जाति : (लॅ. स्पीशिज्). वनस्पती आणि प्राणी यांच्या वर्गीकरणात उपयोगात आणले जाणारे सर्वांत लहान असे व क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) दृष्टीने महत्त्वाचे असे एकक. साधारणपणे सारख्या प्रकारच्या आणि परस्परांशी संबंध असलेल्या जीवांचा ज्या गटात समावेश केला जातो, त्याला वंश म्हणतात आणि अशा वंशातील प्रत्येक प्रकाराला सामान्यपणे ‘जाती’ म्हणतात. सृष्टीत सामान्यतः आढळणारा प्राण्याचा अथवा वनस्पतीचा प्रत्येक भिन्न प्रकार (उदा., हत्ती, उंट, मनुष्य, वड, पिंपळ, तुळस इ.) म्हणजे एक जाती होय. या प्रत्येक जातीची प्रत्यक्ष दिसणारी वेगवेगळी लक्षणे असल्याने जाती ही जीवविज्ञानातील एक महत्त्वाचे एकक ठरते. सध्या सु. दहा लाख प्राणी आणि तीन लाख वनस्पती जाती ह्या संज्ञेने ओळखल्या जातात. पण जगातील सर्व जातींची नोंद पूर्ण होईल त्या वेळी जीवांच्या भिन्न जातींची संख्या वरील संख्येच्या दुप्पट होईल, असा जीववैज्ञानिकांचा कयास आहे. अनेक जीववैज्ञानिकांनी जातीच्या व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे केल्या आहेत, कारण अर्थपूर्ण व सर्वसंग्राहक अशी एकच व्याख्या करणे कठीण आहे. मायर व डॉब्झन्स्की यांनी केलेल्या व्याख्यांत तीन बाबींवर भर दिलेला आढळतो : एका जातीतील व्यक्तीत मुक्त नैसर्गिक प्रजनन असते, त्या सर्वांत समान जनुकसंच [जीव-संच → जीन] असतो आणि दोन भिन्न जातींतील व्यक्ती परस्परांपासून प्रजोत्पादन करू शकत नाहीत. याच अर्थाची व्याख्या ए. इ. एमर्सन यांनी दिली आहे (१९४५). जाती म्हणजे क्रमविकसित वा  क्रमविकास चालू असलेली, जननिक दृष्टीने इतरांपासून भिन्नता दाखविणारी आणि प्रजोत्पादनाच्या दृष्टीने अलग झालेली नैसर्गिक जीवसंख्या होय. जाती ही संज्ञा मूलत: व्यक्तींचा आकार किंवा दृष्य स्वरूप इ. लक्षणे समाविष्ट करण्याच्या हेतूने जरी वापरली गेली असली, तरी आजकाल जननिक व क्रमविकासाच्या दृष्टीकोनांतूनही ती वापरली जाऊ लागली आहे. अर्थात ज्या जीवांमध्ये लैंगिक प्रजनन नसते, त्यांची व्याख्या करणे काहीसे कठीण असते व तेथे जातींतील फरक त्यांच्या आकारवैज्ञानिक, क्रियावैज्ञानिक किंवा जीवरासायनिक लक्षणांवरून ठरवितात. परंतु सलिंगता असलेल्या जीवांच्या अशा गटास जाती म्हणतात की, ज्यातील व्यक्तींत मुक्तपणे प्रजनन होऊ शकते व ज्यांची पूर्वजपरंपरा समान असते. तसेच त्यांत संरचना, क्रियाविज्ञान वर्तनाचे प्रकार, अनुकूलन व रासायनिक संघटन अशा अनेक बाबतींतही साम्य असते. भिन्न जातींतील व्यक्तींत नैसर्गिक रीत्या प्रजनन होत नाही, परंतु कृत्रिम रीत्या क्वचित घडवून आणले जाऊ शकते [→ पशु प्रजनन, वनस्पति प्रजनन] व संकरज निर्माण होतात व अनेकदा असे संकरज वंध्य असतात (उदा., घोडी व गाढव यांपासून निर्माण झालेले खेचर).

