पाकोळी – २: (बटाट्यातील अळी). या किडीचा समावेश लेपिडोप्टेरा गणातील जेलेचिडी कुलामध्ये करतात. या किडीची अळी बटाट्यांत शिरून आतील भाग खाते त्यामुळे बटाटे स़डतात. पाकोळ्या (पतंग) शेतात बटाट्याच्या आसपास उडताना दिसतात. त्यावरून वरील नावे पडली असावीत. हिचे शास्त्रीय नाव थोरिमिया ऑपरक्यूलेला आहे.
पाकोळी अगदी लहान व सु. ६ मिमी. लांब असते. तिचे पंख करड्या तपकिरी रंगाचे असून त्यांवर गर्द तपकिरी रंगाच्या ठिपक्यांची छटा असते. अळ्या पांढरट गुलाबी रंगाच्या असून त्यांचे डोके गर्द तपकिरी असते.
पाकोळीची मादी पानांच्या पाठीमागे किंवा शेतात उघड्या पडलेल्या बटाट्यांवर एकेकटी अंडी घालते. ती तीन-चार दिवसांत उबून त्यांतून अळ्या बाहेर पडतात. बटाटे लागण्यापूर्वी त्या पानांत शिरून आतील भाग खातात. साठविलेल्या बटाट्यांत या किडीचा फारच उपद्रव होतो. उष्ण हवामानात हिचा जास्त प्रादुर्भाव होतो. बटाट्याखेरीज टोमॅटो, तंबाखू, वांगी व सोलॅनेसी कुलातील तणांना या किडीचा उपद्रव होतो.
अळीची दोन आठवड्यांत पूर्ण वाढ होऊन ती बटाट्याबाहेर पडून माती चिकटलेल्या करड्या रेशमी धाग्यांत कोशावस्थेत जाते. ७–१० दिवसांत कोशांतून पाकोळ्या बाहेर पडतात.
या किडीचा उपद्रव टाळण्याच्या दृष्टीने शेतात बटाटे उघडे पडू नयेत म्हणून वेळीच खांदणी करून बटाटे मातीने झाकतात. किडीचा उपद्रव दिसू लागताच कार्बारिलची फवारणी करतात. साठविण्यापूर्वी किडके बटाटे निवडून त्यांची लगेच विल्हेवाट लावतात व चांगले तेवढेच बटाटे अरणीत साठवितात. अरण थंड हवेच्या ठिकाणी लावतात अगर शीतगृहात बटाटे साठविल्यास या किडीचा उपद्रव होत नाही. कोपिडोसोमा कोलरी हा कीटक पाकोळ्यांच्या अंड्यांवर व अळ्यांवर उपजीविका करतो. म्हणून त्याचा या किडीच्या नियंत्रणासाठी उपयोग होतो.
पोखरकर, रा. ना.
“