दामले, मोरो केशव : (७ नोव्हेंबर १८६८–३० एप्रिल १९१३). सुप्रसिद्ध मराठी व्याकरणकार. जन्मगाव रत्नागिरीनजीक मालगुंड. वडील केसो विठ्ठल हे प्राथमिक शिक्षक व पुढे रा. सा. मंडलिक यांच्या वेळणे या गावच्या शेतीचे कारभारी होते. कविवर्य केशवसुत व पत्रकार सी. के. दामले हे मोरो केशवांचे बंधू. मोरो केशवांचे शालेय शिक्षण दाभोळ, बडोदे व अमरावती येथे, तर उच्च शिक्षण पुण्याच्या डेक्कन कॉलेजात झाले. १८९२ मध्ये ते बी. ए. झाले आणि १८९४ मध्ये तत्वज्ञान हा विषय घेऊन एम्. ए. झाले. कॉलेजात ते दक्षिणा फेलो होते. १८९४ ते १९०८ पर्यंत ते उज्जैनच्या माधव कॉलेजात तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते व पुढे नागपूरच्या नील सिटी हायस्कुलात पर्यवेक्षक होते. डेक्कन कॉलेजात डॉ. रा. गो. भांडारकर आणि प्राचार्य सेल्बी हे त्यांचे गुरू होते. त्यांच्या शिकवणीमुळे प्रारंभी त्यांची मते सुधारकी बनली होती पण पुढे मात्र ते भाविक दत्तभक्त झाले.

चौदा वर्षे व्यासंग करून त्यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण (१९११) हा आपला एकमेवाद्वितीय ग्रंथराज रचला. पूर्वकालीन वैयकारणांच्या मताचे चिकित्सक समालोचन करून त्यांना मराठी–व्याकरणाची पुनर्रचना करण्याचा जो अपूर्व प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे त्यांना मराठी व्याकरणकारांत अग्रस्थान मिळालेले आहे. १९०४ साली भरलेल्या शुद्धलेखनपरिषदेत त्यांनी भाग घेतला होता. त्यांची यासंबंधीची सडेतोड मते शुद्धलेखन-सुधारणा अथवा सरकारी बंडावा (१९०५) या त्यांच्या पुस्तकात वाचावयास मिळतात. ग्रंथमाला या मासिकात ते प्रदीर्घ लेख लिहीत. त्यांतून त्यांची विचारभ्रमण आणि आधुनिक असंतोष (एडमंड बर्ककृत प्रेझेंट डिसकंटेंटचे भाषांतर) ही पुस्तके तयार झाली. न्यायशास्त्रे (निगमन) (१८९६) व न्यायशास्त्र पुस्तक दुसरे (विगमन) (१९०२) ही त्यांची तर्कशास्त्रावरील पुस्तके बडोदे सरकारने प्रसिद्ध केली होती. त्यांच्या गद्यलेखनावर निबंधमालेचा ठसा दिसून येतो. बोरघाटानजीक झालेल्या रेल्वे अपघातात त्यांचा शोचनीय अंत झाला.

मालशे, स.गं.