बिशप आदेमार हे समुद्रकिनाऱ्याच्या मार्गाने कॉन्स्टँटिनोपलला पोहोचले. नॉर्मन सरदार बोएमाँ व त्याचा पुतण्या तँक्रेद हे समुद्रमार्गे तेथे येऊन पोहोचले. या तिन्ही गटांना स्वतःची राज्ये स्थापन करण्याची आकांक्षा होती. पहिल्या युद्धावर यांच्या सुप्त महत्त्वाकांक्षांची छाया पडल्याचे दिसते. सम्राट अलेक्सिअसला अशा ‘मदती’ची अपेक्षा नव्हती . यांपैकी नॉर्मन सरदार तर त्याचे जुने शत्रू होते. तेव्हा या सर्वांना आपणास एकनिष्ठ राहण्याची शपथ त्याने देवविली. पूर्वी साम्राज्याचा भाग असलेला प्रदेश जिंकल्यास तो त्यास परत करण्याचे वचनही त्यांच्याकडून घेतले आणि मग या धर्मसैनिकांना सशस्त्र बंदोबस्तात तुर्की सरहद्दीपर्यंत पोहोचविले.


धर्मयोद्ध्यांच्या सुदैवाने त्या काळच्या मुस्लिम राज्यकर्त्यात एकी नव्हती. सुलतान मलिकशाहाच्या मृत्यूनंतर तुर्की साम्राज्याचे विघटन झाले होते. ईजिप्त व आशिया मायनर हे प्रांत वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या हाती होते. आलेप्पो, अँटिऑक व दमास्कस येथील राज्यकर्त्यांत वितुष्ट होते. खुद्द पॅलेस्टाईनमध्ये राज्यकर्ते लोकप्रिय नसल्यामुळे त्यांनी फक्त शहारांतच तळ ठोकला होता. अशा परिस्थितीत धर्मयोद्ध्यांनी आशिया मायनरमधील नायसीआ हे शहर जिंकले आणि डॉरिलीअम येथे तुर्की सैन्याचा पराभव केला. त्यानंतर सरळ जेरूसलेमकडे प्रयाण करण्याऐवजी अनेक सरदारांनी आपापल्या महत्त्वाकांक्षा पूर्तीसाठी वेगवेगळ्या दिशांनी प्रयत्न सुरू केले. बॉल्डविनने पूर्वेस इडेसा या शहराकडे मोर्चा वळविला, तर बोएमाँ याने अँटिऑक शहरास वेढा दिला. ते शहर त्याने जिंकले. तेथे घडलेल्या काही धार्मिक चमत्कारांमुळे ख्रिस्ती सैन्यात उत्साह पसरला व त्याने तुर्की सैन्यास माघार घेण्यास भाग पाडले. त्यानंतर जेरूसलेमवर स्वारी करण्यात आली. एक महिन्याच्या वेढ्यानंतर ते शहर हाती आले (जुलै १०९९). ख्रिस्ती धर्मयोद्ध्यांनी शहरवासियांची सरसहा कत्तल केली. सर्व सरदारांनी रेमाँची जेरूसलेमच्या राजेपदासाठी निवड केली परंतु त्याची इच्छा ट्रिपोली जिंकण्याची होती (हे शहर त्याने ११०९ मध्ये जिंकले). खरे तर जेरूसलेमवर पोपचा हक्क होता तेव्हा चर्चचा ‘संरक्षक’ म्हणून गॉडफ्रीकडे सूत्रे सोपविण्यात आली. त्याच्या मृत्यूनंतर (स. ११००) त्याचा भाऊ इडेसा येथील बॉल्डविन हा जेरूसलेमचा राजा झाला. अशा रीतीने अँटिऑक, इडेसा, जॉफा, जेरूसलेम, रामॅल्ला, हायफा येथे ख्रिस्ती सत्ता स्थापन झाली.

