दान्ते आलिग्येअरी : (? १२६५–१४ सप्टेंबर १३२१). जगद्विख्यात इटालियन महाकवी. ⇨ दिव्हीना कोम्मेदीआ (इं. शी. डिव्हाइन कॉमेडी) ह्या महाकाव्याचा कर्ता. दान्ते (किंवा दुरांते) फ्‍लॉरेन्स शहरात एका सरदार घराण्यात जन्मला. त्याचा नक्की जन्मदिवस ज्ञात नाही तथापि १२६५ सालच्या १५ मे ते १५ जून दरम्यान त्याचा जन्म झाला असावा. मध्ययुगीन इटलीतील नगरसंस्थानांतून (सिटी स्टेट्‌स) दोन पक्ष असत. पहिल्या ‘ग्वेल्फ’ किंवा पोपला पाठिंबा असणाऱ्यांचा दुसरा ‘गिबेलिन’ किंवा पोपविरोधी सरंजामी सरदारांचा ते राजसत्तेला व साम्राज्याला अनुकूल. दान्तेचे घराणे ग्वेल्फ पक्षाचे.

दान्ते
दान्ते

फ्‍लॉरेन्समध्ये चर्चने चालविलेल्या शाळांमधून दान्तेचे शिक्षण झालेले दिसते. बोलोन्या विद्यापीठातही काही काळ तो असावा. त्या काळी उपलब्ध असलेले औपचारिक शिक्षण त्याला चांगल्या प्रकारे मिळाले होते, असे दिसते. लॅटिनमधील अभिजात ग्रंथांचे त्याने अध्ययन केले होते. धर्मशास्त्राचा, तत्त्वज्ञानाचा, तसेच तत्कालीन विज्ञानविषयक ग्रंथांचा अभ्यास त्याने आस्थापूर्वक केला होता. फ्‍लॉरेन्समधील एक विद्वान व मुत्सद्दी ब्रूनेत्तो लातीनी (१२१२ ?–१२९४) ह्याच्याकडे दान्तेने साहित्यशास्त्राचा अभ्यास केला. तत्कालीन फ्‍लाॅरेन्समधील संपन्न सांस्कृतिक वातावरणाचाही–विशेषतः ग्वीदो काव्हालकांतीसारख्या कवीचा–दान्तेच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडल्याचे दिसून येते. व्हीता नूओव्हा (सु. १२९३, इं. शी. न्यू लाइफ) हा दान्तेचा पहिला काव्यसंग्रह त्याने काव्हालकांतीला अर्पण केलेला आहे.

वयाच्या नवव्या वर्षी एका समवयस्क मुलीबद्दल दान्तेच्या मनात उत्कट प्रेमाची भावना निर्माण झाली. ही भावना एकतर्फी होती. ही मुलगी दान्तेच्या काव्याची प्रेरणा ठरली तिच्याठायी त्याने देवत्व पाहिले. दिव्हीना कोम्मेदीआत दान्तेला स्वर्गात (पारादीसो) नेऊन ईश्वरी साक्षात्कार घडवून आणणारी बीआट्रिस हीच होय. आपल्या काव्यांतून दान्तेने तिला अमर केले आहे. दान्तेचा विवाह बीआट्रिसशी झाला नाही तो गेम्मा दोनाती नावाच्या स्त्रीशी झाला. दान्तेची व बीआट्रिसची भेटही दोन–तीनदाच झाली.

बीआट्रिस ही फ्‍लॉरेन्समधील फोल्को पोर्तिनारी ह्या सरदाराची मुलगी होती तिचा विवाह सिमोने देई बार्दी नावाच्या व्यक्तीशी झाला व वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी ती निधन पावली, असे बोकाचीओने लिहून ठेवलेले आहे.

