दार्दानेल्स : प्राचीन हेलेस्पाँट, तुर्की चानाक्काले बोगाझी. इजीअन समुद्र व मार्मारा समुद्र यांस जोडणाऱ्या समुद्राच्या चिंचोळ्या भागास दार्दानेल्सची सामुद्रधुनी म्हणतात. या सामुद्रधुनीच्या वायव्येस यूरोपचे गलिपली हे द्वीपकल्प व आग्नेयीस आशिया मायनरची मुख्य भूमी आहे. ही सामुद्रधुनी नैर्ऋत्य–ईशान्य ६१ किमी. लांब असून रुंदी १–७ किमी. आहे. येथील पाण्याची सरासरी खोली ५५ मी. व कमाल खोली ९१ मी. आहे.
लष्करी दृष्ट्या हा भाग फार महत्त्वाचा आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळात ह्या सामुद्रधुनीत उत्तरेकडे काळ्या समुद्राचा मार्ग दोस्त राष्ट्रांच्या आरमारास खुला करण्याकरिता इंग्रजांनी येथे आपली सर्व शक्ती पणाला लावली परंतु त्यात त्यांना यश आले नाही. महायुद्धाच्या अखेरपर्यंत तुर्कस्तान व इतर शत्रुराष्ट्रांनी दोस्त राष्ट्रांना येथे शर्थीने थोपवून धरले. पूर्वीच्या काळीही ग्रीक, रोमन, इराणी व रशियन वगैरे लोकांनी ह्या सामुद्रधुनीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. पण त्यात कोणासच यश लाभले नाही. दार्दानेल्स सामुद्रधुनी संपूर्णपणे तुर्की जलसीमेत असून १४५३–१७७४ या काळात तुर्की सत्तांनी या सामुद्रधुनीचा वापर इतर देशांना करू दिला नाही. सोव्हिएट संघराज्याच्या दृष्टीने तिला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. बलाढ्य व अफाट विस्ताराच्या रशियातील व्यापारी व नौदलाच्या जहाजांना काळ्या समुद्रातून भूमध्य समुद्र व हिंदी महासागराकडे येण्याचा हा एकच जलमार्ग आहे. तसेच नाटो लष्करी संघटना व हिंदी महासागरातील बड्या देशांच्या नाविक हालचाली या दृष्टीनेही या सामुद्रधुनीचे महत्त्व खूपच आहे. व्यापारासाठी आंतरराष्ट्रीय करारानुसार ही सामुद्रधुनी सर्वांना खुली आहे. या सामुद्रधुनीवर गलिपली, एजेआबात, चानाक्काले ही प्रमुख बंदरे आहेत.
लिमये, दि. ह.