जळू : ॲनेलिडा संघातील हिरुडिनिया वर्गात सगळ्या जळवांचा समावेश होतो. बहुतेक जळवा गोड्या पाण्यात राहणाऱ्या आहेत पण काही समुद्रातील माशांच्या, कूर्मांच्या किंवा क्रस्टेशियन (कवचधारी) प्राण्यांच्या शरीरावर परजीवी (दुसऱ्या जीवावर जगणाऱ्या) असतात व काही जमिनीवर दमट किंवा दलदलीच्या जागी राहतात. त्यांच्या शरीराच्या पुढच्या आणि मागच्या टोकावर एकेक चूषक (द्रव पदार्थ ओढून घेणारा अवयव) असून त्यांचा उपयोग एखाद्या वस्तूला चिकटण्याकरिता आणि संचलनाकरिता होतो.

 सामान्य वर्णन : सर्वसाधारणपणे जळूचा रंग करडा तपकिरी किंवा तपकिरी हिरवा असतो. काहींचे रंग तकतकीत असतात. शरीर लांब किंवा अंडाकृती असून वरून खाली चपटे असते. ते अतिशय लवचिक असल्यामुळे पुष्कळ आखडता येते, अतिशय ताणून लांब करता येते किंवा पसरता येते. ते ३४ खंडांचे बनलेले असते, पण प्रत्येक खंडाच्या पृष्ठावर खोबणींची १–५ वलये असतात. शरीराच्या मागच्या टोकाशी असणारा चूषक मोठा आणि वाटोळा असून सात खंडांपासून तयार झालेला असतो. पुढच्या टोकाशी मुखाभोवती चार खंडांपासून बनलेला लहान चूषक असतो.

आ. १. जळू (हिरुडो मेडिसिनॅलिस) : (अ) पृष्ठीय दृश्य : (आ) अधर : (१) डोळ्यांची पहिली जोडी, (२) डोळ्यांची पाचवी जोडी, (३) गुद्द्वार, (४–४) पश्च चूषक, (५) वृक्कक रंध्रांची सतरावी जोडी, (६) स्त्री-जनन रंध्र, (७) पु-जनन रंध्र, (८) वृक्कक रंध्रांची पहिली जोडी, (९) अग्र चूषक, (१०) मुख.

शरीर उपत्वचेने आच्छादिलेले असते. हिच्या खाली एक-स्तरी बाह्यत्वचा असते. हिच्या कोशिकांच्या (पेशींच्या) आतल्या टोकांच्या मधून जागा असून तीत रुधिर केशिका (सूक्ष्म रक्तवाहिन्या), तंत्रिकान्त (मज्जांची टोके), रंगकोशिका आणि चर्माचे तंतू शिरलेले असतात. बाह्यत्वचेपासून उत्पन्न झालेल्या पुष्कळ श्लेष्मग्रंथी (बुळबुळीत स्त्रावस्त्रवणाऱ्या ग्रंथी) बाह्यपृष्ठावर उघडतात. बाह्यत्वचेखाली चर्म असून ते तंतुमय संयोजी ऊतकाचे (समान रचना व कार्य असणाऱ्या व जोडणाऱ्या पेशीसमूहाचे) बनलेले असते व त्यात रंगकोशिका व रुधिर केशिका असतात. चर्माच्या खाली त्याला लागून स्नायुतंतूंचा गोलाकार थर असतो याच्या खाली तिरप्या स्नायूंचा एक थर आणि त्याच्या खाली अनुदैर्घ्य (उभ्या) स्नायूंचा एक जाड थर असतो. यांशिवाय देहभित्तीपासून आंतरांगांना जाणारे अरीय स्नायू व खंडशः मांडणी असलेले उत्तराधर स्नायू असतात. सर्व स्नायू अतिशय बळकट असतात. आहारनाल (अन्नमार्ग) आणि देहभित्तीचे स्नायू यांच्या मध्ये एक विशेष प्रकारचे ऊतक असते, त्याला गुच्छ-ऊतक म्हणतात. यात देहगुहीय (शरीरातील पोकळीतील) रुधिर कोटर तंत्राच्या सूक्ष्म प्रणालांचे (मार्गांचे) जाळे आणि तपकिरी रंगद्रव्याने भरलेल्या लहान कोशिका असतात. या ऊतकामुळे देहगुहेचा ऱ्हास होऊन काही कोटरांच्या स्वरूपात ती शिल्लक राहते.

