कोंडा कापू : तमिळनाडू व आंध्र प्रदेश या राज्यांत आढळणारी एक जमात. दक्षिण भारतातील कापू जमातीच्या अनेक पोटविभागांपैकी ती एक असून १९६१ च्या सिरगणतीप्रमाणे तिची लोकसंख्या २९,८२६ होती. कोंडा म्हणजे डोंगर आणि कापू म्हणजे रक्षक या दोन शब्दांवरून कोंडा कापू, म्हणजे डोंगराचे रक्षण करणारा ही संज्ञा रूढ झाली असवी. यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. पेद्दा कोंडालू आणि चिन्ना कोंडालू अशा याच्या दोन प्रमुख शाखा असून पेद्दांमध्ये देवकपद्धती आहे व चिन्ना लोक बहिर्विवाही आहेत. पेद्दा कोंडालूंत आते-बहिणीशी व चिन्ना कोंडालूंत मामे-बहिणीशी लग्न होते. त्यांच्यापैकी काही शैव व काही वैष्णव आहेत. वैष्णव पंथीयास नामधारी म्हणतात तर शैव पंथीयास विभूतिधारी या नावाने ओळखतात. बहुतेक कोंडा कापू तेलुगू भाषाच बोलतात. त्यांच्या इतर सर्व चालीरीती कापूंप्रमाणेच आहेत. ते प्रेते जाळतात आणि नदीमध्ये अस्थींचे विसर्जन करतात.

संदर्भ :Government of Andhra Pradesh, The Scheduled Tribes of Andhra Pradesh, Hyderabad, 1963.

कीर्तने, सुमति