पेटके : स्नायूच्या किंवा स्नायुगटाच्या आपोआप व अनैच्छिकपणे उद्भfवणाऱ्या वेदनायुक्त संकोचाला ‘पेटका’ म्हणतात. पृष्ठभागाजवळील ऐच्छिक स्नायूमध्ये असे संकोच एकामागून एक येतात व प्रत्येक संकोचाच्या वेळी तो स्नायू किंवा स्नायुगट हाताला कठीण व ताठ बनलेला लागतो. यालाच ‘गोळा येणे’ किंवा ‘वांब’ असेही म्हणतात. अशा प्रकारचे संकोच आतडे, जठर किंवा रोहिण्या यांमधील अनैच्छिक स्नायूंतही उद्भचवतात परंतु त्यांचा समावेश या संज्ञेत केला जात नाही. पाय व हात या शरीर भागांतील स्नायूंमध्ये, विशेषेकरून पोटरीच्या स्नायूमध्ये पेटके येतात. बहुतेकांना शरीर प्रकृती चांगली असूनही पेटक्यांचा अनुभव केव्हांना केव्हा आलेला असतो.
कधीकधी पेटक्यांचे निश्चित कारण सांगता येत नाही. अशा पेटक्यांना ‘अज्ञातहेतुक पेटके’ म्हणतात. पुष्कळ वेळा पेटके येणे हे काही विकृतींचे लक्षण असते. प्रेरक तंत्राच्या विकृती [→ प्रेरक तंत्र ],⇨आकडी, परावटू ग्रंथिजन्य विकृती [→ परावटु ग्रंथि ], अतिघामामुळे किंवा पटकीसारख्या विकृतीमुळे [→ पटकी ] शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे होणाऱ्या निर्जलीकरणामुळे, तसेच मूत्रविषरक्तता [→ मूत्रोत्सर्जक तंत्र ], कॅल्शियमन्यूनता व मॅग्नेशियमन्यूनता विकृतींमध्येही पेटके येतात. कंपवात (कंप, स्नायुताठरता वगैरे लक्षणे असलेली वृद्धावस्थेतील एक विकृती),⇨धनुर्वात, ⇨अलर्क रोग, काही विषबाधा (उदा., कुचल्याची विषबाधा) यांमध्येही पेटके येतात. परंतु त्यात थोडाफार फरक असतो, उदा., धनुर्वातातील स्नायुसंकोच जवळजवळ सतत टिकणारे असतात.
टंकलेखन, हाताने शिंपीकाम करणारे व सतत लेखन करणारे यांच्या हाताच्या व बोटांच्या स्नायूंमध्ये पेटके येऊन काम करणे अशक्य होते. अशा पेटक्यांना ‘व्यवसायजन्य’ पेटके म्हणतात.
ढमढेरे, वा. रा. भालेराव, य. त्र्यं. आयुर्वेदीय वर्णन व चिकित्सा : हा विकार स्नायुधमनींचा आहे. स्नायूंचे जोराने आकुंचन होते आणि त्यांत वेदना अती प्रमाणात होतात. पेटके येणाऱ्या अवयवाला नारायण तेलासारख्या वातनाशक तेलाने मर्दन करून नंतर शेकावे किंवा अगोदर शेकून नंतर नारायण तेल चोळावे. नंतर लोकरीच्या कापडाच्या पट्ट्याने तो अवयव बांधावा. वातनाशक तेलांचे नाकामध्ये नेहमी नस्य करावे. एखाद्या अवयवात जर पेटके येत असतील तर व जुना रोग नसेल, तर एवढ्याने बरे वाटेल पण अनेक अवयवांत विकार असेल आणि जीर्ण असेल, तर वरील उपचारांबरोबर त्या त्या अवयवातून रक्तस्त्रावही थोड्या थोड्या प्रमाणात करावा. दररोज मात्राबस्ती द्यावा. अनुवासन आणि रेचक बस्तीही द्यावेत. वेदनांच्या वेळी महावात विध्वंस, महायोगराज गुग्गुलू, राजवल्लभ, वातगजाकुश ही औषधे द्यावीत. ज्या औषधाने बरे वाटले ते औषध चालू ठेवावे.
संदर्भ : Thorn, G. W. and others, Ed. Harrison’s Principle of Internal Medicine, Tokyo, 1977.
“