जाती ह्या संज्ञेशी इतरही काही संज्ञा निगडीत आहेत. उदा., उपजाती, प्रजाती इत्यादी. बऱ्याच मोठ्या प्रदेशावर पसरलेल्या एखाद्या जातीतील जीवसंख्येत स्थानिक वा प्रादेशिक परिस्थितीतील फरकानुसार जीवांच्या लक्षणात किरकोळ बदल घडून येतात व त्यांमुळे त्यांचे लहान गट पडू शकतात पण त्या सर्वात प्रजननदृष्ट्या अलगीकरण पूर्ण असत नाही. अशा लहान गटास ‘उपजाती’ असे म्हणतात. ‘प्रजाती’ ही संज्ञा कधी उपजातीपेक्षा कमी दर्जाच्या वापरतात. कारण उपजातीतल्यापेक्षा त्यातील प्रजननिक अलगीकरण कमी असते. अनेक उपजातींचे गट कधीकधी भौगोलिक किंवा क्रियावैज्ञानिक दृष्ट्या परस्परांची जागा भरून काढतात व त्यांमध्ये फक्त विरुद्ध टोकांस असलेल्यांमध्येच महत्त्वाची अलगता आढळते या टोकांना जोडणाऱ्या गटांमध्ये संकर घडून येतो व त्यांत अंतराश्रेणीकरण असते. (मध्यंतरीचे टप्पे किंवा श्रेणी असतात), अशा गटांना अधिजाती म्हणतात. सर्प, पक्षी व सस्तन प्राणी यांमध्ये अशी काही उदाहरणे आहेत की, एका एका जातीतील काही उपजातींत अंतरावंध्यत्व आढळते. नैसर्गिक परिस्थितींने मर्यादित केलेल्या जातींना स्थितिरूप म्हणतात. समान परिस्थितीत सारखीच जनुकविधा असलेल्या जीवसंख्येस समानजनुकी म्हणतात. हा प्रकार अलैंगिक किंवा लैंगिक जातीतील एका व्यक्तीच्या अलिंग प्रकारच्या प्रजोत्पादनापासून निर्माण झालेल्या जीवसंख्येत आढळतो. काही समानजनुकी समांतर उत्परिवर्तनांपासून [आनुवंशिक लक्षणांमध्ये होणाऱ्या एकाएकी बदलांपासून → उत्परिवर्तन] उद्‌भवणे शक्य आहे ⇨कृत्तक  हा प्रकार यातच समाविष्ट होतो. अनेक अवतरण रेषांच्या प्रजातीय जटिलापासून बनलेल्या जालकास वंश–परंपरा म्हणतात. एखाद्या जातीतील प्रारूपिक (नमुनेदार) व्यक्तीहून निश्चित वर्णनीय फरक दर्शविणाऱ्या व्यक्तीस किंवा व्यक्तींच्या गटास ‘प्रकार’ ही संज्ञा वापरतात, अशा भिन्न गटांमध्ये भौगोलिक किंवा परिस्थितिविज्ञानाच्या संदर्भात सहसंबंध नसतात. जातींना किंवा जातीच्या विभागांना क्रियावैज्ञानिक गुणांतील फरकांवरून जीववैज्ञानिक किंवा क्रियावैज्ञानिक जाती असे म्हणतात याचे कारण जननिक स्वरूपाचे असते. अलगता पूर्ण झाल्यावर ज्या जाती बनतात अशा अंशतः अलग झालेल्या व अपसारी (निराळ्या तऱ्हेने विकसित होणाऱ्या) जीवसंख्येला आरभमाण जाती असे म्हणतात.

इतिहास : ऐतिहासिक दृष्ट्या जीवविज्ञानातील जाति–कल्पना फार जुनी आहे, असे दिसून येते. ॲरिस्टॉटल (ख्रि. पू. ३८४–३२२) यांनी ही संज्ञा समान लक्षणे असलेल्या जीवांच्या गटांना वापरली. जॉन रे (१६२७–१७०५) यांनी एका जातीतील व्यक्तींतच परस्परांमध्ये प्रजननक्षमता असते, हे दाखविले होते. कार्ल लिनीअस (१७०७–१७७८) यांनी द्विपद नाम पद्धतीचे वर्गीकरण सुरू केले. त्यात प्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट जातीचा घटक मानून समान अथवा जवळच्या जातींच्या अंतर्भाव एका वंशात केला, वंशानंतर कुल, गण, वर्ग, विभाग इ. क्रमावर व्यापक गटांचा समावेश करून एकूण वर्गीकरण पद्धतीची संरचना पूर्ण केली [→ प्राण्यांचे वर्गीकरण वनस्पतींचे वर्गीकरण]. प्रत्येक वनस्पती किंवा प्राणी याच्या दुहेरी नावातील पहिला भाग वंशदर्शक आणि दुसरा जातिदर्शक असल्याने अशा केवळ नावावरून एका वंशातील अनेक जातींचे आप्तभाव कळून येण्यास मदत होते. सर्व जाती स्थिर व अपरिवर्तनीय आहेत, अशी लिनीअस यांची सुरुवातीस भावाना होती. परंतु पुढे नंतरच्या जातींचा उगम, प्रथम निर्माण झालेल्या वंशरूप जातीपासून झाला असून जातींच्या परस्परसंकरातून पुढील प्रजावाढ होते, असे त्यांचे मत झाले. यानंतर एकोणिसाव्या शतकात लामार्क आणि डार्विन यांच्या संशोधनकार्यामुळे क्रमविकाससिद्धांत प्रस्थापित झाला आणि जाती ह्या स्थिर एकके नव्हेत, तर त्यांत बदल होत जातो आणि नवीन जाती क्रमाने विकास पावून तयार होतात, या कल्पना स्वीकारल्या गेल्या. एम्. वॅगनर (१८१३–८७) आणि जे. टी. ग्यूलिक (१८३२–१९२३) यांनी नव्या जातींच्या निर्मितीत अलगीकरण हा घटक जबाबदार असतो, असे दाखविले. यानंतर एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास ग्रेगोर मेंडेल यांनी केलेल्या, परंतु १९०० मध्ये इतर शास्त्रज्ञांच्या नजरेस आलेल्या प्रयोगांमुळे आजच्या आनुवंशिकीचा पाया घातला गेला. तसेच अलीकडील लोकसंख्येसंबंधीच्या आनुवंशिकीची त्यामुळे प्रगती झाली व परिणामी जातीसंबंधीच्या कल्पनांत सुधारणा झाली व क्रमविकास कल्पना अधिक स्पष्ट झाली. आरंभी दिलेल्या जातीसंबंधीच्या कल्पना क्रमविकासाची यंत्रणा व नवीन जातींची निर्मिती यांसंबंधीच्या ज्ञानावर व अनुभवावर आधारलेल्या आहेत, हे स्पष्ट आहे. 

