दुआब : (दोआब). [दु–दो = दोन, आब–आप = पाणी, प्रवाह]. जवळजवळ एकाच दिशेने वाहणाऱ्या दोन नद्यांच्या संगमाच्या वरच्या बाजूच्या लांबट, त्रिकोणी भूभागास सामान्यतः दुआब म्हणतात. विशेषतः उत्तर प्रदेशातील गंगा–यमुनेच्या दरम्यानचा गाळाने बनलेला, अत्यंत सपाट, सलग, सुपीक, संपन्न व दाट लोकवस्तीचा प्रदेश दुआब म्हणून ओळखला जातो. याशिवाय पंजाब (पंच–आप) मधील सतलज–रावीमधील बडी दोआब, रावी–चिनाबमधील रेचना दोआब, चिनाब–झेलममधील जेच दोआब व झेलम–सिंधूमधील सिंध सागर दोआब प्रसिद्ध आहेत. दक्षिण भरतात कृष्णा–तुंगभद्रा दोआब आहे. टायग्रिस व युफ्रेटीस यांदरम्यानचा मेसोपोटेमिया (ग्रीक भाषेतील दोआब या अर्थाचा शब्द) हा जगप्रसिद्ध दुआब आहे. जगातील अशा प्रकारच्या कोणत्याही भूप्रदेशास आता दुआब ही संज्ञा वापरतात.
पाठक, सु. पुं.