बीआट्रिसच्या मृत्यूने दान्तेच्या जीवनावर खोल ठसा उमटविला. त्याने तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र ह्या विषयांत आपले मन घातले व्हर्जिल, ऑव्हिड, ल्यूकन, स्टेशिअस ह्यांसारख्यांचे अभिजात साहित्य वाचले सिसरो, सेंट ऑगस्टिन, बोईथिअस, सेंट टॉमस अक्वाय्‌नस व अरिस्टॉटल ह्यांच्या विचारांचा अभ्यास केला. दिव्हीना कोम्मेदीआसारखी श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण करण्याची पूर्वतयारी ह्या कालखंडात होत गेली. व्हीता नूओव्हामध्ये ही प्रक्रिया स्पष्टपणे प्रत्ययास येते. ह्या काव्यसंग्रहात एकूण ३१ भावकविता अंतर्भूत असून बीआस्ट्रिसबद्दल दान्तेच्या उत्कृष्ट भावना त्यांतून प्रकर्षाने प्रकट झालेल्या आहेत. ह्या कवितांबरोबर देण्यात आलेल्या स्पष्टीकरणात्मक गद्य निवेदनातून दान्तेने स्वतःच्या जीवनासंबंधीचे काही तपशील दिलेले आहेत. दान्तेच्या अंतर्जीवनाला व्यापून राहिलेल्या एका सखोल अनुभूतीची अभिव्यक्ती म्हणजे व्हीता नूओव्हा. बीआस्ट्रिसचे पहिल्यांदा घडलेले दर्शन, तिच्या पुढल्या भेटींतून निर्माण झालेले हर्षखेद, तिचा मृत्यू इ. बाबी त्यातून सांगितलेल्या असल्या, तरी ते दान्तेचे केवळ काव्यबद्ध आत्मवृत्त नव्हे त्यातूनही रूपकार्थ शोधण्याचे प्रयत्न झालेले आहेत. अमूर्त अशा बौद्धिक व नैतिक सद्‌गुणांचे समूर्त प्रतीक म्हणून बीआस्ट्रिसकडे पाहता येते. ह्या कवितांचा निव्वळ कविता म्हणून विचार केला, तरी त्यांतील उदात्त भावनांचा सहजाविष्कार विलोभनीय वाटतो. दान्तेच्या दिव्हीना कोम्मेदीआसारख्या सर्वश्रेष्ठ साहित्यकृतीच्या संदर्भात त्याच्या इतर साहित्यकृती काहीशा दुय्यम वाटल्या, तरी त्याच्या प्रत्येक साहित्यकृतीत त्याच्या अन्य कृतींवर कमीजास्त प्रकाश टाकण्याचे सामर्थ्य आहे. त्या दृष्टीने व्हीता नूओव्हा आणि दिव्हीना कोम्मेदीआ ह्यांचे परस्परसंबंध विशेष लक्षणीय आहेत. दिव्हीना कोम्मेदीआच्या निर्मितीची इच्छा आणि बीजे व्हीता नूओव्हात स्पष्टपणे दिसून येतात. ह्या दोन्ही साहित्यकृतींचा अभ्यास परस्परांच्या आकलनाला पूरक ठरतो.

दान्तेचा परलोकप्रवास–इन्फेर्नो (हेल) पासून पारादीसो (पॅरडाइस) पर्यंतचा–हा दिव्हीना कोम्मेदीआचा वरपांगी विषय तथापि रूपकार्थाने, ईश्वराप्रत जाऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही आत्म्याचा हा आध्यात्मिक प्रवास ठरतो. ह्या महाकाव्यात बीआट्रिस दान्तेला ईश्वरी साक्षात्कार घडवून आणते, असे दाखविले आहे.

