रानडे, श्रीधर बाळकृष्ण : (२४ जून १८९२ –२१ मार्च १९८४). मराठी कवी. ⇨ रविकिरण मंडळाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक. जन्म नागपूरचा. मुंबई विद्यापीठाचे बी. ए. व एम्. एस्‍सी. व्यावसायाने प्राध्यापक. रानडे ह्यांच्या पत्नी मनोरमाबाई रानडे (१८९६– १९२६) ह्याही रविकिरण मंडळात होत्या. दोघांनीही आपली काव्यरचना १९१२ च्या आसपास सुरू केली होती.

श्रीधर बाळकृष्ण रानडे ह्यांचे काळाच्या दाढेतून हे खंडकाव्य १९१५ साली प्रसिद्ध झाले. ते कॉलऱ्याने आजारी असताना त्यांच्या बालपणापासूनच्या अनेक आठवणी, स्वप्ने त्यांच्या डोळ्यांसमोरून गेली. आपण मरण पावलो असून देहातीत अवस्थेत गेल्याचे भासही त्यांना झाले. त्यांच्या ह्या सर्व मनःस्थितीचे दर्शन त्यांच्या ह्या खंडकाव्यातून घडते. मृत्यूच्या दारात जाऊन परत आल्यासारखा अनुभव ह्या आजारात त्यांनी घेतला होता.

त्यांची स्फुट कविता पाऊणशेच्या आसपास आहे आणि ती श्री -मनोरमा (१९३९) ह्या संग्रहात अंतर्भूत आहे. त्यांच्या व मनोरमाबाईंच्या कवितांचा हा संग्रह असून त्यात मनोरमाबाईंच्या ९२ कविताही समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. मनोरमाबाईंच्या काव्यरचनेत आत्मलेखनपर कविता सर्वाधिक आहे.

श्रीधर बाळकृष्ण रानडे आणि मनोरमाबाई रानडे हे दांपत्य रविकिरण मंडळाच्या काव्यात्म जीवनाचे अधिष्ठान होते. ‘माधुकरी’, ‘लेजीम’ असा श्रीधर बाळकृष्ण रानडे ह्यांच्या कविता लक्षणीय ठरल्या तरी त्यांनी पुढे मुख्यतः काव्यरसिकाची भूमिका घेतली. महाराष्ट्र रसवंती (भाग १ ते ३ १९३५-३६) ह्या अर्वाचीन कवितांच्या संग्रहांचे तसेच मराठी गद्यवैभव (भाग १ ते ३ १९३५-३६) ह्या पुस्तकांचे संपादन त्यांनी गं. दे. खानोलकर ह्यांच्यासह केले. मराठी साहित्यपरिचयाच्या हेतूने त्यांनी नवयुग वाचनमाला (१९३६ –३८) (पुस्तक पाचवे, सहावे, सातवे भाग अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा) संपादिली. दिवाळीची डाली (१९३८ – प्रहसन), कुंपणावरून (१९४७-छायानाट्य) असे नाट्यलेखनही त्यांनी केले आहे. तिंबूनानांचा रेडिओ (१९४४) ह्या त्यांच्या पुस्तकात रेडिओवरील गोष्टी-गाणी ह्यांसारख्या मनोरंजक कार्यक्रमाचे लेखन समाविष्ट आहे. पुणे येथे ते निधन पावले.

कुलकर्णी, अ. र.