जत संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील त्या वेळच्या मुंबई प्रांतातील एक मराठा संस्थान. क्षेत्रफळ २,५३१ चौ.किमी. लोकसंख्या सु. १ लाख (१९४१). संस्थानचे वार्षिक उत्पन्न सु. ३ लाखांवर होते. यात जत व डफळापूर ही शहरे आणि ११७ खेडी समाविष्ट होती. डफळापूरचा पाटील सटवाजीराव चव्हाण-डफळे (१६६३–१७०१) याने १६८० च्या सुमारास ३,००० मोहरा खंडणीच्या बदल्यात आदिलशाहीकडून जत, करजगी, बार्डोल आणि कणद यांची देशमुखी मिळविली. सिद्दी खवासखानकडून आणखी वतने विकत घेऊन त्याने संस्थान वाढविले. त्याचा मुलगा बाबाजी याने औरंगजेबाची चाकरी करून जहागीर कायम केली. आऊसाहेब डफळे (१७०१–५४) या कर्तबगार राणीने पेशव्यांची अधिसत्ता मान्य केली. दुसऱ्या बाजीरावाने काही काळ देशमुखी जप्त करून त्रिंबकजी डेंगळेकडे या संस्थानचा कारभार सोपविला होता. १८२० मध्ये इंग्रजांनी तह करून सातारच्या छत्रपतींची अधिसत्ता मान्य करविली. त्यानुसार १८४६ नंतर ३ वर्षे राजा अल्पवयीन असल्याने कारभार छत्रपतींचाच होता. सातारा खालसा झाल्यावर (१८४८) संस्थान ब्रिटिशांचे पूर्ण मांडलिक बनले. विजापूरचा जिल्हाधिकारी हाच संस्थानाचा पोलिटिकल एजंट असे. डफळ्यांच्या गैरकारभारामुळे १८७४–८५ या काळात एजंटच जवळजवळ सर्व कारभार पाहत असे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात डफळापूरचा २५ चौ.किमी. प्रदेश राणीची खाजगी जहागीर समजला गेला. संस्थानाला दत्तकाची सनद १८९२ मध्ये मिळाली. त्यानुसार १९०७ मध्ये रामराव अप्पासाहेब या दत्तकपुत्राला अखत्यारी मिळाली. ब्रिटिशांना दरवर्षी ११,२४७ रु. खंडणी संस्थान देई. संस्थानिकाचे न्यायदानाचे अधिकार मर्यादित होते. रेल्वे नव्हती, पण कऱ्हाड-विजापूर पक्की सडक संस्थानातून जाई. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस संस्थानात २४ शाळा व जतला एक रुग्णालय होते. संस्थानिक उच्चवर्गीय मराठा क्षत्रिय असून पहिल्या वर्गाचे सरदार होते. डफळे आडनावावरून डफळापूर नाव पडले. स्वातंत्र्योत्तर काळात संस्थान त्या वेळच्या मुंबई राज्यात विलीन झाले (१९४७) व १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्ह्यात ते समाविष्ट झाले.

कुलकर्णी, ना. ह.