थिंफू : १९६२ पासून भूतानच्या राजधानीचे ठिकाण. लोकसंख्या ६०,००० (१९७० अंदाज). हे थिंफू नदीच्या दोन्ही तीरांवर स. स. पासून २,६२५ मी. उंचीवर वसले आहे. आसाम आणि प. बंगाल राज्यांतील हिमालय पर्वताच्या पायथ्याजवळ वसलेल्या शहरांशी हे हमरस्त्याद्वारे जोडले असून मोटारीने प्रवाशांची व मालाची वाहतूक चालते. या रस्त्यावरच फुंटशोलिंग आणि चेम्बरलिंग ही दोन जकात नाकी आहेत. फुंटशोलिंग हे भूतानचे प्रवेशद्वारच आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत हवा अतिशय थंड असते आणि हिमवृष्टीही होते. या वेळी हे शहर स्वित्झर्लंडमधील निसर्गरम्य शहरांसारखे वाटते. धुक्यामुळे दृश्यता कमी असते व मोटारीने प्रवास करणे अवघड असते. मार्च ते मेपर्यंत मात्र हवा कोरडी, साधारण थंड व आल्हाददायक असते. शहरात पर्यटकांसाठी आधुनिक उपाहारगृहे व निवासस्थाने असून राजवाडा व सचिवालय प्रेक्षणीय आहेत. या भागास ‘ताशी चो द्झांग’ म्हणतात. येथे भूतानच्या परंपरागत शिल्पकलेचे अनेक कल्पक नमुने पहावयास मिळतात. या शहराच्या नैर्ऋत्य भागात डोंगरांच्या पायथ्याशी बांधलेले मातीथांग अतिथिगृह प्रेक्षणीय आहे. पूर्वी हे भूतानच्या राजाच्या निवासस्थानाचा एक भाग होते. येथील ‘इंडिया हाउस’ या आधुनिक वास्तूमध्ये भारत सरकारची कार्यालये आहेत.
दाते, सु. प्र.