तूराण : आशियाई रशियातील अरल समुद्राच्या दक्षिणेचा व आग्नेयीचा विस्तीर्ण, सखल मरुप्रदेश. नैर्ऋत्य कझाकस्तान, वायव्य उझबेकिस्तान व तुर्कमेनिस्तान तूराणमध्ये समाविष्ट आहेत. वाळूच्या व मातीच्या या मरुप्रदेशात सु. १,००० मी. उंचीच्या टेकड्या आणि स. स. पेक्षाही खोल खळगे आहेत. अमुदर्या व सिरदर्या या नद्यांमुळे या वाळवंटाचे काराकुम, किझिलकुम व अरल काराकुम असे वाळवंटी भाग पडले आहेत. येथील हवामान विषम व पाऊसमान १५ सेंमी. पर्यंत आहे. नद्यांकाठच्या मरुद्यानात कापूस, तांदूळ, कोरडवाहू पिके, सफरचंदे, द्राक्षे, संत्री इत्यादींचे उत्पादन होते. इतरत्र मेंढपाळी चालते. लोकवस्ती विरळ आहे. या प्रदेशातील खिवा, बुखारा, समरकंद इ. इतिहासप्रसिद्ध स्थळे पर्यटकांची व संशोधकांची आकर्षणे आहेत. प्राचीन काळी या प्रदेशातून ‘रेशीम मार्गा’ सारखे खुष्कीचे मार्ग जात असत.

लिमये, दि. ह. भागवत, अ. वि.