जटामांसी : (इं. स्पाइकनार्ड, इंडियन नार्ड, इंडियन व्हॅलेरियन लॅ.नार्डोस्टॅकिस जटामांसी कुल-व्हॅलेरिएनेसी). सु. १०–६० सेंमी. उंच व सरळ वाढणाऱ्या या बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) ⇨ओषधीचा प्रसार हिमालयात ३,०००–५,००० मी. उंचीवर पंजाब ते सिक्कीम व भूतानमध्ये आहे. हिचे भूमिगत खोड (मूलक्षोड याला सामान्यतः ‘मुळे’ म्हणतात) लांब, केसाळ, बळकट व कठीण असते. त्यापासूनच निघणारी (मूलज) पाने लांबट, सपाट आणि चमसाकृती (चमच्याच्या आकाराची) असून वरची (स्कंधोद्भव) पाने बिनदेठाची, आयत-अंडाकृती असतात. फुले गुलाबी, फिकट तांबूस किंवा निळी असून दाट वल्लरीत येतात. नवीन लागवड मूलक्षोडांनी किंवा बियांनी करतात [→ खोड ].
मूलक्षोडे औषधी व सुगंधी असतात. रानात उगवणाऱ्या वनस्पतींची ‘मुळे’ गोळा करून ‘जटामांसी’ नावाने विकतात. पंजाबात वार्षिक आवक १८,६५० किग्रॅ.पर्यंत जाते. ही मुळे सुगंधी, कडू, जंतुनाशक, शक्तिवर्धक, उत्तेजक, पेटके व आचके बंद करणारी असून अपस्मार व उन्मादाच्या झटक्यांवर देतात हृदयाची धडधड आणि आंत्र (आतड्याच्या) शूळावर तरगच्या (मुश्कवल्ली-व्हॅलेरियाना ऑफिसिनॅलिस) मुळांऐवजी वापरतात. त्यांपासून १⋅९% फिकट पिवळे व सुवासिक ‘स्पाइकनार्ड’ हे बाष्पनशील (उडून जाणारे) तेल मिळते. त्याने केसांची वाढ होऊन ते काळे होतात असे म्हणतात.
व्हॅलेरिएनेसी या कुलाचा समावेश ⇨रुबिएलीझ या गणात होतो व यातील जातींची फुले अवकिंज, अनियमित (असमात्र), द्विलिंगी वा एकलिंगी असून संवर्त ऱ्हास पावलेला व केसासारखा (पिच्छ संदल) असतो. तीन किंजदलांपैकी एकच पूर्ण विकसित होते [→ फुल] व बी एकच असते.
इंडियन व्हॅलेरियन हे इंग्रजी नाव मुश्कबला (व्हॅलेरियाना वालिचाय ) या हिमालय, काश्मीर आणि खासी टेकड्या येथे वाढणाऱ्या औषधी, सुगंधी व ओषधीय वनस्पतीला लावतात. तिचा उपयोग वरील तगरप्रमाणे करतात.
जमदाडे, ज. वि.
“