दुसरे धर्मयुद्ध : पश्चिम आशियातील ही ख्रिस्ती राज्ये इटलीतील व्हेनिस, जेनोआ इ. नगरराज्यांच्या व यूरोपमधून येणाऱ्या यात्रेकरूंच्या साहाय्याच्या आधारे उभी होती. त्यांच्या साहाय्याने जेरूसलेमचे राज्य ११३१ पर्यंत उत्तरेस बेरूतपासून दक्षिणेस अकाबा बंदरापर्यंत पसरले होते. इडेसा, ट्रिपोली व अँटिऑक ही तिन्ही त्याची मांडलिक राज्ये होती. दमास्कसच्या मुस्लीम राजाशी त्याचे मित्रत्वाचे संबंध होते. ११३० नंतर ही स्थिती हळूहळू पालटली. पूर्वेस मोसूल व आलेप्पो येथील तुर्की अधिकारी अताबेग झेंगी व त्याच्यानंतर नूरेद्दीन यांनी आपली सत्ता बळकट केली. ११४४ मध्ये इडेसा हे ख्रिस्ती राज्य त्याने जिंकून घेतले त्यामुळे जेरूसलेमला धोका निर्माण झाला. त्याचे रक्षण करण्यासाठी तिसरा पोप यूजीनिअस याने यूरोपमधील राजांना मदतीचे आवाहन केले. फ्रेंच राजा सातवा लुई व जर्मन राजा तिसरा कॉनरॅड यांनी या मोहिमेत पुढाकार घेतला. कॉनरॅड याचा डॉरिलीअम येथे पराभव झाला व त्याला तेथून माघार घ्यावी लागली. लुई व कॉनरॅड यांचे सैन्य समुद्रमार्गे अँटिऑकला पोहोचले. जेरूसलेम येथे पोहोचल्यावर त्यांनी दमास्कसवर हल्ला करण्याचे ठरविले परंतु आपापसांतील मतभेदांमुळे त्यांना त्यात अपयश आले.

तिसरे धर्मयुद्ध : ११४९ मध्ये नूरेद्दीनने अँटिऑकवर हल्ला केला व उरलेले इडेला राज्य जिंकून घेतले. ११५४ मध्ये त्याने दमास्कसही जिंकले. ईजिप्तमध्ये आपणास अनुकूल असलेली व्यक्ती वजीर व्हावी, यासाठी नूरेद्दीन व जेरूसलेमचा राजा पहिला अमॅलरिक यांच्यात स्पर्धा सुरू झाली. त्यात नूरेद्दीनचा विजय होऊन त्याचा उमेदवार शिरकूह यास ते पद मिळाले (११६९). त्याच्यानंतर त्याचा मुलगा सॅलदीन हा ईजिप्तचा सर्वाधिकारी झाला. नूरेद्दीन व अमॅलरिक या दोघांच्या मृत्यूनंतर (११७४) सॅलदीनाला रोखू शकणारी सत्ता मध्य आशियात उरली नाही. त्याने ११७४ मध्ये दमास्कम आणि ११८३ मध्ये आलेप्पो जिंकले. जेरूसलेममध्ये राजास कोणी वारस नसल्यामुळे त्यासंबंधी तंटा सुरू झाला होता. अशा परिस्थितीत ११८७ मध्ये सॅलदिनने जेरूसलेमवर हल्ला करून ते जिंकून घेतले. आता फक्त ट्रिपोली व अँटिऑक ही राज्ये ख्रिस्ती लोकांच्या हातात उरली. जेरूसलेमला वाचविण्यासाठी पुन्हा एकदा हाक देण्यात आली. पोपनेही त्यास साथ दिली.

या वेळेस धर्मयुद्धाची सूत्रे राजेलोकांनी हाती घेतली. इंग्लंडचा राजा दुसरा हेन्‍री व फ्रान्सचा राजा फिलिप ऑगस्टस यांनी धर्मयुद्धासाठी लोकांवर कर लादले. त्यास ‘सॅलदीन कर’ म्हणतात. कर न देणाऱ्यांना सैनिक म्हणून भरती केले. यामुळे दोन्ही-सैनिक आणि  पैसा-कार्यभाग साधले. बायझंटिन सम्राटाने पवित्र भूमीची मालकी आपणास मिळावी म्हणूण सॅलदीनशी बोलणी सुरू केली. तेव्हा या सम्राटाविरुद्धच धर्मयुद्ध पुकारावे असा आग्रह जर्मन राजा फ्रीड्रिख याने पोपजवळ धरला परंतु या प्रयत्नानात फ्रीड्रिखचे अपघाती निधन झाले.

