पनामा सिटी: मध्य अमेरिकेतील पनामा प्रजासत्ताकाची राजधानी व देशातील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या ४,२७,७०० (१९७७ अंदाज). हे पॅसिफिक महासागराच्या बाजूस पनामाच्या आखातावर वसले असून, देशातील प्रमुख व्यापारी पेठ, औद्योगिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून त्याला फार महत्त्व आहे. अटलांटिकवरील कोलोन या शहरापासून ६१ किमी. अंतरावर हे शहर असून ते कोलोनशी लोहमार्ग व हमरस्त्याने, उत्तर व दक्षिण अमेरिकेशी पॅन अमेरिकन रस्त्याने व जागतिक विमानमार्गांनी सर्व देशांशी जोडले आहे. कालवा विभागातील बॅल्बोआ हे या शहराचे बंदर आहे.

हे शहर १५१९ मध्ये सध्याच्या शहराच्या ईशान्येस आठ किमी. वर पेद्रो आर्यास दे आव्हिला या स्पॅनिश सेनाधिकाऱ्याने दक्षिण अमेरिकेतील सुवर्ण आणि संपत्ती संयोगभूमिमार्गे स्पेनला नेण्यासाठी वसविले. पुढील शंभर वर्षांत भरभराटीस आलेल्या या शहरावर ब्रिटिश चाच्यांनी दोन वेळा हल्ले चढविले. १६७१ च्या दुसऱ्या हल्ल्यात सर हेन्री मॉर्गन या ब्रिटिश चाच्याने हे शहर पूर्णपणे उद्‌ध्वस्त करून टाकले परंतु तीनच वर्षांनंतर आलॉन्सो मेरकादो दे व्हिलाकॉर्ता याने सध्याच्या जागी नवीन शहराची एका मध्यवर्ती चौकाभोवती प्रार्थनामंदिर, धर्मगुरू वाडा, गव्हर्नर निवास, शूर वीरांचे पुतळे उभारून आकर्षक रचना केली. येथील इमारतींतून स्पॅनिश लाकडी कोरीवकाम आणि कलाकुसरकाम प्रत्ययास येते. पुढे स्पॅनिश जहाजे हॉर्न भूशिराचा मार्ग वापरू लागल्याने या शहराला पडता काळ आला. परंतु १८४८ मध्ये कॅलिफोर्नियात सोने सापडल्याने व संयोगभूमीवरील लोहमार्गामुळे या शहराची पुन्हा वाढ सुरू झाली आणि १९१४ मध्ये पनामा कालवा वाहतुकीस खुला झाल्यावर वाढीस फार वेग आला.

जुन्या स्पॅनिश चालीरीती, आधुनिक अमेरिकन गतिशीलता व काही पौर्वात्य छटा यांचे सुरेख मिश्रण या शहरात आढळून येते. जुन्या कलाकुसरींनी युक्त अशा ठिकाणांबरोबर आधुनिक गगनचुंबी व आलिशान इमारतीही आढळून येतात. आखाताच्या बाजूस लागून राष्ट्रीय संसदेची व सर्वोच्च न्यायालयांच्या इमारती आहेत. उत्तरेच्या बाजूस आकर्षक राष्ट्राध्यक्ष निवास व मंत्रालय आणि जवळच राष्ट्रीय कलामंच, पनामा राष्ट्रीय विद्यापीठ व राष्ट्रीय ग्रंथालय आहे.

दारू, तयार कपडे, पादत्राणे, लाकडी सामान, पेये आणि सिमेंट इत्यादींचे कारखाने शहरात आहेत. येथून डाव्हीड शहराकडे जाणाऱ्या पॅन अमेरिकन हमरस्त्याच्या कालव्यावर बांधलेल्या नवीन पुलास ‘ब्रिज ऑफ द अमेरिकाज’ (अमेरिकेचा सेतू) म्हणतात. १९०३ मध्ये कोलंबियाविरुद्ध स्वातंत्र्यासाठी आणि १९६४ मध्ये अमेरिकेविरुद्ध निशाणासाठी येथे मोठ्या हिंसक दंगली झाल्या. १८२६, १९३९ व १९५६ मध्ये येथे अमेरिकेतील प्रजासत्ताकांच्या परिषदा भरल्या होत्या. यांमुळे या शहराला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे. 

आठल्ये, द. बा.