पाटीचा दगड: (स्लेट). सूक्ष्मकणी, मृण्मय, रूपांतरित खडक. स्लेटी पाटन [⟶ पाटन] हे या खडकाचे वैशिष्ट्य आहे म्हणजे या खडकात चांगल्या प्रकारची स्तरभिदुरता (पापुद्रे निघण्याचा गुणधर्म) पर्णनामुळे आलेली असते. परिणामी या पाटनाच्या दिशेत हा खडक सहजपणे फुटून त्याचे अतिशय पातळ तक्ते (लाद्या) निघू शकतात. पाटनपृष्ठे व स्तरणतले (थरांच्या पातळ्या) ही बहुधा समांतर नसतात. पंकाश्म, गाळवटी खडक, शेल इ. बारीक मृत्तिकेपासून बनलेले गाळाचे खडक हे बहुतकरून पाटीच्या दगडाचे मूळचे द्रव्य असतात. या गाळात कधीकधी बारीक वाळू वा ज्वालामुखीची धूळही समाविष्ट झालेली असते. या मूळ खडकांचे कमी प्रतीचे रूपांतरण होऊन म्हणजे सापेक्षतः कमी तापमान व दाबाच्या स्थितीत खडकामध्ये बदल होऊन पाटीचा दगड बनलेला असतो. रूपांतरणामध्ये मूळच्या खडकात अंशतःच बदल झालेला असू शकतो व त्यामुळे मूळ खनिज संघटन व स्तरण ही काही प्रमाणात पाटीच्या दगडातही टिकून राहिलेली आढळतात. असे मूळचे स्तरण पाटनपृष्ठावर दिसू शकते.
खडक भूपृष्ठाखाली खोल जागी असताना कधीतरी त्यावर दाब पडून पाटन निर्माण झालेले असते. पाटनाची दिशा रूपांतरणाच्या वेळी असणाऱ्या दाबाच्या दिशेनुसार ठरते मात्र सामान्यतः दाबाला काटकोनात पाटन निर्माण होते. दाबामुळे सर्व खनिजांच्या चापट व लांबट बाजू समांतर होतील अशा तऱ्हेने मांडल्या जातात व या दिशेत पाटन निर्माण होते. मूळच्या खडकांत अभ्रकासारखी खनिजे विपुल असल्यास पाटन चांगल्या प्रकारे निर्माण होते. अशा प्रकारे पाटन ही खडकात नंतर आलेली संरचना असते. त्यामुळे पाटीचे दगड मुख्यतः अधिक जुन्या खडकांत आढळतात, परंतु पर्वत निर्माण करणाऱ्या हालचालींमुळे खडकांना घड्या पडून व ते दाबले जाऊन बनलेले पाटीचे दगड अलीकडच्या खडकांतही काही ठिकाणी आढळतात. अशा खडकांत कधीकधी जीवाश्मही (जीवांचे शिळारूप झालेले अवशेषही) आढळतात.
पाटीच्या दगडाचा रंग काळा, तपकिरी, उदी, करडा, जांभळा, तांबूस, हिरवा वा निळसर असतो. कार्बनयुक्त द्रव्य वा लोह सल्फाइडाचे कण विखुरलेले असल्याने सामान्यतः काळा वा गडद रंग आलेला असतो हेमॅटाइटामुळे तांबूस वा जांभळा तर क्लोराइटामुळे हिरवा रंग आलेला असतो. शुभ्र अभ्रक, क्लोराइट व क्वाॅर्ट्झ ही पाटीच्या दगडातील महत्त्वाची खनिजे असून फेल्स्पारे व कृष्णाभ्रक ही खनिजेही थोड्या प्रमाणात असतात तर तोरमल्ली, रूटाइल, एपिडोट, स्फीन, हेमॅटाइट व इल्मेनाइट ही गौण खनिजे यात असतात.
पाटीच्या दगडाच्या बहुधा उघड्याच खाणी असतात क्वचितच तो भूमिगत खाणी चालवून काढला जातो. खाणीतून प्रथम याचे मोठे ठोकळे काढतात. नंतर विशिष्ट आकाराची छिन्नी ठोकळ्याच्या कडेवर ठेवून मोगऱ्याने (लाकडी हातोड्याने) ती हलकेच ठोकतात. यामुळे पाटनाच्या दिशेने भेग पडते. नंतर या भेगेत छिन्नी पाचरीप्रमाणे ठोकतात व परिणामी ठोकळ्याचे दोन तुकडे होतात. तुकड्यांची पृष्ठे सपाट व गुळगुळीत असतात. अशा तऱ्हेने ठोकळ्याचे सु. ७·५ सेंमी. जाडीचे १६ से १८ तुकडे केले जातात. नंतर हाताने व यांत्रिक सुऱ्यांनी हे तुकडे कापून व छाटून योग्य आकार व आकारमानाच्या लाद्या तयार करतात. आकारमानानुसार लाद्यांची प्रतवारी करून त्यांना प्रतीनुसार लेडीज, काउंटेसेस, प्रिन्सेसेस, डचेसेस इ. परंपरागत नावे देतात.
अमेरिका (पेनसिल्व्हेनिया, व्हर्माँट), ब्रिटन (उ. वेल्स), फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, चेकोस्लोव्हाकिया, इटली, नॉर्वे, पोर्तुगाल, स्पेन, स्वित्झर्लंड, जपान, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका इ. देशांत हा खडक मोठ्या प्रमाणात आढळतो. भारतात ⇨ धारवाडी संघात पाटीचा दगड मोठ्या प्रमाणावर आढळतो. कडप्पा, कुर्नूल, नेल्लोर, धारवाड, बेळगाव, विजापूर, कांग्रा, कुमाऊँ, सिमला, चंबा, मंडी, पीरपंजाल, गढवाल, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान वगैरे भागांत हा खडक आढळतो. भारतातील याच्या उत्पादनापैकी ६०% उत्पादन पंजाबात होते. त्याशिवाय आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, राजस्थान, कर्नाटक इ. राज्यांतही तो काढण्यात येतो.
पाटीच्या दगडाच्या लाद्यांचे ताणबल चांगले असते व त्या जांगल्या टिकाऊही असतात. त्यामुळे त्या मुख्यतः छपरे, फरशा, लिहिण्याच्या पाट्या, फळे, बिलियर्डची टेबले, थडगी इत्यादींसाठी वापरतात. पेन्सिली, भिंतीवरील शोभिवंत तक्ते (वॉल प्लेट), प्रयोगशाळेतील कुंड इत्यादींसाठीही या लाद्या वापरतात. हा दगड कणरूपात आणि चूर्णरूपातही वापरला जातो. कणरूपात तो मुख्यतः विद्युतीय निरोधक तक्ते, कौले इत्यादींमध्ये वापरतात तर विशिष्ट प्रकारची छपरे, काँक्रीट इत्यादींमध्ये याचे चूर्ण वापरले जाते. रबर, लिनोलियम, रंगलेप, प्लॅस्टिक इत्यादींमध्ये याचे चूर्ण भरण द्रव्य म्हणून वापरतात.
पहा : रूपांतरित खडक शेल.
ठाकूर, अ. ना.