थीओफ्रॅस्टस : (इ. स. पू. सु. ३७२–२८७). प्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञानी ⇨ ॲरिस्टॉटल (इ. स. पू. ३८४–३२२) यांचे पट्टशिष्य, उत्तम निरीक्षक व शिक्षक त्यांना ‘वनस्पतिशास्त्राचा पिता’ असे म्हणतात. त्यांचा जन्म लेझबॉस बेटावरील एरेसस येथे झाला त्यांचे पहिले नाव टीर्टमस असे होते, परंतु ॲरिस्टॉटल यांच्या सांगण्यावरून त्यांनी ते थीओफ्रॅस्टस असे केले. त्यांचे शिक्षण अथेन्स येथे प्लेटो व ॲरिस्टॉटल यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. ॲरिस्टॉटल यांनी निवृत्त होऊन चाल्सीसकडे जाताना (इ. स. पू. ३२२–३२१) थीओफ्रॅस्टस यांना आपल्या पेरिपॅटेटिक संप्रदायाचे प्रमुख (पेरिपॅटॉस) नेमले आणि थीओफ्रॅस्टस यांच्या (सु. ३५ वर्षांच्या) काळातच या संप्रदायाची चांगली भरभराट झाली आणि त्याच काळात विद्यार्थी व श्रोते यांची संख्या अत्युच्च म्हणजे दोन हजारांवर गेली होती. त्यांनी सु. पाचशे, बव्हंशी लागवडीतील वनस्पतींच्या नावांची यादी व वर्णने केली होती त्यांपैकी बरीच वंशनामे आधुनिक ⇨ वर्गीकरणविज्ञानात वापरली जात आहेत. त्यांच्या वर्गीकरणात वनस्पतींची विभागणी ⇨ ओषधी, ⇨ क्षुपे (झुडपे) व उपक्षुपे आणि ⇨ वृक्ष अशी केली जात होती. तसेच त्यांनी वनस्पतींच्या आयुःकालातील वर्षायू, द्विवर्षायू व बहुवर्षायू (एक, दोन व अनेक वर्षे जगणाऱ्या) हे भेद ओळखले होते कुंठित (मर्यादित) व अकुंठित फुलोरे [⟶ पुष्पबंध], जुळलेल्या व सुट्या पाकळ्या आणि किंजपुटाच्या स्थानातील भिन्नत्व त्यांनी ध्यानी घेतले होते त्यांनी स्थूलमानाने केलेल्या वनस्पतींच्या गटांतील खऱ्या आप्तसंबंधांची त्यांना पूर्ण कल्पना आली नसावी त्यामुळे ते गट कृत्रिमच होते तथापि वनस्पतींच्या वर्गीकरणाबाबत [⟶ वनस्पतींचे वर्गीकरण] त्यांनी बुद्धिनिष्ठ मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न केला हे निर्विवाद परंतु आपल्या गुरूच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव ते सर्वस्वी दूर करू शकले नाहीत. अफूच्या (पॉपी) रसाचा निश्चित उल्लेख पहिल्याने त्यांच्याच लिखाणात आढळतो.
थीओफ्रॅस्टस यांनीच ॲरिस्टॉटल यांचे तत्त्वज्ञान पूर्णपणे स्वीकारून अध्यात्मविद्या, भौतिकशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान, प्राणिविज्ञान, वनस्पतिविज्ञान, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र, सांस्कृतिक इतिहास इ. सर्व विषयांतील पद्धतशीर ऐक्याला बळकटी आणण्यास आणि अनुभवातीत (अलौकिक) अथवा प्लेटो यांच्या तत्त्वज्ञानातील मूलतत्त्वे मागे (बाजूस) ठेवण्याचे सतत प्रयत्न केले.
