जॅक्सन अँड्रू : (१५ मार्च १७६७–८ जून १८४५). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा सातवा व सामान्य माणसांतून निवडून आलेला पहिला राष्ट्राध्यक्ष. १८२८ ते १८३६ हा कालखंड ‘जॅक्सन कालखंड’ म्हणून अमेरिकेच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. जॅक्सनचा जन्म सामान्य कुटुंबात वॅक्सहॉ (द. कॅरोलायना) येथे झाला. त्याच्या जन्मापूर्वीच वडील वारले व लहानपणीच आई वारली होती त्यामुळे तो पोरका झाला. आजोबांनी ठेवलेल्या ३०० पौंडांची त्याने उधळण केली. कसेबसे शालेय शिक्षण घेऊन त्याने कायद्याचा अभ्यास केला आणि टेनेसीमध्ये जॉन मॅक्नेरीच्या हाताखाली सॉलिसिटरचे काम तो पाहू लागला (१७८८). पुढे त्याची तिथेच न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली पण शेती करण्याकरिता त्याने १८०४ मध्ये ही नोकरी सोडली. तिथेही त्याचे फारसे बस्तान बसले नाही. म्हणून तो लष्करात गेला आणि मेजर जनरलच्या पदापर्यंत पोहोचला (१८१२). या सुमारास अमेरिकन इंडियन लोकांचा तसेच ब्रिटिशांचा उपद्रव वाढला होता. म्हणून त्यास टेनेसीचा सेनापती करण्यात आले. प्रथम त्याने अमेरिकन इंडियन लोकांचा पराभव केला आणि नंतर ब्रिटिशांचा परामर्श घेतला (१८१५). या विजयांमुळे राष्ट्रवीर म्हणून त्याचा सर्वत्र लौकिक वाढला. १८१७ मध्ये त्याने दक्षिणेकडील सेमिनोल इंडियनांचा पराभव केला. या लष्करी विजयांमुळे त्याच्या मित्रांनी त्यास १८२४ ची अध्यक्षीय निवडणूक लढविण्याची विनंती केली. १८२३ मध्ये तो सिनेटवर निवडून आला, पण पुढील अध्यक्षीय निवडणुकीत पराभूत झाला. काही काळ त्याच्याकडे फ्लॉरिडाचे तात्पुरते गव्हर्नरपद आले (१८२१). नंतर मात्र तो १८२८ व १८३२ यांतील अध्यक्षीय निवडणुकांत यशस्वी झाला.

 जॅक्सनचे मूलभूत धोरण केंद्रसत्ता बळकट करणे हे होते. अमेरिकेचे संघराज्य टिकलेच पाहिजे असा त्याचा आग्रह होता. त्यामुळे राज्यांच्या फुटीर वृत्तीस त्याने पायबंद घातला. अध्यक्षाचा जनतेशी प्रत्यक्ष संपर्क असावा, या मताचा तो एक होता. राज्य लोकांनी केले पाहिजे, ही त्याची घोषणा होती. म्हणून त्याच्या कारकीर्दीस सामान्य माणसाच्या उदयाचा काळ असे म्हणतात. अमेरिकेच्या डेमॉक्रॅटिक पक्षाचा तो एक प्रमुख संस्थापक होता आणि राष्ट्रीय राजकीय संमेलनातून अध्यक्षीय उमेदवाराची निवड व्हावी, ही प्रथा त्याने पाडली. बँकांची तपासणी करून त्यांवर त्याने शासनाचा अधिकार प्रस्थापित केला. एकूण अमेरिकेच्या राजकारणास त्याने नवीन वळण लावले व अध्यक्षीय निवडणुकीत उपयोगी पडलेल्यांची योग्य ती दखल घेऊन त्यांना नोकऱ्या, बक्षिसे इ. देण्याची प्रथा पाडली. एवढेच नव्हे, तर स्पॉइल पद्धती अंमलात आणली. निवृत्तीनंतरही अमेरिकेच्या राजकारणावर विशेषतः डेमॉक्रॅटिक पक्षाच्या धोरणावर त्याचा प्रभाव दिसून येतो.

 खासगी जीवनात जॅक्सन विशेष सुखी नव्हता. लहानपणापासूनच्या हालअपेष्टांमुळे तो बेडर, अनेकदा अविचारी व उद्धट बनला होता. बाल्यावस्थेत पोरकेपणा नशिबी आला. ऐन उमेदीत त्याने रेचेल या लूविस रोबार्ड्‌सच्या परित्यक्ता पत्नीशी १७९१ मध्ये विवाह केला, पण रोबार्ड्‌सने १७९४ पर्यंत तिला घटस्फोट दिला नाही. त्यामुळे जॅक्सनवर व्यभिचारी, चारित्र्यहीन वगैरे आरोप लादण्यात आले. तेव्हा १७९४ मध्ये त्याने तिच्याशी पुन्हा लग्न केले. त्याला संतती झाली नाही, म्हणून त्यांनी दत्तक घेतला. रेचेल ही त्याची पत्नी अध्यक्षीय अधिकारग्रहणाच्या समारंभापूर्वीच मरण पावली. उर्वरित काळात त्याला कर्ज झाले. नॅशव्हिल या ठिकाणी त्याने एक मोठा हर्मिटेज नावाचा बंगला बांधला, तेथेच तो मरण पावला.

 संदर्भ : 1. Remini, R. V. Andrew Jackson, New York, 1966.

            2. Schlesinger, A. M. History of American, Presidential Elections, Vol. I, 1971.

           3. Schlesinger, A. M. The Age of Jackson, Boston, 1945.

देशपांडे, सु. र.