चोरकावळा : हा पक्षी गावकावळ्याचाच गोत्रज असून त्याच्यापेक्षा लहान आणि साधारणपणे कबुतराएवढा असतो. याचे शास्त्रीय नाव कोर्व्हस मोनेड्युला हे आहे. याच्या डोक्याच्या दोन्ही बाजू आणि मान रूपेरी करड्या रंगाची असते मान आखूड असते चोच गावकावळ्याच्या चोचीसारखीच पण लहान असते डोळे कबरट पांढऱ्या रंगाचे असतात. नर व मादी दिसायला एकसारखी असतात. कुरणे, उतारूंचे तळ, कडे, वृक्ष इ. जागी हे पक्षी आढळतात.
काश्मीर आणि लडाख ही यांची निवासस्थाने होत. परंतु हिवाळ्यात हिमालयालगतच्या पंजाबच्या विभागात ते येतात. खुद्द काश्मिरात २,७४५ मी.पेक्षा जास्त उंचीवर तो आढळत नाही. उन्हाळ्यात काश्मिरला भेट देणाऱ्या पाहुण्यांना तो हटकून दिसतो. श्रीनगरच्या भोवतालच्या भागात तो जास्त प्रमाणात आढळतो. याचे ओरडणे वरच्या सुरात असून कानाला गोड लागते. चोरकावळा एकलकोंडा नसल्यामुळे त्यांचे नेहमी थवे असतात आणि प्रत्येकात बारा ते शंभर पक्षी असतात. हिवाळ्यात हे थवे जास्तच मोठे असतात. कुरणात मोठ्या दिमाखाने भटकत असताना मधूनच एखादा किडा दिसला की, थांबून तो टिपावा किंवा एखादे गांडूळ जमिनीतून उकरून काढून खावे व पुन्हा डौलाने चालायला लागावे, असा त्यांचा कार्यक्रम चालू असतो.
स्वभावतः हे पक्षी गरीब पण बेडर असतात. यांची झोपी जाण्याची पद्धत थेट गावकावळ्यासारखीच असते मोठाल्या चिनार वृक्षांवर तिन्हीसांजेच्या वेळी जमा होऊन तेथेच ते झोपी जातात. लव्हाळ्यांच्या बेटात देखील ते रात्री विश्रांती घेतात.
खाण्याच्या बाबतीत त्यांच्या सवयी गावकावळ्यासारख्याच आहेत त्यांना वाटेल ते खाण्याचे पदार्थ चालतात.
मे महिना हा या पक्ष्यांचा प्रजोत्पादनाचा हंगाम होय. घरटे काटक्याकुटक्यांचे असून घरांची छपरे, भिंतीतली भोके, झाडांच्या ढोली यांत किंवा चिनार, वाळुंज या वृक्षांच्या फांद्यावर बांधलेले असते. मादी एका खेपेला ४—७ अंडी घालते, १७—१८ दिवसांनी ती फुटून पिल्ले बाहेर पडतात. नर व मादी दोघेही घरटे तयार करतात, आळीपाळीने अंडी उबवितात आणि पिल्लांना खायला घालतात.
पहा : कावळा.
कर्वे, ज. नी.
“