इंग्लंडचा राजा रिचर्ड (हेन्‍रीचा मुलगा) व फ्रेंच राजा फिलिप यांच्या नेतृत्वाखाली सैन्य तयार झाले. हिवाळ्यासाठी दोघांनीही सिसिलीमध्ये तळ टाकला. तेथेच दोघांतील वैमनस्यास सुरूवात झाली. रिचर्डने सायप्रस बेट जिंकले, पॅलेस्टाईनमधील आएरे शहरास वेढा दिला व ते शहर जिंकले (११९१). जेरूसलेमच्या राज्यपदासाठी भांडणे सुरू झाली. त्यात रिचर्ड व फिलिफ या दोघांनी विरुद्ध पक्ष घेतले. धर्मयुद्ध अर्धेच सोडून फिलिप फ्रान्सला परतला. रिचर्डने सॅलदीनशी वाटाघाटी करून तह केला (११९२). रिचर्डचा पुतण्या हेन्‍री हा जेरूसलेमचा राजा झाला (जेरूसलेम शहर सॅलदीनच्या हातीच राहिले). ११९२ मध्ये रिचर्ड मायदेशी परत निघाला. वाटेत ऑस्ट्रियाच्या ड्यूकने त्यास पकडले. जर्मन राजाने त्याच्याकडून खंडणी घेऊन त्यास सोडून दिले. यावरून यूरोपातील राजेलोकांना धर्मयुद्धाबद्दल किती आस्था होती हे दिसून येते! या धर्मयुद्धाचा विशेष म्हणजे यात धर्मयुद्धाची सूत्रे पोपकडून राजेलोकांच्या हाती आली आणि त्यांनी त्यासाठी राजकीय साधने—कर, वाटाघाटी इ. —वापरली.

चौथे धर्मयुद्ध : या धर्मयुद्धात तर धर्माचा संबंध नाममात्र राहिला. आपल्या राजकीय हेतूपूर्तीसाठी जर्मनीचा राजा फ्रीड्रिख व इटालियन नगरराज्ये यांनी धर्मसैनिकांचा वापर करून घेतला. सॅलदीन हा जेरूसलेमचा प्रमुख शत्रू आणि ईजिप्त हे मुस्लिम सत्तेचे केंद्र असल्यामुळे यावेळेस धर्मयोद्ध्यांचा रोख ईजिप्तकडे होता. त्यासाठी भूमध्य समुद्र पार करणे आवश्यक होते. ठराविक मोबदला घेऊन आवश्यक नाविक दल पुरविण्याची जबाबदारी व्हेनिस शहराने घेतली. परंतु तो मोबदला देण्याचे सामर्थ्य या स्वारीच्या पुढाऱ्यांत नसल्याने एड्रिॲटिक समुद्र किनाऱ्यावरील झारा हे बंदर जिंकून व्हेनिसला द्यावे अशी तोडजोड झाली. त्यानुसार पोपने मनाई केली असतानाही झारा हे बंदर जिंकण्यात आले (१२०२). त्यानंतर जर्मन राजा हेन्‍री याने या सैन्याचा वापर बायझंटिन सम्राटाविरुद्ध करावयाचे ठरविले. तेथील सम्राटास पदच्युत करून तिसरा अलेक्सिअस याने गादी बळकावली होती. पदच्युत राजा आइझाक हा (जर्मन राजा) हेन्‍री याचा नातेवाईक होता. शिवाय आइझाकच्या मुलाने आपणास गादी मिळवून दिल्यास धर्मयुद्धासाठी बरीच रक्कम देण्याचे वचन दिले. हेन्‍रीच्या आग्रहावरून या सैन्याने कॉन्स्टँटिनोपलकडे आपला मोर्चा वळविला. व्हेनिसलाही कॉन्स्टँटिनोपलमध्ये व्यापारी सवलती हव्या होत्या. त्यासाठी त्या शहराने या स्वारीस मदत केली. १२०३ मध्ये कॉन्स्टँटिनोपल जिंकण्यात आले परंतु मोबदल्याची रक्कम देणे आइझाकला शक्य झाले नाही. तेव्हा चिडून ख्रिस्ती सैन्याने ते शहर ताब्यात घेतले, तेथे यथेच्छ लूट केली व फ्लँडर्सचा सरदार बॉल्डविन यास सम्राट केले. अशा रीतीने धर्मयुद्धावर निघालेल्या ख्रिस्ती सैन्याने इस्लामी सत्तेविरुद्ध लढण्याऐवजी ख्रिस्ती बायझंटिन साम्राज्यावरच घाला घातला.