आ. २. उपत्वचा व आहारनाल यांच्या मध्ये असणारी ऊतके दाखविणारा जळूच्या शरीराचा अनुप्रस्थ (आडवा) छेद : (१) चर्म, (२) रंग-कोशिका, (३) वर्तुळाकार स्नायू, (४) तिरपे स्नायू, (५) उपत्वचा, (६) बाह्यत्वचा, (७) श्लेष्म ग्रंथी, (८) अनुदैर्घ्य स्नायू, (९) रुधिर केशिका, (१०) संयोजी ऊतक, (११) आहारनाल, (१२) रुधिर कोटर, (१३) उत्तराधर स्नायू, (१४) गुच्छ-ऊतक.

पचन तंत्र : पचन नलिकेचे पुढील मुख्य भाग असतात. (१) मुख : मुखाभोवती तीन जंभ (जबड्यासारखे अवयव) असून त्यांच्या वर पुष्कळ दात असतात काही जळवांच्या मुखात शुंड (सोंड) असतो (२) स्नायुमय ग्रसनी : ग्रसनीभोवती (मुखगुहेच्या लगेच मागे असलेल्या आहारनालाच्या अग्रभागाभोवती) पुष्कळ एककोशिक लाला ग्रंथी असून त्या मुखात उघडतात (३) आखूड ग्रसिका (ग्रसनी आणि जठर यांच्यामधील आहारनालाचा भाग) (४) अन्नपुट (अन्न साठविण्यासाठी आहारनालाचा झालेला पिशवीसारखा विस्तार) : हे लांब असून त्याच्या बाजूंवरून अंधवर्धाच्या (एखाद्या पोकळीपासून निघालेल्या व बाहेरच्या टोकाशी बंद असलेल्या नळ्यांच्या) वीसपर्यंत जोड्या निघालेल्या असतात मांसाहारी जळवांमध्ये अशा अंधवर्धांच्या जोड्या मुळीच नसतात (५) जठर (६) बारीक आंत्र (आतडे) (७) आखूड मलाशय आणि (८) गुदद्वार : हे मागचा चूषक आणि शरीर यांच्या जोडावर वरच्या बाजूला असते.

काही जळवा मेलेले प्राणी खातात तर काही लहान कृमी, कीटक, डिंभ (अळ्या), मॉलस्क (मृदुकाय) प्राणी इत्यादींवर उदरनिर्वाह करतात पण काही जळवा मात्र इतर प्राण्यांचे रक्त शोषून घेऊन त्यावर उपजीविका करतात. माशांपासून माणसांपर्यंत विविध पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांचे रक्त त्या शोषतात परंतु यांपैकी काही जळवांना एका ठराविक जातीच्या प्राण्यांचे रक्त चालते व काहींना थोड्या जातींचे चालते. जळू आपल्या चूषकांनी प्राण्याच्या शरीराला चिकटते. ज्यांना शूंड असतो त्या आपल्या शूंडाने त्वचेला भोक पाडतात आणि ज्यांना जंभ असतात त्या जंभांनी त्वचेला Y च्या आकृतीसारख्या तीन चिरा पाडतात. ग्रसनीच्या शोषण क्रियेने जळू भोकातून अथवा चिरांमधून पोषकाचे रक्त शोषून घेऊन अन्नपुटात व त्याच्या अंधवर्धांत ते साठविते. रक्त साठविल्यामुळे अन्नपुट आणि अंधवर्ध फुगून खूप मोठे होतात. चोखलेल्या रक्तात जळू लाळ मिसळते आणि लाळेतील हिरुडीन या एंझाइमाच्या (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थाच्या) क्रियेने रक्त साखळत नाही. जठरात अन्नाचे पचन होते पण ही पचनक्रिया इतकी मंद गतीने होत असते की, एका वेळी शोषून घेतलेले रक्त पचण्यास सु. नऊ महिने लागतात.

 


परिवहन तंत्र : रक्त तांबडे असून हीमोग्लोबीन त्याच्या प्लाविकेत (रक्तातील द्रव पदार्थात) विरघळलेले असते. परिवहन (रुधिराभिसरण) तंत्र उत्तर, अधर व दोन पार्श्विक (बाजूच्या) अनुदैर्घ्य रक्तवाहिन्यांचे बनलेले असते. या वाहिन्यांना जोडणाऱ्या पुष्कळ अनुप्रस्थ (आडव्या) वाहिन्या असतात. उत्तर व अधर वाहिन्या कोटराच्या (पोकळीच्या) स्वरूपाच्या असल्यामुळे त्यांच्या भित्ती स्नायुमय नसतात. पार्श्विक रक्तवाहिन्यांच्या आकुंचन-प्रसरणामुळे शरीरात रुधिराभिसरण होते. हिला स्वतंत्र श्वसनेंद्रिये नसतात. केशिकांतून त्वचेला रक्ताचा भरपूर पुरवठा होतो, त्यामुळे ती श्वसनाचे कार्य करते. एका परजीवी जातीत क्लोमांसारखी (माशांच्या कल्ल्यांसारखी) श्वसनेंद्रिये असतात. निरुपयोगी द्रव्ये शरीराबाहेर टाकणारे उत्सर्जन तंत्र वृक्ककांच्या (शरीरातील निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकणाऱ्या नळीसारख्या इंद्रियांच्या) १७ जोड्यांचे बनलेले असते. गांडुळाच्या वृक्ककांसारखेच हे वृक्कक असतात पण कधीकधी त्यांना शाखा असतात, तर कधीकधी काहींचे वृक्ककमुख बंद असते.