जाति-उद्‌भवन : क्रमविकासाची एक महत्त्वाची बाब म्हणजे जुन्या जातींपासून नवीन जातींची निर्मिती किंवा जाति-उद् भवन ही होय. जाति-जातींतील भेद, त्यांचे अतिजीविता–मूल्य व नैसर्गिक निवड यांचा येथे संबंध येतो [→ क्रमविकास]. उत्परिवर्तने व रंगसूत्रांतील (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांतील ) बदल [→ आनुवंशिकी कोशिका] हेही नवीन जातींच्या निर्मितीस कारणीभूत ठरतात. जाति-उद्‌भवनाचे दोन प्रकार संभवतात :  संघीय क्रमविकास आणि विपाटन. क्रमविकासात जुन्या जातींपासून दीर्घकालानंतर नवीन जाती उद्‌भवतात. त्यामुळे नव्या-जुन्यातील फरक जाणवतो, परंतु कोणत्याही वेळी जुनी कोठे संपली व नवीन कोठे सुरू झाली, हे सांगणे कठीण असते. विपाटनात एका जातीपासून दोन किंवा अधिक जाती क्रमाने विकसित होतात व एखाद्या वेळी काही घटकांमुळे पूर्वीच्या एका गटाचे दोन किंवा अधिक गट पडतात. यामुळे दोन किंवा अधिक संघीय रेषांचा विकास मंदपणे चालू राहतो. हा घटक मूळच्या व्यक्तींच्या किंवा गटांच्या अंतःप्रजननात अडथळे आणून प्रजननात अलगता निर्माण करतो, म्हणून त्यास ‘अलगीकरण यंत्रणा’ म्हणतात. समुद्र, अती उंच पर्वत, वाळवंट, हिमनदी ही अशा घटकांची उदाहरणे होत. दोन गटांतील व्यक्तींच्या प्रजननाच्या कालमानात बराच फरक झाल्यास परस्परांतील प्रजननात अडथळा निर्माण होऊन जननिक अलगता येते व दोन स्वतंत्र विकास रेषा चालू राहतात व कालांतराने अंतरावंध्यत्व येऊन दोन नवीन जातींचे गट उदयास येतात. अलगीकरणाच्या काळात दोन किंवा अधिक गटांत जलद गतीने जननिक बदल होत गेल्यास नवीन जातींची निर्मितीही जलद होते. जाति-उद्‌भवनात जननिक भिन्नत्वाला मौलिक महत्त्व आहे. ⇨ बहुगुणनामुळे वनस्पतींत नवीन जाती उद्‌भवल्या आहेत. तसेच संकरामुळेही काही जीवांनी नवीन जातींत भर घातली आहे.

पहा: आनुवंशिकी क्रमविकास प्राणिनामपद्धति वनस्पतिनामपद्धति.

संदर्भ : 1. Hickman, C. P. Integrated Principles of Zoology, Tokyo. 1966.

   2. Villee, C. A. and others, General Zoology, Tokyo, 1968.

  3. Whaley W. G. and others, Principles of Botany, New York, 1964

परांडेकर, शं. आ.