छोटा उदेपूर : गुजरातमधील वडोदरा (बडोदे) जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण व पूर्वीच्या छोटा उदेपूर संस्थानची राजधानी. लोकसंख्या १४,३१२ (१९७१). बडोदे–इंदूर रस्त्यावर हे बडोद्यापासून सु.१०० किमी. पूर्वेस मध्य प्रदेश राज्याच्या सरहद्दीजवळ, नर्मदेची उपनदी ओरस नदीकाठी आहे. तेराव्या शतकात मुसलमानी आक्रमणांमुळे काही राजपूत घराणी गुजरातमध्ये आली त्यांतील एक चांपानेरला आले. पंधराव्या शतकात महमूद बेगडा याने चांपानेरचे राज्य नष्ट केले. तेथील राजपूत चौहान राजांनी बारिया आणि छोटा उदेपूर ही राज्ये स्थापन केली. छोटा उदेपूरच्या चौहानांना महारावळ म्हणत. हे पुढे बडोद्याच्या गायकवाडांचे मांडलिक बनले. छोटा उदेपूर व राजपीपला या डोंगररांगांनी बनलेला प्रदेश व प्रामुख्याने भिल्ल, दुबळा इ. आदिवासी लोकांची वस्ती यांमुळे छोटा उदेपूरची फारशी वाढ झाली नाही. शहर टुमदार असून तालुक्यातील शेतमालाची ही बाजारपेठ आहे. डोंगराळ भागात शिकारीसाठी जाणारे लोक छोटा उदेपूरला मुक्काम करतात. 

शाह, र. रू.