पेलार्गॉनियम : (इं. जिरॅनियम ऑफ गार्डन्स जिरॅनियम ऑफ ग्रीन हाऊसेस कुल-जिरॅनिएसी). फुलझाडांपैकी (आवृतबीज,द्विदलिकित)एका वंशाचे नाव.याला सामान्यपणे जिरॅनियम म्हटले जाते तथापि खऱ्या जिरॅनियम वंशात व ह्यात फुलोरा आणि फुलांची संरचना ह्याबाबत फरक आहेत. पेलार्गॉनियम वंशात सु. २५० जाती असून काही अपवाद वगळल्यास बहुतेक सर्व दक्षिण आफ्रिकेतील आहेत. अनेक संकरज जाती व प्रकार फुलांच्या सौंदर्यामुळे बागांमध्ये लावण्यासाठी सर्वत्र लोकप्रिय झाले आहेत. ह्या सर्व वनस्पती ओषधीय [ ® ओषधि ]. क्वचित झुडपासारख्या, मांसल किंवा कठीण, सरळ, १ – १.२ मी. उंच किंवा पसरट वाढणाऱ्या आहेत. यांची पाने साधी, बहुधा सुगंधी, सोपपर्ण (उपपर्णे असलेली), समोरासमोर, अखंडित किंवा कमी जास्त विभागलेली असून फुलोरा चवरीसारखा आणि पानांच्या बगलेत येतो.
फुले अनियमित व विविधरंगी संवर्ताच्या पाच संदलांपैकी एकापासून लहान शुंडिका (नळीसारखा अवयव) येते. पुष्पमुकुटाच्या पाच पाकळ्यांपैकी दोन मोठ्या व भिन्न रंगांच्या व इतर अरुंद किंवा क्वचित फार लहान दहा केसरदलांपैकी सातावर किंवा कमीवर परागकोश असतात. किंजदले पाच [®फूल] फळ (बोंड) फुटून त्यांचे एकबीजी फलांश टोकास चिकटून परंतु खाली सुटे व स्वतंत्रपणे गुंडाळलेले असतात [® जिरॅनिएलीझ]. एकेरी व दुहेरी फुलांचे प्रकार आहेत: तसेच अनेक संकरज व प्रकार उपलब्ध आहेत.
या वंशातील काही जाती (पे.ग्रॅव्हिओलेन्स, पे. कॅपिटॅटम, पे. ओडोरॅटिसिमस इत्यादी) बहुवर्षांयू (अनेक वर्षे जगणारी) झुडपे असून फ्रान्स, इटली, कॉर्सिका, रशिया व आफ्रिका या प्रदेशांत आणि भारतात (शेवराय टेकड्या, निलगिरी व अन्नमलई ) लागवडीत आहेत. पानांपासून बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) जिरॅनियम तेल काढतात [® बाष्पनशील तेले] ते सुगंधाकरिता फार मोठ्या प्रमाणात साबण, सुगंधी तेले व प्रसाधने यांत वापरतात. त्यात ७५ – ८० % जिरॅनिऑल व सिट्रोनेलॉल असते. बहुतेक उच्च दर्जाच्या अत्तरांत जिरॅनियम तेल आधारभूत द्रव्य म्हणून वापरतात. तंबाखू असलेल्या पदार्थांत, दंतधावन चूर्णे, मलमे आणि कित्येक औषधी पदार्थ यांमध्ये हे तेल घालतात.
लागवडीकरिता या वनस्पतीस उबदार, सावलीची जागा व कोरडी हवा लागते. उत्तम सकस, भरपूर चुन्याचा अंश व कुजकट पदार्थ असलेली निचऱ्याची जमीन आवश्यक असते. तिला बहुवर्षांयूप्रमाणे वाढवावयाची असल्यास खत देणे जरूर असते शेणखत, वापरलेल्या वनस्पतींचा चोथा व अकार्बनी खते घालतात. उन्हाळ्यात पाणी द्यावे लागते. दक्षिण भारतात जुलै ते ऑगस्टमध्ये खोडाची कलमे लावून लागवड करतात. एका हेक्टरात सु. १२,३०० रोपे लावता येतात व रोपांमधील अंतर ३०–९० सेंमी. आणि त्यांच्या दोन ओळींतील अंतर सु. १ मी. ठेवतात. पानांची तोड प्रथमत: फेब्रुवारी ते मार्चमध्ये आणि त्यानंतर पुन्हा जून – जुलैत व ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये करतात. हे मळे ३ – ५ वर्षे टिकतात. तथापि चांगली मशागत चालू ठेवल्यास ७ वर्षांपर्यंत पीक मिळते. भारतात पाने व शाखांपासून ऊर्ध्वपातनाने तेल काढतात. दरवर्षी साधारणत: दर हेक्टरी १७ – २२ किग्रॅ. तेल मिळते. भरपूर खतावलेल्या नवीन जमिनीत ३३ किग्रॅ. तेल मिळते. ते स्वच्छ पिवळट ते तपकिरी रंगाचे असून त्यास गुलाबाचा तीव्र वास येतो. एकदोन वर्षे ठेवल्यावर तोच वास सुधारतो. भिन्न प्रदेशांतील तेलांच्या वासात फरक असतो. फ्रेंच तेलाचा वास सर्वोत्तम मानला गेला आहे. ð रोशा गवत व ð गुच्छ यांच्या तेलांची ( सिट्रोनेला तेल व पाम रोजा तेल यांची ) जिरॅनियम तेलात भेसळ करतात. भारतात जिरॅनियम तेलाचे उत्पादन पुरेसे होत नसल्याने त्याची आयात विशेषत: फ्रान्स, ब्रिटन व नेदर्लंड्स येथून करण्यात येते.
फ्युजेरियम, पिथियम आणि र्हायझोक्टोनिया सोलॅनी ह्या कवकांपासून ( बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींपासून ) या वनस्पतींना रोग होतो. प्रारंभिक अवस्थेत छाटणी केल्यास रोगास आळा बसतो. ५ % बोर्डो मिश्रण फवारल्यास कवकांचा नाश होतो.
संदर्भ : 1. Badhwar, R.L. and others, Some Useful Aromatic Plants, New Delhi,1964.
2. C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol.Vll, New Delhi,1966.
परांडेकर, शं. आ.
“