दाते, शंकर गणेश : (१७ ऑगस्ट १९०५–१० डिसेंबर १९६४). मराठी ग्रंथसूचिकार. रत्नागिरी येथे जन्म. शिक्षण प्रथम मुंबई व नंतर पुणे येथे. पुण्याच्या ‘सर परशुरामभाऊ कॉलेज’ मध्ये बी. ए.च्या अखेरच्या वर्षासाठी ते होते तथापि त्या परीक्षेस मात्र ते बसले नाहीत. लहानपणापासूनच लेखन–वाचनाची आवड. दुर्मिळ ग्रंथ जमा करण्याचा त्यांना छंद होता. त्यांच्या लोककथांचे दोन संग्रह (१९२९, १९३०) हे त्यांच्या संग्रहवृत्तीचे पहिले फलित. कोणत्याही स्वरूपाच्या नोकरीच्या प्रलोभनाला टाळून त्यांनी सर्व आयुष्य ग्रंथ जमविणे, ग्रंथांच्या वर्गीकरणासंबंधी लेखन करणे आणि पुढे मराठी ग्रंथसूचीची सिद्धता करणे यासाठीच खर्ची घातले.

कार्यैकनिष्ठा, त्यासाठी अपार कष्ट करण्याची तयारी आणि सूचिशास्त्रातील काटेकोरपणा या गुणांमुळे दाते यांनी सुरू केलेले ग्रंथसूचीचे दुर्घट कार्य तडीस गेले. या एकाच कार्याचा ध्यास घेतल्याने, शासकीय वा अन्य संस्थांचे पाठबळ नसतानाही दाते यांचा महदुद्योग यशस्वी झाला.

इ.स. १८०० ते १९३७ या काळातील प्रकाशित मराठी ग्रंथांच्या सूचीचा पहिला खंड १९४३ मध्ये व १८३८ ते १९५० या काळातील प्रकाशित मराठी ग्रंथांच्या सूचीचा दुसरा खंड १९६१ मध्ये प्रकाशित झाला. शास्त्रशुद्ध पद्धतीने सिद्ध केलेली अशी ग्रंथसूची केवळ मराठी भाषेतच नव्हे, तर अन्य भारतीय भाषांतही अभूतपूर्व आहे. यासाठी दाते यांनी सु. २३ हजार मराठी ग्रंथ अखंड पायपीट करून नजरेखाली घातले. ‘नादृष्टं लिख्यते किंचित’ अशी त्यांची ठाम भूमिका असल्याने त्यांच्या सूचीतील नोंदी अधिकृततेच्या कसोटीवर उतरतात. मराठी भाषा व वाङ्‌मय यांची कोणत्याही भूमिकेतून पाहणी करू इच्छिणाऱ्या अभ्यासक–संशोधकांचा दाते–ग्रंथसूचि हा बहुमोल आधारस्तंभ आहे. या सूचिकार्यामुळे ‘राष्ट्रीय ग्रंथसूची’तील १९०१ ते १९१३ या काळातील मराठी विभागाच्या सूचीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती.

नंतर १९५० पर्यंतच्या मराठी नियतकालिकांची सूची त्यांत आलेल्या ज्ञानवाहक लेखांच्या माहितीसह तयार करण्याची तयारीही दाते ह्यांनी केलेली होती त्यासाठी साक्षेप-सायासाने बरीच साधनसामग्रीही त्यांनी गोळा केली होती तथापि पुणे येथे झालेल्या त्यांच्या मृत्यूमुळे हे संकल्पित कार्य त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकले नाही. त्यांच्या पश्र्चात मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने ‘शं. ग. दाते सूचिमंडळ’ अशी खास शाखा स्थापन करून आणि दाते ह्यांनी मागे ठेविलेली मौल्यवान सामग्री मिळवून त्यांचे हे संकल्पित कार्य बरेचसे पूर्ण करीत आणले आहे.

कानडे, मु. श्री.