धर्मकीर्ति : (इ. स. सातवे शतक). थोर बौद्ध नैयायिक. दक्षिण भारतांतर्गत प्राचीन चोल देशातील तिरुमलई नावाच्या गावी ह्याचा जन्म झाला. दिङ्नागाचा शिष्य ईश्वरसेन ह्याच्याकडे न्यायशास्त्राचे काही काळ अध्ययन केल्यानंतर धर्मकीर्तीने नालंदा येथे जाऊन तेथील महाविहाराचा संघस्थविर आणि विज्ञानवादी आचार्य धर्मपाल ह्याचे शिष्यत्व स्वीकारले. धर्मकीर्तीने अनेक ब्राह्मण विद्वानांशी आणि निर्ग्रंथ जैन आचार्यांशी वादविवाद करून सभा गाजविल्या व त्या जिंकल्या. प्रमाण-वार्तिक हा धर्मकिर्तीचा सर्वांत महत्त्वाचा संस्कृत ग्रंथ होय. बौद्ध साहित्याचे विख्यात अभ्यासक व संशोधक राहुल सांकृत्यायन ह्यांना ह्या ग्रंथाची मूळ संस्कृत संहिता तिबेटात मिळाली. नैयायिक म्हणून त्याच्या श्रेष्ठ बौद्धिक कामगिरीची साक्ष ह्या ग्रंथावरून मिळते. हा ग्रंथ उपलब्ध झाला नसता, तर धर्मकीर्तीची प्रतिमा संदिग्धच राहिली असती. प्रमाण-वार्तिक-भाष्य  किंवा वार्तिक अलंकार  ह्या नावाने ओळखली जाणारी प्रमाण-वार्तिकावरील प्रज्ञाकरगुप्तलिखित संस्कृत टीका पाटण्याच्या ‘जयस्वाल रिसर्च इन्स्टिट्यूट’ने १९५३ मध्ये प्रसिद्ध केली आहे. धर्मकीर्तीच्या अन्य संस्कृत ग्रंथांत प्रमाण-विनिश्चिय, न्यायबिंदु, हेतुबिंदु, वादन्याय  आणि संबंध-परीक्षा ह्यांचा अंतर्भाव होतो. सामान्यतः ह्या सर्व ग्रंथांतून बौद्धाची मीमांसा मांडलेली असून बहुश्रुतपणा आणि सूक्ष्म, तरल चिंतनशक्ती ह्यांचा प्रत्यय त्यांतून येतो. दिङ्नाग हा ज्येष्ठ व श्रेष्ठ बौद्ध नैयायिक, त्याचप्रमाणेच धर्मकीर्तीही प्रत्यक्ष व अनुमान (स्वार्थ व परार्थ) ही दोन प्रमाणेच मान्य करतो. तथापि दिङ्नागाचे काही दोषही धर्मकीर्तीने दाखवून दिले आहेत. धर्मकीर्ति हा योगाचार संप्रदायाचा म्हणून मानला गेला असला, तरी तो पूर्णांशाने त्या संप्रदायाचा नाही कारण बाह्य वस्तूंचे अस्तित्व तो मानतो, असे दिसते. काही ठिकाणी त्याच्यावर सौत्रांतिक मताचा प्रभाव जाणवतो. विज्ञानवाद्यांच्या आलयविज्ञानाने बौद्ध धर्माच्या उत्तरकालात धर्मकीर्तीच्या ग्रंथांतून बौद्ध ज्ञानमीमांसेतील सर्वोच्च शिखर गाठले एवढेच नव्हे, तर एकूण भारतीय न्यायशास्त्राच्या विकासाच्या इतिहासातही प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा निर्माण केला. नवव्या शतकात होऊन गेलेल्या वाचस्पतिमिश्राला न्याय-वार्तिक-तात्पर्य-टीका लिहिण्याची प्रेरणा धर्मकीर्तीच्या ग्रंथांनी दिली. ‘भारताचा कांट’ म्हणून धर्मकीर्तिचा गौरव शेरबाट्‌स्की ह्या रशियन पंडिताने केलेला आहे. उज्जैन, कलिंग, मगध आदी ठिकाणीही धर्मकीर्तीचे वास्तव्य झाले होते. आयुष्याच्या अखेरीस मात्र तो चोल देशातच होता.

बापट, पु. वि.