देवदारी, लाल : (पाबा हिं., बं. चिक्रासी क. दालमर, डबला इं. चित्तगाँग वुड लॅ. चुक्रासिया टॅब्युलॅरिस कुल–मेलिएसी). हा मोठा पानझडी वृक्ष सु. १८–२४ मी. उंच असून त्याचा घेर सु. २·४–३ मी. पर्यंत असतो. उ. कारवार व कोकण येथील सदापर्णी दाट जंगलात, प. घाटात आणि सिक्कीम, आसाम, चित्तगाँग, आंध्र प्रदेश, श्रीलंका, ब्रह्मदेश व अंदमान बेटे इ. प्रदेशांत आढळतो. साल लालसर तपकिरी, भेगाळ व वल्करंध्रयुक्त (सालीवर सूक्ष्म छिद्रे असलेली) असते. पाने संयुक्त, काहीशी लवदार, एकाआड एक, पिसासारखी विभागलेली व समदली दले (५–१३ X ३–७ सेंमी.) १०–१६, तळाशी मध्यशिरेच्या दोन्ही बाजूंस असमान (सारखी नसलेली), अंडाकृती फुले असंख्य, द्विलिंगी, मोठी, पांढरी किंवा पिवळसर पांढरी (क्वचित लाल), शेंड्याकडे पानांच्या बगलेत परिमंजरीवर जानेवारी ते फेब्रुवारीत येतात. संदले व प्रदले ४–५ केसरदले १० व जुळलेली किंजपुटात ३–५ कप्पे व प्रत्येकात दोन रांगांत अनेक बीजके असतात [→ फूल]. फळ (बोंड) अंडाकृती, कठीण (५ सेंमी. लांब) आणि बिया अनेक, सपाट, सपक्ष (पंखासारखा विस्तार असलेल्या) व अपुष्क (गर्भाभोवती अन्नांश नसलेल्या) असतात. ती उन्हाळ्यात येतात. बोंड तडकल्यावर ३–५ शकले होतात. सामान्य शारीरिक लक्षणे व फुलांची संरचना ⇨ मेलिएसी कुलात (निंब कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.
लाल देवदारीचे लाकूड पिवळट तपकिरी अथवा गडद तपकिरी, कठीण, मजबूत आणि टिकाऊ असून कातीव व कोरीव कामांस चांगले असते. ते रंधून व घासून गुळगुळीत करता येते. खांब, तुळ्या, फळ्या, उत्तम सजावटी सामान, होडकी, तक्ते, पियानो, धोटे, कागदनिर्मितीस लागणारा लगदा इत्यादींकरिता उपयुक्त व त्यामुळे महत्त्वाचे मानतात ते वाळवीपासून सुरक्षित असते. ब्रह्मदेशात याला ‘गोल्डन महॉगनी’ म्हणतात. कोवळ्या पानांत २२% व खोडावरील सालीत १५% टॅनीन असते. फुलांपासून लाल व पिवळा रंग मिळतो. पिवळट लालसर डिंक सालीतूल पाझरून येतो. तो सुकल्यावर त्याची चांगल्या डिंकात भेसळ करतात. साल स्तंभक (आकुंचन करणारी) असते. इंडोचायनात ती अतिसारावर देतात. शोभेकरिता ही झाडे लावतात. त्याकरिता मार्च–एप्रिलमध्ये चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत बी पेरतात सावलीत ती रुजून रोपे बनल्यावर ऑगस्टमध्ये बाहेर लावतात. सु. तीस सेंमी. उंचीच्या बांधावर बाहेर प्रत्यक्षपणे बी लावता येते. वाढ मंद असते. सहा वर्षांत सु. ५·५० मी. उंची आणि सु. ४५ सेंमी. घेर होतो असे (डेहराडूनमध्ये) आढळले आहे.
वैद्य, प्र. भ. परांडेकर, शं. आ.
“