तीरुमिथच्चुर (जि. तंजावर) येथील दुर्गामुर्ती, १० वे शतक.

दुर्गा : प्रसिद्ध शक्तीदेवता. दुर्ग नावाच्या राक्षसाला मारणारी म्हणून दुर्गा. नऊ वर्षाच्या शक्तिदेवीला दुर्गा म्हणावे असे देवी भागवतात (३·२६) म्हटले आहे. ही उमा, गौरी, पार्वती, चंडी, काली इ. रूपांनी ओळखली जाते. शंकर, यम, विष्णू, चंद्र, इंद्र, वरुण, भूमी, सूर्य. इ. देवतांच्या अंशांपासून दुर्गेचा जन्म झाला, असे मार्कंडेयपुराणात म्हटले आहे. महाभारताच्या विराटपर्वात (अध्याय ६) दुर्गा ही नारायणाची स्त्री असल्याचे म्हटले आहे. महाभारतात (भीमपर्व २३) दुर्गादेवीचे एक स्तोत्र आहे. या देवीचे स्थान विंध्य पर्वतावर असल्याचे हरिवंशात म्हटले आहे त्यावरून या देवीला विंध्यवासिनी असेही म्हणतात. दुर्गेचा संबंध शंकराशी जोडला असून तिला आदिशक्ती असे म्हटले आहे. ‘नवदुर्गा’ नावाचे एक स्तोत्र असून त्यात दुर्गेच्या नऊ रूपांचे वर्णन आहे. आगमग्रंथात नवदुर्गांची नावे दिलेली आहेत.

मार्कंडेयपुराणात (अध्याय ८१–९३) देवीमाहात्म्य आले असून त्यातील श्लोकांची संख्या ७०० असल्यामुळे हा भाग ‘दुर्गासप्तशती’ या नावाने प्रसिद्ध आहे. यात महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या तीन स्वरूपांत दुर्गेचे चरित्र वर्णन केले आहे. ही तीन रूपे अनुक्रमे तम, रज व सत्त्व या तीन गुणांची प्रतीके आहेत. मधुकैटभ, महिषासुर, चंडमुंड, शुंभनिशुंभ इ. राक्षसांचा तिने आपल्या पराक्रमाने वध केल्याच्या कथा यात सांगितल्या आहेत. दुर्गेने देवांना उत्पन्न केले, सर्व विद्या दुर्गास्वरूप आहेत, ती ओंकाररूप आहे, जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो तेव्हा दुर्गा अवतार घेते, असेही वर्णन तेथे आढळते.

दुर्गादेवीने हा पराक्रम आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवसांत केला म्हणून ⇨ नवरात्रात दुर्गादेवीचा मोठा उत्सव करतात. दुर्गेला चंडी असेही दुसरे नाव आहे, म्हणून दुर्गासप्तशतीच्या पाठास ‘चंडीपाठ’ असे म्हणतात. सप्तशतीचा पाठ करून हवन करण्याची पद्धती आहे. शतचंडी, सहस्रचंडी अशा मोठ्या संख्येनीही सप्तशतीचा पाठ करतात. दुर्गेच्या उपासनेत पशुबलीही सांगितला आहे. दुर्गेच्या पूजेचे विधान देवीभागवत, देवीपुराण, कालिकापुराण  तसेच इतर पुराणांतही आढळून येते.

प्रत्येक महिन्याच्या शुद्ध अष्टमीस दुर्गाष्टमी म्हणतात. या दिवशी स्त्रिया व्रत करतात. आश्विन महिन्यातील दुर्गाष्टमीला महाअष्टमी म्हणतात. त्या दिवशी महालक्षमीची पूजा, चंडीपाठ, जागरण इ. अनेक विधी करावयाचे असतात. नवरात्रोत्सवात ⇨ दुर्गापूजेला एक महत्त्वाचे स्थान आहे. दूर्गापूजेच्या अनेक पद्धती भारतातील वेगवेगळ्या प्रांतात प्रचलित आहेत.

दुर्गेची रौद्र व सौम्य अशी दोन्ही रूपे आहेत. रौद्ररूपात ती तांत्रिकाची उपास्य देवता ठरली. दुर्गेचे अध्यात्मरूप म्हणजे सौम्यरूप देव्युपनिषदात वर्णिले आहे. दुर्गा पुष्कळ वेळा शक्तिरूपातच प्रकट झालेली आहे. कलकत्त्यात दुर्गा ही ⇨ काली  आहे. तर गोमंतकात ती शांता आहे. चंडी या स्वरूपात दुर्गा ही चतुर्भुजा, अष्टभुजा, दशभुजा, अष्टादशभुजा अशी आढळते. तिच्या हातांत चक्र, पाश, शूल, खड्ग इ. आयुधे दाखविलेली असतात. ही सिंहारूढ असते. सुप्रभेदागमानुसार दुर्गा ही विष्णूची धाकटी बहीण असून ती आदिशक्ती आहे. जेव्हा ती अष्टभुजा असते, तेव्हा तिच्या हातात शंख, चक्र, शूल, धनुष्, बाण, खड्ग, खेटक (गदा) व पाश ही आयुधे असतात. दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांतील मूर्ती आढळून येतात. महिषासुरमर्दिनीच्या रूपात तिच्या पायाजवळ शिर तुटलेला महिषासुर असतो आणि त्याच्या मानेपासून जन्मलेला पुरुष दाखविलेला असतो.

संदर्भ : 1. Mani, Vettam, Puranic Encyclopaedia, Delhi, 1975.

           2. प्रभुदेसाई, प्र. कृ. आदिशक्तीचे विश्वस्वरूप  (देवीकोश), ३ खंड, पुणे १९६७–६८.

भिडे, वि. वि.