तेझपूर : आसाम राज्याच्या दरंग जिल्ह्याचे ठाणे. लोकसंख्या ३९,८७० (१९७१). हे शिलाँगच्या ईशान्येस सु. १४७ किमी., ब्रह्मपुत्रेच्या उजव्या तीरावर वसलेले नदी बंदर आहे. येथून कलकत्त्याकडे चहाची निर्यात होते. याच्या आसपास चहा, ऊस, भात, ताग, मोहरी इ. पिके होतात. हे लोहमार्ग व महामार्ग यांचे प्रमुख स्थानक आहे. जवळच सलानी विमानतळ आहे.
पुराणप्रसिद्ध राजा बाणासुर याची राजधानी शोणितपूर ती हीच असे मानतात. दहाव्या शतकात येथे पाल राजांची राजधानी होती. त्या काळातील कोरीव काम व भग्न देवालये येथे पहावयास मिळतात. भारत–चीन संघर्षात येथे भारताचा सैनिकी तळ होता. येथे गौहाती विद्यापीठास जोडलेले दरंग महाविद्यालय आणि शासकीय औद्योगिक व तांत्रिक शाळा आहेत.
मांढरे, जयवंत