पाचवे धर्मयुद्ध : राजे व सरदार यांनी धर्माचा उपयोग स्वार्थासाठी केला, तरीही साधारण जनतेत धर्माचा बराचा प्रभाव होता. याचे उदाहरण म्हणजे फ्रान्समध्ये स्टीव्हन नावाच्या एका धनगराच्या मुलास दृष्टांत झाला. तो धर्मयुद्धाचे नेतृत्व करणार असे सांगून हजारो मुले बरोबर घेऊन मार्सेपर्यंत गेला. पुढील समुद्रप्रवासात अनेक मुले मरण पावली. उरलेल्या मुलांस पकडून गुलाम म्हणून विकण्यात आले. असाच एक प्रकार जर्मनीतही झाला. यांना ‘बालकांचे धर्मयुद्ध’ म्हणण्यात येते (१२१२).

जेरूसलेम परत ख्रिस्ती सत्तेखाली आणावे याचा ध्यास पोप तिसरा इनोसंट याने धरला होता. बालकांच्या धर्मयुद्धाने प्रेरित होऊन त्याने १२१५ मध्ये धर्मयुद्धाची घोषणा केली आणि यूरोपमधील सर्व राजांना आवाहन केले. जर्मनीचा दुसरा फ्रीड्रिख, ऑस्ट्रियाचा ड्यूक, हंगेरीचा राजा यांनी त्याला प्रतिसाद दिला. या मोहिमेचे नेतृत्व कार्डिनल पिलेजिअस याने स्वीकारले. या सैन्याने समुद्र पार करून ईजिप्तमध्ये दॅमिएट्टा शहरास वेढा दिला. त्यात त्यांना यश आले. ईजिप्तच्या सुलतानाने जेरूसलेम परत करण्याचे व सर्व ख्रिस्ती कैद्यांना मुक्त करण्याचे मान्य केले. याने कार्डिनलचे समाधान झाले नाही. त्याने कैरोकडे कूच केले परंतु त्यास माघार घेणे भाग पडले व सुलतानाबरोबर तह करून परतावे लागले.

सहावे धर्मयुद्ध : पाचव्या धर्मयुद्धात सहभागी होण्याचे वचन देऊनही जर्मन राजा दुसरा फ्रीड्रिख याने शेवटपर्यंत कोणतीही मदत केली नव्हती. मध्यंतरीच्या काळात त्याने जेरूसलेमच्या राजकन्येशी विवाह केला आणि त्यामुळे तेथील राज्यावर तो हक्क सांगू लागला. १२२७ मध्ये तो धर्मयुद्धास निघाला पण आजारी पडल्यामुळे त्यास परतावे लागले. आजाराची सबब खोटी वाटून पोप ग्रेगरीने त्यास धर्मबहिष्कृत केले, तरीही फ्रीड्रिख १२२८ मध्ये स्वारीवर निघाला. त्यावेळेस मुस्लिम नेत्यांत सत्तेसाठी स्पर्धा चालली होती. त्याचा फायदा घेऊन फ्रीड्रिखने प्रत्यक्ष युद्ध न करता तह केला (१२२९) व नॅझारेथ, बेथलिएम, जेरूसलेम इ. ख्रिस्ती शहरे मिळविली. जेरूसलेम मध्ये फ्रीड्रिखने धर्मबहिष्कृत असानाही स्वतःस राज्यभिषेक करून घेतला . या गोष्टीस अर्थातच पोपची अनुमती नव्हती कारण ज्या मार्गाने त्याने जेरूसलेम मिळविले ते धर्मयुद्धाच्या संकल्पनेशी सुसंगत नव्हते.

