दुर्ग : द्रुग. मध्य प्रदेश राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे आणि तालुक्याचे ठिकाण व औद्योगिक शहर. हे नागपूर–कलकत्ता लोहमार्गावर नागपूरच्या पूर्वेस सु. २३० किमी वर आहे. लोकसंख्या ६७,८९२ (१९७१). स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच हे एक प्रशासकीय केंद्र म्हणून महत्त्वाचे आहे. शहरात भग्नावस्थेतील मातीचा किल्ला असून मराठ्यांनी १७४१ साली छत्तीसगढावरील स्वारीच्या वेळी याचा उपयोग केला होता. दळणवळणाच्या उत्तम सोयी आणि जवळच असलेल भिलाई येथील लोखंड–पोलाद कारखान्याचा दुर्गच्या औद्योगिक विकासावर अनुकूल परिणाम झाला आहे. येथे कापडगिरण्या, लाकूड कापण्याच्या गिरण्या, तेलाच्या घाण्या आहेत. ब्राँझ व इतर धातूंची भांडी तयार करणे, विडी उद्योग, कापड विणणे इ. उद्योगही येथे चालतात. हातमागाच्या धंद्यावर मात्र कापडगिरण्यांचा विपरीत परिणाम झालेला आढळतो. आसपासच्या परिसरात विड्याच्या पानांचे मळे आहेत. येथे रविशंकर विद्यापीठाशी संलग्न असलेली तीन महाविद्यालये आहेत.
चौधरी, वसंत