दिनापूर : बिहार राज्याच्या पाटणा जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे ठिकाण. लोकसंख्या (लष्करी छावणी व उपनगरांसह) ५९,९९३ (१९७१). हे पाटण्याच्या वायव्येस १० किमी. गंगेच्या उजव्या तीरावर वसलेले आहे. अठराशे सत्तावन्नचा उठाव पाटणा जिल्ह्यात प्रथम याच ठिकाणी झाला. १८८७ पासून येथे नगरपालिका आहे. रस्ते व लोहमार्गाचे प्रमुख केंद्र असून शहरापासून लोहमार्गस्थानक ५·६ किमी. वर आहे. शहरात तेलगिरण्या, ओतशाळा, छपाईकाम, तयार कपडे, धातूची भांडी, लाकडी वस्तू आणि त्यांवरील नक्षीकाम इ. उद्योगधंदे चालतात. याच्या आसमंतात पिकणाऱ्या तांदूळ, हरभरा, ज्वारी, गहू, जव, वरी व गळिताची धान्ये इ. शेतमालाच्या बाजारपेठेचे हे केंद्र आहे. शहरात प्राथमिक व माध्यमिक शाळा, मगध विद्यापीठाशी संलग्न असलेले महाविद्यालय, धर्मशाळा, दवाखाने वगैरे सोयी आहेत.

सावंत, प्र. रा.