दिनविशेष : व्यक्ती, कुटुंबे, संस्था सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक गट, राष्ट्र यांच्या दृष्टीने संस्मरणीय असलेले दिवस. व्यक्तींच्या जीवनात त्याचप्रमाणे सामाजिक जीवनात अनेक संस्मरणीय प्रसंग घडतात. अशा प्रसंगांची सुखदायक किंवा स्फूर्तिदायक आठवण म्हणून ते ते दिवस विशेष महत्त्वाचे मानले जातात. कौटुंबिक जीवनात कुटुंबीय व्यक्तींचे वाढदिवस साजरे केले जातात. त्याचप्रमाणे विवाहाचे वाढदिवसही कित्येक कुटुंबांत साजरे करतात. देवतास्वरूप विभूतींचे जन्मदिवस जयंती म्हणून व थोर महात्म्यांची मृत्युतिथी पुण्यतिथी म्हणून त्या त्या समाजात पाळल्या जातात. संस्थांचे वर्धापनदिनही प्रतिवर्षी त्यांच्या स्थापनादिनी साजरे करण्यात येतात. थोर व्यक्तींच्या बाबतीत षष्ट्यब्दिपूर्ती (वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर) किंवा अमृतमहोत्सव (वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर) योजिले जातात. असे समारंभ खाजगीपणेही कुटुंबात करण्यात येतात. संस्थांच्या बाबतीत रौप्यमहोत्सव, सुवर्णमहोत्सव, हीरकमहोत्सव, शताब्दिपूर्ती असे दिनविशेष अनुक्रमे २५, ५०, ७५, १०० वर्षे पूर्ण झाल्यावर साजरे करतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्त्व प्राप्त झालेले संयुक्त राष्ट्रदिन (१४ ऑक्टोबर), कामगारदिन (१ मे), मानवी हक्कदिन (१० डिसेंबर) असे दिवसही साजरे केले जातात. भारतात शिक्षकदिनासारखा दिवस डॉ.राधाकृष्णन् यांच्या जन्मदिवशी (५ सप्टेंबर) तर बाल–दिनासारखा दिवस जवाहरलाल नेहरूंच्या जन्मदिवशी (१४ नोव्हेंबर) साजरा करतात. कामगार–दिन हा तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाळण्यात येतो. भारतात हुतात्म्यांचे पुण्यस्मरण म. गांधींच्या पुण्यतिथीला (३० जानेवारी) केले जाते. ज्या दिवशी राष्ट्र स्वतंत्र होते, तो दिवस त्या त्या राष्ट्रात स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. १५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्यदिन होय व २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन होय. १ मे हा महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा दिवस म्हणून साजरा केला जातो. महत्त्वाचे सामाजिक व राष्ट्रीय दिवस सभा, संमेलने, चर्चा, खेळांचे सामने, विविध स्पर्धा, प्रदर्शने इ. कार्यक्रमांद्वारे पार पाडण्यात येतात. षष्ट्यब्दिपूर्तीसारख्या प्रसंगी यथोचित धार्मिक विधी करण्यात येऊन संबंधित व्यक्तीला वा संस्थेला दीर्घजीवन लाभावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जातात. थोर व्यक्तींचे पुण्यस्मरण करण्यामागे त्यांच्या कार्यापासून स्फूर्ती मिळविणे हा हेतू असतो. स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जाते. त्याचप्रमाणे राजधानीत सैनिकी संचलनेही होतात. या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रमही योजिले जातात. भारतात वर्षाच्या प्रत्येक दिवशी पारंपरिक इतिहास–पुराणानुसार व धार्मिक दृष्टीने जे काही संस्मरणीय असे घडले आहे, त्याची नोंद प्र. न. जोशी यांनी दिनविशेष (१९६५) या पुस्तकात केलेली आहे. या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीस (१९५०) श्री. म. माटे यांची मार्मिक प्रस्तावना आहे. ती भारतीय दिनविशेषांच्या अभ्यासकांना उद्‌बोधक ठरेल.

जाधव, रा. ग.