बीआट्रिसच्या मृत्यूनंतर दान्ते फ्‍लॉरेन्स शहराच्या राजकारणात गुंतला. ह्या शहरात त्या वेळी ग्वेल्फ पक्षाचे प्राबल्य होते व गिबेलिन पक्षाच्या लोकांना फ्‍लॉरेन्समधून परागंदा व्हावे लागले होते. तथापि ग्वेल्फ पक्षही अभंग राहिला नाही त्यात ‘व्हाइट्‍स’ आणि ‘ब्‍लॅक्स’ असे दोन गट पडले. पोपच्या सत्तेविषयी पहिल्या (व्हाइट्‌स) गटाचे मन स्वस्थ नव्हते त्याचा कल आणि भूमिका काहीशी गिबेलिन पक्षाच्या जवळपास येणारी होती. दान्ते ह्या गटाचा होता. राजकीय कार्य करीत असताना दान्तेने शहरातील अनेक समित्यांवर कामे केली. शहराचा एक प्रायर किंवा अध्यक्ष म्हणूनही त्याची काही काळ नियुक्ती झालेली होती. दोन्ही गटांबाबत निःपक्षपाती राहण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला प्रसंगी दोन्ही गटांच्या लोकांना हद्दपार केले. अशा मंडळींत दान्तेचा आवडता कवी ग्वीदो काव्हालकांती हाही होता. तथापि पुढे ह्या दोन गटांतील संघर्ष वाढून ‘ब्‍लॅक्स’ची सरशी होताच दान्तेवर १३०२ मध्ये फ्‍लॉरेन्समधून हद्दपार होण्याचा प्रसंग आला. ही शिक्षा जाहीर झाली, तेव्हा दान्ते पोप आठवा बॉनिफेस ह्याच्याकडे गेलेल्या शिष्टमंडळाबरोबर रोममध्ये होता. त्यानंतर आपल्या आवडत्या शहरात तो कधीच परत येऊ शकला नाही. दारिद्र्य आणि एकाकीपणा ह्यांना तोंड देत त्याला इटलीत भ्रमंती करावी लागली. ह्या भ्रमंतीत इटलीतील काही संस्थानिकांचे संरक्षण आणि आश्रय मात्र त्याला अधूनमधून लाभत राहिला. राजकीय अज्ञातवासात असतानाच राव्हेना येथे त्याचे निधन झाले. दान्ते दे व्हल्गारी इलोक्वेंतीआ (लॅटिन) आणि इल कोन्व्हीव्ही(इं. शी. बँक्विट) ह्या दोन ग्रंथांचे लेखन ह्या अज्ञातवासातच सुरू केले. सु. १३०४ ते १३०७ ह्या कालखंडात इल कॉन्व्हीव्हीओ हा ग्रंथ दान्तेने लिहिला असावा. त्यात तीन उद्देशिका (ओड्‌स) असून प्रत्येक उद्देशिकेनंतर गद्य निवेदन आहे. तात्त्विक आणि धर्मशास्त्रीय विचार मांडणे, हा ह्या ग्रंथाच्या लेखनामागील प्रधान हेतू आहे उद्देशिका निमित्तमात्र आहेत. प्‍लेटो, अरिस्टॉटल, व्हर्जिल, ल्यूकन, ऑव्हिड, सेंट ऑगस्टीन, सेंट अल्बर्ट्‌स मॅग्नस, सेंट टॉमस अक्वाय्‌नस इत्यादिकांचे विचार व विधाने इल कोन्व्हीव्हीओमध्ये उद्‌धृत करण्यात आले आहेत. ला व्हीता नूओव्हामधील तरुण कोवळ्या भावविष्काराच्या पार्श्वभूमीवर ह्या ग्रंथातील चिंतनशीलता वेगळीच उठून दिसते जीवनातील कडूगोड अनुभवांनी आणि ताणतणावांनी तसेच त्यांनी चेतविलेल्या अध्ययनशीलतेने परिपक्व झालेल्या दान्तेची प्रतिमा त्यातून प्रतीत होते. तत्त्वज्ञानाबद्दल आस्था असूनही ज्यांना विविध अडचणींमुळे त्याच्याशी आपला परिचय करून घेता येत नाही, अशांसाठी दान्तेने ह्या ग्रंथातून ज्ञानाची मेजवानी देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

