जरावा : अंदमान द्वीपसमूहातील एक जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे दक्षिण व मध्य अंदमानाच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे. जरावांची लोकसंख्या ३०० (१९७४) असून परक्या लोकांपासून फटकून राहण्याची त्यांची वृत्ती आहे. परकीयांशी ते वैरभावाने वागतात. जरावा-ओंग या नावानेही ते प्रसिद्ध असून नेग्रिटो वंशसमूहातील आहेत. त्यांच्याशी पाश्चात्त्यांचा प्रथम संबंध १७८८ च्या सुमारास आला. १८५८ साली पोर्ट ब्लेअरच्या परिसरातून त्यांची हकालपट्टी झालेली होती. १८७३ मध्ये मॅक्फरसन सामुद्रधुनीजवळ प्रथम त्यांच्याशी ब्रिटिशांचा मुकाबला झाला. पहिल्या वसाहतवाल्यांनी आणलेल्या रोगराईने ग्रस्त होऊन हे लोक उत्तरेकडे गेले व त्यांनी इतरेजनांचा संपर्क टाळण्यास सुरुवात केली. ते राहातात ते टापू सु. ८०२ चौ. किमी.चा असून ते सुरक्षित म्हणून घोषित करण्यात आलेला होता. पृथकत्व दूर करण्यासाठी सरकारने त्यांच्यापैकी काहींना पकडून व माणसाळवून आणि त्यांचे मनःपरिवर्तन करून शांतिदूत म्हणून त्यांना परत त्यांच्या भागात पाठविण्याचे प्रयत्न केले. १९३८ साली एक स्त्री व तिची चार मुले पळवून आणली होती. ती स्त्री व तिची मुले स्नेहभावाने वागू लागली पण एवढ्यात जपानी आक्रमण आले व त्या स्त्रीमार्फत तिच्या जातीशी स्नेहसंपर्क साधला जाण्याच्या आतच ती स्त्री मरण पावली. नंतर काही जरावांना फिरुन पकडल्यानंतर जरावांनी पोर्ट ब्लेअर सोडले (१९४८). त्यांच्याशी संपर्क साधण्यात १९७४ पर्यंत कोणत्याही मानवशास्त्रज्ञास म्हणावे तसे यश आलेले नव्हते. १९७५–७६ मध्ये बख्तावार सिंग या अधिकृत लष्करी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली जरावांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यात काही प्रमाणात यश आले. त्यांच्या चालीरीती व इतर सांस्कृतिक वैशिष्ट्ये यांचा अभ्यास शासननियुक्त मानवशास्त्रज्ञ त्रिलोकीनाथ पंडित करीत आहेत.
भागवत, दुर्गा