दयाराम : (? १७७७ – ९ फेब्रुवारी १८५२). मध्यकालीन गुजराती साहित्याचा अखेरचा प्रतिनिधि म्हणून दयाराम हा वैष्णव कवी प्रसिद्ध आहे. त्याचा जन्म साठोदरा नागर ब्राह्मण कुटुंबात नर्मदातीरी चांदोद गावी झाला. मातापिता राजकुंवर आणि प्रभुराम. लहानपणीच तो पोरका झाला. लहानपणी त्याचा विवाह ठरला होता. तथापि नियोजित वधू प्रत्यक्ष विवाहापूर्वीच मरण पावली. नंतर त्याने विवाह केला नाही. त्याचे बालपण चांदोदलाच गेले. लहानपणी तो फार हूड व खोडकर होता. पुढे त्याची ही वृत्ती पालटून ते वैष्णव भक्त बनला. त्याचे मूळ नाव दयाशंकर होते पण पुढे वैष्णव मताची दीक्षा घेतल्यावर त्याने दयाराम हे नाव धारण केले.
प्रथम त्याने केशवानंद संन्याशाकडून व नंतर डाकोर येथील इच्छाराम भट्ट नावाच्या पंडिताकडून वैष्णव मताची दीक्षा घेतली. इच्छाराम भट्ट याच्या प्रेरणेनेच त्याने तीन वेळा भारताची आणि सात वेळा राजस्थानातील श्रीनाथद्वाराची यात्रा केली. त्याचे पूर्वायुष्य तीर्थयात्रा करण्यातच व्यतीत झाले. तीर्थयात्रांमुळे त्याचे अनुभवक्षेत्र समृद्ध बनले आणि त्याला अनेक भाषाही अवगत करता आल्या. मारवाडी, व्रज, मराठी, पंजाबी, बिहारी, सिंधी, उर्दू, संस्कृत इ. भाषांचे त्याला उत्तम ज्ञान होते व त्यांत त्याने काव्यरचनाही केलेली आहे. व्रज भाषेवर तर त्याचे असामान्य प्रभुत्व होते व तीत त्याने काव्यरचनाही केली.
वयाच्या विसाव्या वर्षी तो चांदोदहून डभोईस येऊन राहू लागला. तो सुंदर होता व त्याचे व्यक्तिमत्वही प्रभावी होते. त्याला उत्कृष्ट आवाजाची व प्रतिभेची उपजतच देणगी लाभली होती. त्याची राहणी विलासी व वृत्ती रसिक होती. उत्तरायुष्यात त्याच्या जीवनात रतनबाई नावाची सोनार जातीची एक बालविधवा प्रविष्ट झाली. तिच्याशी असलेले त्याचे जिव्हाळ्याचे संबंध त्याच्या मृत्यूपर्यंत टिकून होते. रतनबाईनेही त्याची मोठ्या निष्ठेने अखेरपर्यंत सेवाशुश्रूषा केली. तिच्याशी असलेल्या आपल्या लौकिक संबंधास त्याने आध्यात्मिक उपासनेतील अडसर कधीच मानले नाही. तो सर्वच बाबतीत मुक्त जीवन जगला. एका कृष्णाशिवाय तो इतर कोणाही पुढे नतमस्तक झाला नाही. त्याच्या ह्या विलक्षण जिवनाचे गुजरातीत अनेकांनी चित्रण केले आहे. कृष्णलाल झवेरी, गोवर्धनराम त्रिपाठी, मूलचंद तेलीवाला, जगजीवनदास मोदी यांच्या ग्रंथांचा या संदर्भात अवश्य उल्लेख करावा लागेल. मथुरा–वृंदावन ही क्षेत्रे तसेच ⇨अष्टछाप कवींच्या व्रज साहित्याने त्याला आकर्षित केले. व्रज येथे पुष्टिमार्गाचे तत्कालीन गोस्वामी वल्लभलाल यांच्याकडून त्याने पुष्टिमार्गाची दीक्षाही घेतली. अनुभवमंजरी नावाच्या ग्रंथात त्याने स्वतःला अष्टछाप कवींतील ⇨नंददासांचा अवतार म्हटले आहे.
