मुर्शिदाबाद : प. बंगाल राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याच्या लालबाग उपविभागाचे प्रमुख ठिकाण व इतिहासप्रसिद्ध शहर. लोकसंख्या २१,९४६ (१९८१). हे भागीरथी (हुगळी) नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. मखसूदाबाद किंवा मकसूदाबाद अशी त्याची मूळ नावे. त्याचे अधिकृत शासकीय नाव लालबाग असे होते. अकबराने हे वसविल्याचे म्हटले जाते. येथील नबाब मुर्शीद कुली-खान याने डाक्क्याहून त्याचे मुख्यालय येथे हलविले (१७०४), त्यावरून शहरास मुर्शिदाबाद असे नाव पडले.

रॉबर्ट क्लाइव्ह याने केलेली स्वारी (१७५७), नागपूरकर भोसल्यांनी या शहरावर घातलेल्या धाडी यांमुळे शहराचे वारंवार नुकसान होत असे. १७९० साली येथील कंपनी सरकारचे न्यायालय कलकत्त्यास हलविण्यात आले. १७९९ मध्ये येथील टांकसाळ बंद करण्यात आली व जिल्ह्याचे मुख्यालय बेऱ्हमपूर येथे नेण्यात आले. १८८२ नंतर नवाबाचे निवासस्थान म्हणूनच त्याचे महत्त्व उरले.

शहरात ऐतिहासिक वैभवाच्या निदर्शक अशा वास्तू आहेत. हजारद्वारी नावाचा भव्य राजवाडा, इमामवाडा, मोतीझील (मोतीतलाव), मुबारक मंझिल उद्यान, खुशबाग ही येथील प्रेक्षणीय स्थळे. हस्तिदंत शिल्पे, रेशमी कपड्यांवरील भरतकाम, हुक्का व वाद्ये यांची निर्मिती हे येथील वैशिष्ट्यपूर्ण उद्योग आहेत. १८६९ मध्ये येथे मद्रसा व नगरपालिका स्थापन करण्यात आल्या.

मिसार, म. व्यं.