दशकुमारचरित: अभिजात संस्कृतातील एक प्रसिद्ध प्राचीन गद्यकथा. कर्ता ⇨दंडी. संस्कृतातील गद्यकथांची संख्या थोडी असली, तरी त्यांची परंपरा प्राचीन आहे. दशकुमारचरित, वासवदत्ता, हर्षचरित, कादंबरी, तिलकमंजरी, गद्यचिन्तामणी आणि वीरनारायण ह्या प्राचीन गद्यकथा होत. काव्यादर्श हा काव्यशास्त्रविषयक ग्रंथही दंडीने लिहिला आहे परंतु हे दोन दंडी असावेत, असे काहींचे मत आहे. अलीकडील संशोधनाने दोन अथवा तीन वेगळे दंडी, हे मत मागे पडले आहे. ह्याशिवाय काहींच्या मते अवन्तिसुन्दरीकथाही दंडीच्या नावावर मोडते.
पूर्वपीठिका (पाच उच्छ्वास), दशकुमारचरित (आठ उच्छ्वास) आणि उत्तरपीठिका (चार उच्छ्वास) असे दशकुमारचरिताचे तीन भाग आहेत. उत्तरपीठिका ही चन्द्रमौली दीक्षिताचा मुलगा चक्रपाणी दीक्षित याने रचिली आहे. तो दाक्षिणात्य होता. दशकुमारचरित ह्या नावावरून त्यात दहा कुमारांची चरित्रे असावीत, असा ग्रह होतो. परंतु त्याच्या मधल्या भागात आठांचीच चरित्रे आहेत. त्याचा आरंभ आकस्मिक असून त्यास सामान्यतः आढळणारे मंगलाचरणही नाही. शेवटही अपूर्ण सोडलेला आहे. तथापि एवढाच भाग दंडीने रचिला असावा. पूर्वपीठिका (अकरावे शतक) व उत्तरपीठिका निरनिराळ्या लेखकांनी लिहिल्या असाव्यात. अवन्तिसुन्दरीकथासार ह्या ग्रंथाच्या संदर्भात अवन्तिसुन्दरीकथेचे परीक्षण केल्यास दशकुमारचरिताच्या अपूर्ण लेखनाची थोडी उकल होते. दशकुमारचरित हे दंडीने प्रथम तरुण वयात लिहिले असावे. उत्तरवयात ह्या कथामालेला व्यवस्थित रूप अवन्तिसुन्दरीकथा रचून दिले असावे.
दशकुमारचरिताच्या ऐनजिनसी भागात राजपुत्र राजवाहन, अपहारवर्मा, उपहारवर्मा, अर्थपाल, प्रमाती, मित्रगुप्त, मंत्रगुप्त आणि विश्रुत अशा आठ कुमारांच्या कथा आहेत. राजवाहनाची कथा वगळता प्रत्येक कथा स्वतः त्या त्या कुमाराने सांगितलेली आहे. प्रत्येक कथेत साहसाचे प्रसंग असून शेवटी प्रत्येक कुमाराला एक लावण्यवती तरुणीची प्राप्ती झालेली आहे. ह्या सर्व कथांचा श्रोता राजवाहन आहे. प्रत्येक कुमार राजवाहनाला शोधण्यासाठी बाहेर पडला असता ज्या साहसप्रसंगांमधून निभावला जातो, त्यांची ती कथा आहे आणि सर्वजण एकत्र आल्यावर प्रत्येकाने राजवाहनाला त्या कथा सांगितलेल्या आहेत. ह्या तंत्रामुळे ह्या कथा म्हणजे नुसता वेगवेगळ्या कथांचा संग्रह न होता एकमेकांत गुंफिलेली एक कथामाला बनलेली आहे.
ह्या सर्व धूर्तकथा आहेत. शोधासाठी देशोदेशी भटकंती करणाऱ्या कुमारांचे विविध, विचित्र अनुभव सांगणाच्या निमित्तीने दंडीने चोरी, जारकर्म, चमत्कार, घरफोडी, जुगार, मद्यपान, घातपात, लोभी ब्राह्मण, बौद्ध कुंटिणी, दांभिक, खोटारडे जैन साधू, पाषाणहृदयी वेश्या, दुष्काळ, युद्ध, खून, वेषांतर, कारस्थाने, कुलटा स्त्रिया, कोंबड्यांची झुंज, समुद्रपर्यटन इत्यादींची संस्कृत वाङ्मयात क्वचित सापडणारी दिलखुलास विपुल वर्णने केलेली आहेत. संस्कृत साहित्यात सर्वसामान्यपणे ज्या थरांची वर्णने येतात त्यांपेक्षा प्रस्तुत कथेमध्ये आलेले समाजाचे थर फार वेगळे आहेत. ह्या गोष्टींत प्रच्छन्न औपरोधिक भागही अनेकदा डोकावतो. दंडीच्या शैलीत विनोद, चित्रमयता, आवेश, प्रमाणबद्धतेची जाणीव आणि विविधता आहे. त्याची भाषा व्याकरणदृष्ट्या निर्दोष नसेल पण ती धावती, चटपटीत, वेधक आणि बरीचशी शब्दजंजालविरहीत आहे. शब्दयोजनेत मधुरता आहे. त्यामुळेच बहुधा दंडीच्या पदलालित्याचा बोलबाला झाला असावा. एक कथा ओष्ठ्यवर्णविरहित शब्द योजून दिली आहे. रचनेचा हा चमत्कार लक्षणीय आहे. त्याने रेखाटलेले जग असांकेतिक व त्याच्या दुनियादारीतील माणसे लोक जीवनाच्या विचित्र, भिन्नभिन्न थरांतील आहेत. त्यामुळे दशकुमारचरित ही संस्कृतातील एक वेगळ्या प्रकारची वाङ्मयीन निर्मिती ठरते.
मंगरूळकर, अरविंद