आ. २. जळू (हिरुडो मेडिसिनॅलिस) . (अ) आहारनाल दाखविण्याकरिता वरच्या बाजूकडून केलेले विच्छेदन (आ) वृक्कक, जननेंद्रिये आणि तंत्रिका तंत्र दाखविण्याकरिता केलेले विच्छेदन : (१) जंभांची जागा, (२) ग्रसनी, (३) अरीय स्नायू, (४) अन्नपुट, (५) पृष्ठीय रक्तवाहिनी (कोटर), (६) आंत्र, (७) अन्नपुटाचा शेवटचा अंधवर्ध, (८) मलाशय, (९) गुदद्वार, (१०) एकविसावी गुच्छिका, (११) सतरावा वृक्कक, (१२) दहावा वृषण, (१३) अधर तंत्रिका रज्जू, (१४) पहिला वृषण, (१५) अंडाशय, (१६) शिश्न-कोश, (१७) वृक्कक-आशयक, (१८) दुसरा वृक्कक, (१९) अधोग्रसिका गुच्छिका, (२०) मेंदू.

तंत्रिका तंत्र : जळूचे तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) इतर ॲनेलिडांच्या  सारखेच असते. मेंदू ग्रसनीच्या पुढच्या टोकाच्या वर असून दोन गुच्छिकांच्या (ज्यांतून तंत्रिका तंतू बाहेर पडतात अशा तंत्रिका कोशिकांच्या समूहांच्या) एकीकरणाने बनलेला असतो. अधर तंत्रिकारज्जू (मज्जारज्जू) दुहेरी असून तिच्यावर गुच्छिका असतात. पहिली गुच्छिका मोठी असून ती गुच्छिकांच्या चार जोड्यांच्या एकीकरणाने बनलेली असते व दोन आखूड संयोजकांनी मेंदूशी जोडलेली असते. शेवटची गुच्छिका पहिलीपेक्षा मोठी असून गुच्छिकांच्या सात जोड्यांच्या एकीकरणाने बनलेली असते. प्रत्येक गुच्छिकेपासून तंत्रिकांच्या कित्येक जोड्या निघालेल्या असतात. जळवांमध्ये पुढील ज्ञानेंद्रिये आढळतात : मुखामध्ये रुचिकोशिका असतात ओठांवर आणि शरीरावर स्पर्शेंद्रिये असतात अग्र टोकाजवळ शरीराच्या वरच्या पृष्ठावर डोळ्यांच्या १–५ जोड्या असतात एका खंडात एक जोडी याप्रमाणे पहिल्या पाच खंडांत त्या असतात. शरीरावरील कित्येक वलयांवर बारीक ज्ञानेंद्रिये असतात त्यांची संरचना डोळ्यासारखीच असते, पण त्यांचे नक्की कार्य कोणते ते माहीत झालेले नाही.

जनन तंत्र : जळवा उभयलिंगी (पुं-आणि स्त्री-जननेंद्रिये एकाच व्यक्तीत असणाऱ्या) असतात.

 पुं-जननेंद्रिये : अन्नपुटाच्या खाली वृषणांच्या (पुं-जनन ग्रंथीच्या) ४–१२ जोड्या असतात. प्रत्येक बाजूला असणारे सगळे वृषण (एका ओळीत असलेले) पुढच्या बाजूला जाणाऱ्या एका रेतवाहिनीला जोडलेले असतात व या दोन्ही रेतवाहिन्या मध्यस्थित शिश्नात शिरतात. शिश्न शरीराच्या अग्र टोकाकडे व अधर पृष्ठाच्या मध्य रेषेवर असणाऱ्या पुं-जनन रंध्राच्या आतल्या बाजूला असते. शिश्नाला साहाय्यक ग्रंथी जोडलेल्या असतात.