सातवे व आठवे धर्मयुद्ध : जेरूसलेम जिंकल्यावर तेथील सरदार व फ्रिड्रिख यांच्यात संघर्ष सुरू झाला. याचा परिणाम म्हणजे ईजिप्तच्या बायबॅर्स याने सरदारांचा गाझा येथे पराभव केला व १२४४ मध्ये जेरूसलेम जिंकून घेतले. १२४५ मध्ये लायन्झ येथे पोप चौथा इनोसंट याने फ्रिड्रिखविरुद्ध व जेरूसलेम परत मिळविण्यासाठी धर्मयुद्ध सुरू करण्याचे आवाहन केले. फ्रान्सचा राजा सेंट लुई याने आपल्या भावांसह या धर्मयुद्धाचे नेतृत्व करण्याचे मान्य केले. १२४९ मध्ये त्याने ईजिप्तवर हल्ला केला व दॅमिएट्टा शहर जिंकले. त्यानंतर त्याने कैरोच्या रोखाने स्वारी केली परंतु त्याचा पराभव झाला आणि लुई स्वतः शत्रूच्या हाती सापडला. बरीच मोठी खंडणी देण्याचे मान्य करून त्याने स्वतःची सुटका करून घेतली. यूरोपमधून काही मदत मिळेल या अपेक्षेने लुई चार वर्ष पॅलेस्टाईनमध्ये राहिला. शेवटी निराश होऊन त्यास परतावे लागले (१२५४).

ईजिप्तचा मामलूक सुलतान बायबॅर्स याने आपल्या राज्याचा विस्तार चालूच ठेवला. त्याने दमास्कस जिंकले .१२६८ मध्ये अँटिऑकही जिंकून घेतले. यानंतर पुन्हा एकदा सेंट लुईने धर्मयुद्धासाठी प्रयत्न केला (१२६७) . त्यास इंग्लंडचा राजकुमार एडवर्ड याने मदत द्यावयाचे मान्य केले. ट्युनिशियाच्या अधिपतीचे धर्मांतर करून त्यास सामिल करून घेण्याच्या उद्देशाने त्याने ट्युनिशियावर स्वारी केली. तेथे आजारी पडून त्याचा मृत्यू ओढवला. १२७१ मध्ये एडवर्ड हा आएरे येथे पोहोचला परंतु त्यालाही फारसे यश मिळू शकले नाही. १२७९ मध्ये ईजिप्तच्या सुलतानाने ट्रिपोली आणि १२९१ मध्ये आएरे जिंकले. अशा रीतीने पॅलेस्टाईनमधील शेवटची ख्रिस्ती ठाणी मुस्लिमांच्या सत्तेखाली आली.

धर्मयुद्धांच्या अपयशासाठी पोप किंवा यूरोपमधील राजेलोक यांना जबाबदार धरले जाते. आपल्या क्षणिक स्वार्थापायी त्यांनी धर्मयुद्धांत अडथळे निर्माण केले. धर्माचा आपल्या आकांक्षापूर्तीसाठी उपयोग करून घेतला. यूरोपच्या राजांमधील वाढती दुही, पोप व जर्मन सम्राट यांच्यातील वितुष्ट, बायझंटिन सम्राटांच्या सहकार्याचा अभाव ही सर्वत्रच ख्रिस्ती प्रयत्नांच्या अपयशाची कारणे म्हणून सांगता येतील. खरे तर काळ बदलला आणि त्याबरोबर लोकांची दृष्टीही बदलली. धर्मावरील अंधश्रद्धा कमी झाली. चौदाव्या शतकातील यूरोप जास्त वास्तववादी बनला. त्या काळातील राजांना आशियातील ख्रिस्ती राज्ये टिकवून ठेवण्यापेक्षा यूरोपमधील आपापली सत्ता बळकट करणे जास्त महत्त्वाचे वाटू लागले.