थीओफ्रॅस्टस यांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी फारच थोडी जतन केली गेली आहेत. त्यांच्या सुप्रसिद्ध कॅरॅक्टर्स या पुस्तकात अनेक थरांतील लोकांची व्यक्तिचित्रे आहेत ती ॲरिस्टॉटल यांच्या नैतिक व आलंकारिक हेतूने केलेल्या अभ्यासावर आधारलेली होती. या ग्रंथाचे आर्. जेब (१८७०) यांनी प्रस्तावना व टीकाटिप्पण्यांसह केलेले भाषांतर प्रसिद्ध आहे. पुढे याचेच पुनर्मुद्रण (१९०९) जे. ई. सँड्झ यांनी केले तसेच जे. एम्. एडमंड्झ यांनी केलेले एक भाषांतर (१९४६) ‘लोब क्लासिकल लायब्ररी’ या ग्रंथमालेत उपलब्ध आहे. थीओफ्रॅस्टस यांचा डॉक्ट्रिन्स ऑफ द नॅचरल सायंटिस्ट्स हा ग्रंथ एच्. डील्स यांनी डॉक्सोग्राफी ग्रीसी (Doxographi Graeci) या नावाने संपादित केला आहे त्यावरून पुरातन तत्त्वज्ञानाच्या संपूर्ण इतिहासाचा मूळ पाया समजून येतो. त्यांचे ऑन द हिस्टरी ऑफ प्लँट्स अथवा एन्क्कायरी इन्टू प्लँट्स (Historia Plantarum) यावरील नऊ आणि ऑन द कॉजेस ऑफ प्लँट्स (De Causis Plantarum) यावरील सहा ग्रंथ उपलब्ध आहेत. मध्ययुगात त्या विषयातील हे ग्रंथ प्रमाणभूत मानले जात. एन्क्कायरी इन्टू प्लँट्स या ग्रंथात वनस्पतींचे आकारविज्ञान, नैसर्गिक इतिहास आणि चिकित्साविज्ञानातील त्यांचे काही उपयोग दिले आहेत. भिन्न वनस्पतींतील भेद, त्यांचे भाग, त्यांचा प्रसार, लागवड व काही व्यवहारोपयोगी माहिती दिलेली आहे. वृक्षांतील वार्षिक वलयांची निर्मिती आणि सूर्यफुलांसारख्या वनस्पतींच्या फुलोऱ्यातील लहान पुष्पके त्यांनी नमूद केली होती. कॉजेस ऑफ प्लँट्समध्ये वनस्पतींची वाढ, जीवन, लागवड, तापमान, रोग, आवर्तिता, रंग, स्वाद इ. विविध प्रकारची माहिती आली असली, तरी ती एकूण तत्त्वज्ञानविषयक असल्याने तिचे शास्त्रीय मूल्य कमी ठरले आहे. बोळ, धूप, डिंक हे झाडांतून काढण्याची क्रिया त्यांनी वर्णिली असून बीजाच्या अंकुरणाचा (रुजण्याचा) तपशीलही दिला आहे. बीजधारी वनस्पतींचे एकदलिकित व द्विदलिकित हे दोन विभाग प्रथम त्यांनीच विशद केले होते. प्रजोत्पतीच्या भिन्न पद्धती त्यांनी वर्णिल्या असल्या, तरी हलक्या दर्जाच्या वनस्पती स्वयंजननाने (आपोआप) उदयास येतात असा त्यांचा समज होता. ⇨खजुराचे परपरागण [⟶ परागण] त्यांनी वर्णिले होते. परिस्थितीच्या प्रत्यक्ष प्रभावाने वनस्पतींत फरक घडून येतात व ते पिढ्यान्पिढ्या चालू राहतात, असा त्याचा ग्रह असून हा समज पुढे अनेक शतके शास्त्रज्ञांत टिकून राहिला होता व अठराव्या शतकात जे. बी. लामार्क यांनी त्याचाच आधार घेऊन आपली ⇨ क्रमविकासाची उपपत्ती मांडली होती. वृक्षांच्या निवासस्थानातील (अधिवासातील) फरकांमुळे त्यांच्या वाढीवर होणारा परिणाम त्यांनी नमूद केला होता. प्राणिकोटीतील मनुष्याचा दर्जा वनस्पतिकोटीतील वृक्षांना लागू करण्यासारखा उच्च आहे, असे त्यांचे मत होते.
ए. एफ्. हॉर्ट यांनी हिस्टरी ऑफ प्लँट्सचा केलेला अनुवाद लोब क्लासिकल लायब्ररीत उपलब्ध आहे. नीतिशास्त्रावरही थीओफ्रॅस्टस यांचा एक ग्रंथ आहे. जे. जी. श्नाइडर यांनी पाच खंडांत (१८१८–२१) व एफ्. व्हिमर यांनी तीन खंडांत (१८५४–६२) थीओफ्रॅस्टस यांच्या ग्रंथांचे संपादन केले होते. थीओफ्रॅस्टस अथेन्स येथे मृत्यू पावले.
संदर्भ: 1. Gardner, E. J. History of Biology, Minneapolis, Minn, 1965.
2. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.
चिन्मुळगुंद, वासंती रा. परांडेकर, शं. आ.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..