तेव्फीक फिकरत : (२४ डिसेंबर १८६७–१८ ऑगस्ट १९१५). विसाव्या शतकातील प्रसिद्ध तुर्की कवी. मुहंमद तेव्फीकचे हे टोपणनाव. सुरूवातीच्या काळात तो तेव्फीक नझमी या नावानेही ओळखला जाई. इस्तंबूल येथे जन्म. ‘गलाता सराय’ मधील ‘मक्तबे सुलतानिये’ या शाळेतून १८८८ मध्ये त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे १९०८ मध्ये याच शाळेत प्राचार्य म्हणून काम केले. दरम्यान १९०१ साली त्याने रॉबर्ट कॉलेजात अध्यापन केले. सुलतानी येथे असतानाच इस्तंबूल विद्यापीठात त्याने व्याख्यानेही दिली होती. १८९६–१९०१ पर्यंत सरवते फुनुन या नियतकालिकाचे त्याने संपादन केले. पारंपरिक लेखनशैली नाकारून नव्या व प्रयोगशील लेखनावर निष्ठा ठेवणारा तरुण साहित्यिकांचा गट या नियतकालिकाभोवती जमला होता. या आधुनिक सर्जनशील साहित्यिकांमध्ये तेव्फीक फिकरत हा प्रमुख होय. या लेखकगटाने आधुनिक तुर्की साहित्याच्या निर्मितीबरोबरच काही युरोपीय, विशेषतः फ्रेंच, कथा–काव्यांची भाषांतरेही केली. हमीदसारख्या स्थानिक कमीप्रमाणेच त्याच्यासमोर फ्रेंच, कथा–काव्यांची भाषांतरेही केली. हमीदसारख्या स्थानिक कवीप्रमाणेच त्याच्यासमोर फ्रेंच प्रतीकवादी कवींचाही आदर्श होता. त्यांच्या प्रभावामुळेच यमकांच्या जुळवणीत लवचिकपणा आणून त्याने काव्यरचनेचे तंत्र सहजस्वाभाविक व सोपे बनविले. त्याचबरोबर दैनंदिन जीवनातील क्षुल्लक घटनांना काव्यविषय बनवून त्याने काव्याचे क्षेत्र विषयदृष्ट्या विस्तृत केले. सिससारख्या (१९०२) काव्यात त्याने आपल्या काळातील अनियंत्रित राजवटीविरुद्ध बंड पुकारले, हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य होय. तसेच ‘आजचा खरा धर्म हा जीवनाचा धर्म होय’, असे ठामपणे सांगून त्याने प्रचलित धर्माविरुद्ध बंड केले होते. रूबाबे शिकस्ते हा त्याचा पहिला कवितासंग्रह १९०० साली व हलूकून देफ्तेरी हा दुसरा संग्रह १९११ मध्ये प्रसिद्ध झाला. हे दोन्ही संग्रह ही त्याची मौलिक निर्मिती मानली जाते. त्यानंतरच्या त्याच्या शर्मीन (१९१४) या संग्रहात अक्षरवृत्तांतील बालगीते समाविष्ट करण्यात आली आहेत. इस्तंबूल येथे त्याचे निधन झाले.
नईमुद्दीन, सैय्यद