तेवारम्‌ : शिवभक्तिपर स्तोत्रांचा एक प्रसिद्ध तमिळ संग्रह. तिरुज्ञानसंबंधर, अप्पर वा तिरुनावुक्करसर आणि सुंदरर ह्या तीन श्रेष्ठ तमिळ शैव संतांच्या सात हजार तमिळ स्तोत्रांचा संग्रह तेवारम्‌ नावाने प्रसिद्ध आहे. ‘तेवारम्‌’ याचा अर्थ ‘परमेश्वरचरणी अर्णण केलेली गीतमाला’. तिरूज्ञानसंबंधर, ⇨ तिरुनावुक्करसर, सुंदरर आणि माणिक्कवाचगर हे चार थोर शिवभक्त कवी तमिळ शैवांचे श्रेष्ठ अध्वर्यू मानले जातात. ⇨ नायन्मार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्रेसष्ट शैव संतांतही त्यांचा अंतर्भाव असून त्यांना त्यात सर्वोच्च स्थान आहे. त्यांनी अनेक चमत्कार केल्याच्या आख्यायिकाही संप्रदायात रूढ आहेत. ह्या चार शिवभक्तांनी तमिळनाडूतील सर्वच तीर्थक्षेत्रांच्या तसेच उत्तर भारतातीलही प्रसिद्ध शिवक्षेत्रांच्या यात्रा करून आपली गूढवादी शिवस्तोत्रे रचिली व शैव मताचा प्रचार केला. त्यांच्या मते शिवदेवतेची भक्तिभावे केलेली उपासना म्हणजेच खरा धर्म होय. शिवभक्तीत तल्लीन होऊन रचिलेल्या त्यांच्या स्तोत्रांत भावनेची खोली आणि अभिव्यक्तीचा आनंदोल्लास यांचे मनोज्ञ दर्शन घडते.

पहिल्या तीन शिवभक्तांची स्तोत्रे सात खंडांत संगृहीत असून प्रत्येक खंडात हजार स्तोत्रे आहेत. तमिळ शैवांनी एकूण बारा तिरुमुरै सांप्रदायिक ग्रंथ म्हणून पवित्र मानली आहेत. त्यातील पहिली सात तिरुमुरै तेवारम्‌मध्ये आहेत. ⇨ माणिक्कवाचगर याच्या ६५६ स्तोत्रांचा तिरुवाचगम्‌ हा वेगळा संग्रह असून त्यालाही शैव संप्रदायात आठवे तिरुमुरै म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. तेवारम्‌मध्ये मुळात एक लाखावर स्तोत्रे होती असे सांगितले जाते तथापि आज मात्र त्यातील सात हजार स्तोत्रेच उपलब्ध आहेत. तिरुज्ञानसंबंधर व तिरुनावुक्करसर हे शिवभक्त सातव्या शतकात होऊन गेले. त्यांनी रचिलेल्या हजारो स्तोत्रांतील प्रत्येकाची तीन हजार स्तोत्रेच आज तेवारम्‌मध्ये संकलित आहेत. सुंदरर हा शिवभक्त नवव्या शतकात होऊन गेला. त्याची एक हजार स्तोत्रे तेवारम्‌मध्ये आहेत.

तमिळनाडूतील शैव मंदिरांतून आजही तेवारम्‌मधील स्तोत्रे मोठ्या भक्तिभावे पारंपरिक संगीतबद्ध चालीवर म्हटली जातात. ह्या स्तोत्रांचा संगीत हा आवश्यक भाग आहे. स्तोत्रांच्या चाली खास तमिळनाडूच्या पारंपरिक संगीताच्या असून त्या आजही जशाच्या तशा जतन केलेल्या आढळतात. विद्यमान कर्नाटक संगीत ह्याच प्राचीन स्तोत्रांच्या संगीतधाटणीवर अधारित असल्याचे तज्ञ मानतात.

वरदराजन्‌, मु. (इं), सुर्वे, भा. ग. (म.)