जॅस्पर : खनिज. कणमय, घट्ट, चिवट आणि गूढस्फटिकी (अतिसूक्ष्म स्फटिकयुक्त) क्वॉर्ट्झाचा प्रकार. ते बहुधा लाल असते व हेमॅटाइटाच्या समाविष्टांमुळे हा लाल रंग येतो. हे कधीकधी उदी, करडे, हिरवे, पिवळे वा निळेही असते. त्याच्यात असणाऱ्या मृण्मय द्रव्यामुळे ते अपारदर्शक असते. चमक ग्रीजासारखी मंद असून त्याला चांगली झिलई देता येते. कठिनता ६·५. वि.गु. २·५७–२·६४. ते वातावरणातील व जमिनीतील पाण्याने किंवा जलपातीय (उच्च तापमानाच्या) विद्रावांद्वारे निक्षेपित होते (साचते). अग्निज खडकांतील शिरांमध्ये व पोकळ्यांत गाळाच्या व रूपांतरित खडकांमध्ये संधितांच्या व प्रतिष्ठापित रूपांत तसेच डबरी गोट्यांमध्येही जॅस्पर आढळते. सायबीरिया, ग्रीस, भारत, पोलंड, तुर्कस्तान, ब्राझील, कॅनडा, जर्मनी इ. भागांत जॅस्पर सापडते. ते मुख्यतः दागिने, कोरीव काम, गृहांतर्गत सजावट इत्यादींसाठी व चांगले जॅस्पर रत्न म्हणून वापरतात. बायबलमध्ये जॅस्परचा उल्लेख आढळतो.

पहा : क्वॉर्ट्‌झ रत्ने सिलिका गट.

ठाकूर, अ. ना.