धर्मयुद्धांच्या अखेरीस मध्य आशियातील ख्रिस्ती राज्ये नष्ट झाली. पॅलेस्टाईनमध्ये ख्रिस्ती अंमल टिकू शकला नाही. स्पेन आणि बाल्टिक किनारपट्टीचा अपवाद सोडता इस्लामी सत्ता जास्त प्रबळ झाली. यावरून सकृतदर्शनी धर्मयुद्धाचा मूळ हेतू असफल झाल्याचे दिसते. अनेक लेखक धर्मयुद्धाच्या परिणामांचे अतिशयोक्तिपूर्ण वर्णन करतात. युरोपमधील सरंजामशाहीचा अस्त झाला कारण धर्मयुद्धासाठी अनेक धर्मसैनिक सरंजामी सेवेतून मुक्त झाले. मध्य आशियायी चालणाऱ्या व्यापारामुळे इटली व जर्मनीतील शहरांची वाढ झाली नवीन व्यापारी वर्ग निर्माण झाला पोपची स्वार्थी, सत्तापिपासू वृत्ती पाहून लोकांची पोपवरील श्रद्धा कमी झाली आणि त्यातून धार्मिक सुधारणेस चालना मिळाली ग्रीक तत्त्वज्ञान, विज्ञान यांचा प्रसार होऊन त्यातून प्रबोधन काळाचा उदय झाला, असे अनेक दूरगामी परिणाम सांगण्यात येतात. खरे तर या सगळ्यांची कारणे विविध व गुंतागुंतीची आहेत. धर्मयुद्धांनी या प्रक्रियेस हातभार लावला असे फार तर म्हणता येईल.

मध्यपूर्वेशी आलेल्या संपर्कामुळे यूरोपने अरबांचे अंकगणित, होकायंत्र, कागद व काच यांचा स्वीकार केला. भूगोलाचे ज्ञान विस्तृत होऊन भौगोलिक शोधांची पूर्वतयारी झाली. यूरोपीय भाषा अरबांच्या संपर्काने समृद्ध झाल्या. रसायन, संगीत, व्यापार इ. विषयांसंबंधी यूरोपीय भाषांतील अनेक शब्द अरबीतून आलेले आहेत.

यूरोपातील युद्धतंत्रावरही धर्मयुद्धांचा पुष्कळ परिणाम झाल्याचे दिसते. गडांची बांधणी, त्यांची वास्तुकला आणि त्यांचा उपयोग याचे अनुकरण यूरोपात होऊ लागले. लष्कराच्या वाहतुकीसाठी पूल बांधणे, शत्रूंचे मार्ग उद्‌ध्वस्त करणे याचे तंत्र यूरोपने उचलले. धर्मयुद्धाच्या निमित्ताने प्रत्यक्ष करव्यवस्था विकसित झाली. असे कर जंगम मालमत्तेवरही लादण्यास सुरुवात झाली.

यूरोपमध्ये पौर्वात्य भाषांचे एक महाविद्यालय सुरू झाले. धर्मयुद्धातील घटनांच्या निमित्ताने इतिहासलेखनाला उत्तेजन मिळाले. प्रतिभेला नवनवे विषय मिळून त्यातून फ्रेंच, जर्मन आदी भाषांतील साहित्यात भर पडली. पौर्वात्यांच्या संपर्काने यूरोपात नव्या वनस्पती, नवी फळे, अत्तरासारखे सुवासिक पदार्थ, नव्या पोषाखांच्या तऱ्हा रूढ झाल्या. साखर, लिंबू, टरबूज, सुती व रेशमी कापड, मसाल्याचे पदार्थ, रत्ने, औषधे इ. यूरोपीय लोकांच्या वापरात येऊन त्यांचा व्यापार वाढला. अशा रीतीने व्यापार, भूगोल, शास्त्र, कला, साहित्य, राजकारण, अर्थकारण व धर्म या सर्व जीवनांत स्थित्यंतर होऊन एका नव्या यूरोपच्या निर्मितीस धर्मयुद्धांची मदत झाली.

संदर्भ : 1. Brooke, Christopher, Europe in the Middle Ages, London 1964.

            2. Davis, R. H. C. A History of Medieval Europe, London, 1970.

           3. Pernoud, Regine Trans. Meleod, Enif, The Crusades, London, 1960.

           4. Runeiman, Steven, A History of the Crusades, 3 Vols., Cambridge, 1954.

मोरखंडीकर, रा. शा.