देवळाली : नासिक जिल्ह्यातील एक आरोग्यधाम. लोकसंख्या ३०,६१८ (१९७१). हे नासिक तालुक्यात नासिकच्या आग्नेयीस ६·४ किमी. असून मुंबई–नागपूर या मध्य लोहमार्गावरील स्थानक आहे. येथील आधुनिक सोयींच्या उपलब्धतेमुळे मुख्यतः उन्हाळ्यात पर्यटकांची गर्दी होते. येथे कायम स्वरूपाचा लष्करी तळ असून तोफखान्याच्या प्रशिक्षणाचीही खास व्यवस्था आहे. शहरात प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, प्रसूतिगृहाची व सांसर्गिक रोगपीडितांची स्वतंत्र सोय असलेला दवाखाना, वेगवेगळ्या धर्मीयांची आरोग्यभुवने असून वीज उत्पादन केंद्रही आहे. या शहराचा परिसर सुंदर असून उत्कृष्ट प्रतीचा भाजीपाला येथे पिकविला जातो. शहराची नागरी व्यवस्था कँटोनमेंटकडून पाहिली जाते.
चौधरी, वसंत