दयारामने विविध भारतीय भाषांत विपुल काव्यनिर्मिती केली. त्याच्या लहानमोठ्या काव्यग्रंथांची संख्या सु. ७५ आहे. काही अभ्यासकांच्या मते ही संख्या दीड–पावणेदोनशेच्या घरात जाते. त्याच्या गुजराती आणि हिंदीतील महत्त्वाच्या ग्रंथरचनेचे वर्गीकरण कनैयालाल मुनशींनी पुढीलप्रमाणे केले आहे :
(१) पुष्टिमार्गाशी संबंधित : वल्लभनो परिवार, चौरासी वैष्णवनु ढोळ, मक्तिपोषण. (२) पुष्टिमार्गी सिद्धांत व तत्त्वज्ञानाशी संबंधित : रसिकवल्लभ, सतसैया. (३) पौराणिक आख्याने : अजामिलाख्यान, वक्त्रासुराख्यान, सत्यभामाख्यान, ओखाहरण, दशमलीला, रासपंचाध्यायी. (४) संकीर्ण : नरसिंह महेतानी हुंडी, षडऋतुवर्णन, नीतिभक्तिनां पदो. (५) गरबीसंग्रह.
वरील वर्गांतील त्याची बहुतांश रचना, गरबीसंग्रहाचा अपवाद सोडल्यास, पारंपारिक स्वरूपाची असून तीत नवीन वा वैशिष्ट्यपूर्ण असे काही नाही. रसिकवल्लभमध्ये त्याने शांकर वेदान्त मताच्या विरोधात पुष्टिमार्गी वैष्णव मताचे प्रतिपादन केले आहे. या ग्रंथातील त्याची शैली आकर्षक असून तीत संस्कृत व व्रज शब्दांचे वैपुल्य आढळते.
कृष्णभक्तिपर हजारो पदे त्याने रचली असून ती मात्र वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांत गरबी, बोधपर पदे, कृष्णकीर्तनपर तिथो, बारमासी, प्रार्थना इ. स्फुटकाव्यांचा अंतर्भाव होतो. त्याने सव्वा लाख पदे रचल्याचे अनुयायी सांगतात. कृष्णभक्तिपर पदांत त्याने रचलेली गरबी नावाची गीते सर्वोत्कृष्ट असून त्यांमुळेच तो श्रेष्ठ कवी मानला जातो. गुजरातमध्ये तो ‘गरबीसम्राट’ समजला जातो. त्याची प्रतिभा प्रामुख्याने भावगीतानुकूल होती. तिचा उत्कृष्ट अविष्कार त्याच्या गरबींतून झाला कारण गरबीरचना गीतानुकूल आहे. आपल्या प्रतिभासामर्थ्याने दयारामने गरबी हा काव्यप्रकार परमोत्कर्षास नेला. नरसी मेहता, भालण इत्यादींनीही दयारामपूर्वी गरबी रचल्या तथापि दयारामच्या गरबींची सर त्यांना नाही. गुजरातच्या सांस्कृतिक जीवनात त्याच्या गरबींचे स्थान अनन्यसाधारण आहे.
भक्तिशृंगारातील विविध व सूक्ष्म भावच्छटा दयारामने आपल्या गरबींत कलात्मकपणे साकार केल्या. भाव, अर्थ, ध्वनी, ताल व संगीत यांची मनोज्ञ एकरूपता त्याच्या गरबींत प्रत्ययास येते. राधा व गोपी यांच्या कृष्णप्रेमाचा व कृष्णलीलांचा विषय गरबींत आहे. गोपींशी स्वतःचे तादात्म्य कल्पून व कृष्णास प्रियकर मानून सखीभावाने त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याच्या गरबींत सूफी ढंग तसेच जयदेवाच्या गीतगोविंदातील शृंगार यांचे स्मरण करून देण्याचे सामर्थ्य आहे. त्याची भक्ती ही प्रेमलक्षणाभक्ती होती. सर्वच स्तरांतील गुजराती स्त्रिया त्याच्या गरबी मोठ्या आवडीने आणि निःसंकोचपणे गाताना दिसतात.
कनैयालाल मुनशींनी दयारामला भक्तकवी न म्हणता ‘प्रेमीकवी’ म्हटले आहे. त्याच्या रचनेतून त्याचे भक्तापेक्षा कवी व प्रेमी म्हणूनच अधिक ठळकपणे दर्शन घडते. दयारामच्या निधनानंतर मध्यकालीन गुजराती साहित्याचा व कृष्णभक्तिपर काव्याचा अस्त होऊन नव्या आधुनिक युगाची सुरुवात होते.
संदर्भ : रावळ, अनंतराय, कवि–श्री माला : दयाराम, वर्धा, १९६२.
सुर्वे, भा. ग.