दे व्हल्गारी…(सु. १३०४, इं. शी. ऑन द इलस्ट्रियस व्हर्‌नॅक्यूलर) मध्ये इटालियम भाषेचे जोरदार समर्थन दान्तेने केले. त्या काळी इटलीत असलेले लॅटिन भाषेचे प्रस्थ लक्षात घेता अशा प्रकारच्या समर्थनाची आवश्यकता होतीच. इटलीतील लॅटिनप्रेमी सुशिक्षितांना ह्या ग्रंथाचे आवाहन असल्यामुळे तो लॅटिनमध्ये लिहिला गेला.

दे व्हल्गारी… प्रमाणे दे मोनार्कीआ  हा दान्तेचा आणखी एक ग्रंथ लॅटिनमध्ये आहे. १३१२–१३ मध्ये तो रचिला गेला असावा, असा एक तर्क आहे. दान्तेने आपले राजकीय विचार त्यात अत्यंत पद्धतशीरपणे मांडलेले आहेत. माणसाच्या अंतःशक्तींचा पूर्ण विकास होण्याच्या दृष्टीने त्याला शांतता आणि स्वास्थ लाभले पाहिजे हे साधण्यासाठी जागतिक शासनाची आवश्यकता आहे आणि अशा शासनाचा प्रमुख रोमन सम्राट असणे योग्य आहे अशी भूमिका त्याने घेतलेली आहे. राजाला सत्ता पोपकडून प्राप्त हाेते असे मानायचे, की ईश्वराकडून, ह्या प्रश्नाचा विचारही दान्तेने केलेला आहे. पोप हा सम्राटाचा आध्यात्मिक मार्गदर्शक मानता येईल परंतु पोप आणि सम्राट ह्या दोघांच्या सार्वभौम सत्तेची जगे पूर्णत: वेगवेगळी आहेत, अशी दान्तेची धारणा होती.

दान्ते हा मध्ययुगीन यूरोपीय कवींपैकी अखेरचा श्रेष्ठ कवी होय. इटलीत उदयास आलेले पहिले मानवतावादी व दान्ते ह्यांच्यातील अंतर एका पिढीचे. दान्तेचा प्रभाव ह्या मानवतावाद्यांवर तर होताच परंतु इटलीबाहेरही तो व्यापक प्रमाणात पसरलेला होता. विविध कालखंडांत वेगवेगळ्या प्रकारे दान्तेच्या कवितेने आपली आवाहकता सिद्ध केलेली आहे. अठराव्या शतकातील विवेकनिष्ठ नव–अभिजाततावाद्यांच्या अभिरुचीला दान्ते फारसा उतरला नसला, तरी एकोणिसाव्या शतकात त्याच्या काव्यातील ‘गॉथिक भव्यते’ने समीक्षकांना भारावून टाकले. त्याने वापरलेल्या वैविध्यपूर्ण प्रतिमा आणि सूचक रूपकार्य आधुनिकांना मन:स्पर्शी वाटतात. कोलरिज, एमर्सन, व्हिक्टर ह्यूगो, जॉन रस्किन ह्यांसारख्या साहित्यश्रेष्ठींनी दान्तेला गौरविले आहे. विसाव्या शतकातील श्रेष्ठ समीक्षक टी. एस्. एलियट ह्याने आधुनिक भाषांच्या साहित्यातील सर्वांत विश्वात्मक (युनिव्हर्सल) कवी म्हणून त्याचा गौरव केला आहे.

