दिपालपूर : पाकिस्तानच्या मंगमरी जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे ठिकाण. मंगमरीच्या पूर्वेस सु. ५३ किमी. असलेले हे ऐतिहासिक गाव पूर्वी बिआस नदीकाठी होते परंतु नदीने प्रवाह बदलल्यामुळे ते नदीपासून दूर राहिले. त्यामुळे त्याच्या विकासावर विपरीत परिणाम झाला. देवबलपूर हे याचे प्राचीन नाव असून ते धार्मिक दृष्टिकोनातून ठेवलेले असावे. ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या या ठिकाणी इंडो–सिथियन या राजांच्या कारकीर्दीमधील काही नाणी सापडली आहेत. फिरोझशाह तुघलकाने चौदाव्या शतकात गावाच्या बाहेर बांधलेली एक मशीद येथे आहे. दिपालपूर हे १३९८ मध्ये तैमूरलंगाने, तर १७५८ मध्ये मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतले होते. येथे एक मध्ययुगीन किल्ला असून १५२४ मध्ये तो बाबरने जिंकला होता. तसेच अकबर, औरंगजेब यांच्या वेळीही हे राज्यव्यवस्थेचे महत्त्वाचे केंद्र होते. सतलज नदीवरून काढलेला कालवा दिपालपूर कालवा या नावानेच ओळखला जातो. येथे कापूस, गहू, कडधान्ये इत्यादींचा व्यापार आणि कापूस पिंजणे व हातमागावर कापड विणणे हे उद्योग चालतात. येथील बाबालालु जसराजाची समाधी महत्त्वाची असून उच्च कुळातील खत्री लोक तिला पूज्य मानतात. भारतीय सीमेनजीक असल्याने संरक्षणाच्या दृष्टीने दिपालपूर महत्त्वाचे आहे.
ओक, द. ह. भागवत, अ. वि.