दिब्रुगड : आसाम राज्यातील लखिमपूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ८०,३४८ (१९७१). हे ब्रह्मपुत्रा व दिब्रू नद्यांच्या संगमावर वसलेले महत्त्वाचे व्यापार केंद्र आणि जलमार्ग व लोहमार्ग यांचे अंतिम स्थानक आहे. आसाममधील चहा, कोळसा, खनिज तेल यांची ही बाजारपेठ आहे. लोखंडाच्या सळया आणि गज तयार करण्याचा कारखाना तसेच ॲल्युमिनियमची भांडी, सायकलचे सुटे भाग, नलिकाकूपांना लागणारे नळ व चहावरील प्रक्रिया इत्यादींचेही येथे कारखाने आहेत. आसाममधील ब्रह्मपुत्रेला समांतर हमरस्ता या शहरावरूनच जातो. हे आसाम राज्यातील शैक्षणिक केंद्र असून येथे दिब्रुगड विद्यापीठ, आसाम कृषी विद्यापीठ, आसाम वैद्यक महाविद्यालय व इतर बऱ्याच शैक्षणिक संस्था आहेत. याच्या पूर्वेस १९ किमी. वर मोहनबारी येथे विमानतळ आहे. १९५० च्या भूकंपाने शहराची बरीच हानी झाली होती. ब्रह्मपुत्रेच्या पुरानेही प्रतिवर्षी शहर धोक्यात येते.
कुमठेकर, ज. ब. कांबळे, य. रा.