पद्धतशीरपणे तात्त्विक दर्शन रचणारा विचारवंत ह्या अर्थाने दान्ते तत्त्ववेत्ता नव्हता पण प्‍लेटो, अरिस्टॉटल, विशेषत: अरिस्टॉटलवरील सेंट टॉमस अक्वाय्‌नसची भाष्ये, सिसरो, बोईथिअस इ. तत्त्ववेत्त्यांच्या लिखाणाचा त्याने अभ्यास केला होता आणि ह्या अध्ययनाचा त्याच्या विचारांवर व वृत्तीवर खोल परिणाम झाला होता. तत्त्वज्ञानाचे ख्रिश्चन धर्मशास्त्रापासून स्वतंत्र असे स्थान आणि प्रामाण्य मान्य करण्याकडे त्याच्या विचारांचा रोख होता. तत्त्वज्ञान म्हणजे शहाणपणाचे प्रेम ही पायथॅगोरसप्रणीत व्याख्या त्याने स्वीकारली होती. वस्तूंच्या स्वरूपाचे आकलन करणे हे तत्त्वज्ञानाचे कार्य होय आणि वस्तूंविषयीच्या दिव्यप्रेमात हे आकलन फलद्रूप होत असते. प्‍लेटो आणि ॲरिस्टॉटल ह्यांना अनुसरून माणसाचे कल्याण द्विविध असते, असे दान्ते मानतो. विचाराच्या साहाय्याने अंतिम सत्‌तत्त्वाचे आकलन करून त्याचे चिंतन करण्यात एक प्रकारचे कल्याण सामावलेले असते व व्यक्तीच्या कृतिशील जीवनाचे योग्य प्रकारे नियमन करण्यात दुसऱ्या प्रकारचे कल्याण असते. पहिल्या प्रकारचे कल्याण श्रेष्ठ असते दुसऱ्या प्रकारचे कल्याण त्याच्याहून कनिष्ठ असते पण दुय्यम नसते. ते स्वायत्त असते. तत्त्वज्ञानाच्या विविध शाखांमध्ये दान्ते नीतिशास्त्राला सर्वश्रेष्ठ स्थान देतो कारण नीतिशास्त्रामुळे इतर सर्व शास्त्रांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन आपल्याला प्राप्त होतो. ज्या उदात्त वृत्तीने जगण्यात माणसाचे कल्याण सामावलेले असते तिचे स्वरूप कसे असते, तिचा उगम कशात असतो हे दान्तेच्या तत्त्वज्ञानातील प्रमुख प्रश्न होते. दान्तेच्या मते ईश्वरी प्रसाद हे ह्या उदात्त वृत्तीचे स्वरूप असते आणि आपल्या व्यावहारिक जीवनात व्यक्त होणाऱ्या अनेक सद्‌गुणांच्या रूपाने ती फलद्रूप होत असते. सारांश, चिंतनशीलता आणि आध्यात्मिक कल्याण यांचे श्रेष्ठत्व मान्य करूनही माणसांच्या ऐहिक, कृतिशील जीवनाचे स्वायत्तपणे नियमन करून त्याचे व्यावहारिक कल्याण साधणे हे तत्त्वज्ञानाचे महत्त्वाचे कार्य आहे, असे दान्ते मानतो. ह्यालाच अनुसरून सामाजिक क्षेत्रात समाजाच्या ऐहिक व्यवहाराचे नियमन करून सामाजिक व्यवस्था निर्माण करणारा सम्राट हा समाजाच्या धार्मिक जीवनाचे नियमन करणाऱ्या पोपपेक्षा कनिष्ठ असला, तरी आपल्या क्षेत्रात स्वायत्त असला पाहिजे, असेही दान्ते मानतो.

संदर्भ : 1. Bergin. T. G. Dante, New York, 1965.

2. Chubb, Thomas, Dante and His world, Boston, 1966.

3. D’ Entreves, A. P. Dante as a Political Thinker, New York, 1952.

4. Eliot, T. S. Dante, London, 1929.

5. Gilson, Etienne Trans. Moore, Davis, Dante the Philosopher, New York, 1949.

6. Sigleton, C. S. An Essay on the Vita Nouva, Cambridge, Mass., 1949.

7. Toynbee, Paget, Dante Alighierti, 4th Ed., London, 1900.

रेगे, मे. पुं.; कुलकर्णी, अ. र.