 स्त्री-जननेंद्रिये : अंडाशय (स्त्री-जनन ग्रंथी) दोन असून प्रत्येक अंडाशय एका कोशात असतो. प्रत्येक कोशापासून एक अंडवाहिनी निघते. दोन्ही अंडवाहिन्या थोड्या अंतरावर एक होऊन एकच वाहिनी बनते. या समाईक वाहिनीच्या भित्तीत एककोशिक ग्रंथी असतात, त्या श्वेतक (अंड्यातील पांढरे पोषक द्रव्य) उत्पन्न करतात. ही वाहिनी स्नायुमय योनीत शिरते. योनी अधर पृष्ठाच्या मध्य रेषेवर पुं-जनन रंध्राच्या मागे असलेल्या स्त्री-जनन रंध्राने बाहेर उघडते. मैथुनक्रियेत दोन व्यक्तींची अधर पृष्ठे एकमेकांना अशा तऱ्हेने चिकटतात की, एकीचे शिश्न दुसरीच्या स्त्री-जनन रंध्रासमोर येते. परस्परांच्या शुक्राणूंनी (पुं-प्रजोत्पादक कोशिकांनी) परस्परांच्या अंड्यांचे निषेचन (फलन) होते. दोन्ही जळवांच्या शरीराच्या ९–१२ या खंडांवर एक कोकून (कोशावरण) तयार होते व त्यात निषेचित अंडी पोषक श्वेतकासहित बंद केली जातात. जळू कोकून शरीरावरून काढून पाण्याच्या तळाशी असलेल्या चिखलात, दलदलीच्या जागी किंवा मातीत पुरते वा दगडांना वा जलवनस्पतींना चिकटविते. कोकूनमध्ये निषेचित अंड्यांचा विकास होऊन काही आठवड्यांनंतर पिल्ले बाहेर पडतात. जळवांमध्ये डिंभावस्था म्हणजे भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील अवस्था नसते.

 उपयोग व उपद्रव : यूरोप व आशिया खंडांत सगळीकडे हिरुडो  वंशाच्या जळवा आढळतात. भारतात सामान्यतः आढळणाऱ्या जळवा हिरुडिनेरिया  वंशाच्या आहेत. जळवांचे काही थोडे उपयोग असले, तरी एकंदरीत त्या अतिशय उपद्रवी प्राणी आहेत. सरोवरात किंवा तळ्यात गोगलगायींचे प्रमाण जास्त झाल्यास त्यात जळवा सोडून ते कमी करण्यात येते. मासे पकडण्यासाठी उत्तम आमीष म्हणून जळवा गळाला लावतात. भारतात व जगातील इतर देशांतही फार प्राचीन काळापासून रोग्याच्या शरीरातील दूषित रक्त काढून टाकण्याकरिता जळवांचा उपयोग करण्यात येत असे. वैद्यकीय उपचाराची ही रीत हल्ली सर्व देशांतून जवळजवळ नाहीशी झालेली आहे. हिरुडो  हिरुडिनेरिया  या वंशांतील जळवा माणसांच्या किंवा गुरांच्या अंगाला चिकटल्या, तर त्यांना त्रास होतो पण ती मरत नाहीत पण काही जळवांमुळे मृत्यू ओढवतो. मध्य पूर्वेतील देशांत आढळणारी लिम्नॅटिस निलोटिका  ही नद्या, ओढे यांत राहणारी जळू पाण्याबरोबर तोंडात किंवा नाकपुडीत शिरल्यामुळे रक्तस्त्राव, ओकाऱ्या वगैरे होऊन गुरे व माणसे मरतात. द. अमेरिकेत आढळणाऱ्या हिमाडिप्सा चिलीॲनाय  या जळवेमुळे गुरे आणि घोडे मरतात.

 पहा : ॲनेलिडा हिरुडिनिया.

कुलकर्णी, सतीश वि.

 

आयुर्वेदीय उपयोग : जलौका म्हणजे जळू हा दुष्ट रक्त शोषून घेऊन, रोगी शरीर निर्दोष करून रोगनाश करण्यास उपयुक्त होणारा जीव आहे. स्थानिक रोगनाशाकरिता रक्तस्त्राव करावयास शिंग, जळू वा भोपळा यांचा उपयोग करतात. वात, पित्त वा कफ यांनी दूषित रक्त काढण्याकरिता यांचा क्रमाने विशेष उपयोग होतो. राजे, श्रीमंत, बाल, म्हातारे, भित्रे, दुर्बल स्त्री व सुकुमार या रोग्यांचे रक्त काढण्याकरिता हा अतिसुकुमार असा रक्तसेचनाचा उपचार आहे. 

जोशी, वेणीमाधवशास्त्री