थन्बर्जिया : फुलझाडांपैकी ⇨ ॲकँथेसी अथवा वासक कुलातील एका वंशाचे नाव. लिंडौ यांनी याचा समावेश थन्बर्जिऑइडी या उपकुलात केला आहे, तर जे. सी. विलिस यांनी थन्बर्जिएसी ह्या स्वतंत्र कुलात केला आहे. या वंशात सु. २०० जाती असून भारतात दहा आढळतात. त्या बहुतेक सर्व बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) वेली आहेत. स्वीडनमधील अप्साला विद्यापीठातील वनस्पतिविज्ञ कार्ल पेटर थन्बर्ग (टूनबॅऱ्य) यांच्या नावावरून ह्या वंशाचे लॅटिन नाव देण्यात आले आहे. या वेलीवर [⟶ महालता] साधी पाने समोरासमोर येतात. ती आकाराने विविध आणि बहुधा जाडसर असतात. फुले द्विलिंगी, निळी, पिवळी, जांभळी अथवा पांढरी असून ती एकेकटी किंवा जोडीने अथवा मंजरीत पानांच्या बगलेत येतात. संवर्त वलयाकृती, खंडित व दंतुर असून दोन छदकांनी वेढलेला असतो कधी त्याचबरोबर पुष्पमुकुटही त्याच छदकांनी अंशतः आच्छादलेला असतो. पुष्पमुकुट परिवलित, वाकडा, तिरपा, तुतारीसारखा किंवा घंटेसारखा वर पसरट व खाली फुगीर किंवा नळीसारखा असतो. केसरदले चार, द्व्योन्नत (दोन अधिक लांब) तळाशी पुष्पमुकुटास चिकटलेली असतात दोन किंजदलांपासून बनलेला ऊर्ध्वस्थ किंजपुट मांसल बिंबावर असून त्यात दोन कप्पे आणि प्रत्येकात बहुधा दोन बीजके असतात [⟶ फूल]. फळात (बोंडात) गोलसर बिया असतात. इतर सामान्य लक्षणे ॲकँथेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे. कित्येक जाती व संकरज प्रकार बागेतून शोभेकरिता लावले जातात. बिया, कलमे, अधश्चर (मुनवे) इत्यादींपासून नवीन लागवड करतात. खोडात असंगत संरचना आढळते [⟶ शरीर, वनस्पतींचे].
थन्बर्जिया ग्रँडिफ्लोरा : (इं. हेवन्ली ब्ल्यू). ह्या वेलीची फुले फेब्रुवारी ते सप्टेंबरात एकाकी वा लांबट मंजरीवर येतात ती बाहेरून पांढरट व आत निळसर, मधे पिवळट व तळाशी पांढरट असतात. मलेशियात पोटातील तक्रारीवर या वेलीच्या पानांचा काढा घेतात पानांचे पोटीसही उपयुक्त असते.
पहा : चिमणी–२.
पाटील, शा. दा. परांडेकर, शं. आ.
थन्बर्जिया ॲलाटा : (इं. ब्लॅक आइड सुसान). या जातीची फुले पिवळट, फिकट नारिंगी किंवा पांढरट असून तळाशी गर्द पिंगट ठिपका असतो. मलेशियात या वेलीच्या पानांचे पोटीस डोकेदुखीवर लावतात. हिला सप्टेंबर–नोव्हेंबर फुले येतात.
थन्बर्जिया मायसोरेन्सिस: या मोठ्या वेलीला पिंगट, वर पिवळी, भगवी किंवा गर्द नारिंगी आणि आत किरमिजी ठिपके असलेली फुले मंजरीवर साधारणतः वर्षभर येतात.
थन्बर्जिया ग्रँडिफ्लोरा : (इं. हेवन्ली ब्ल्यू). ह्या वेलीची फुले फेब्रुवारी ते सप्टेंबरात एकाकी वा लांबट मंजरीवर येतात ती बाहेरून पांढरट व आत निळसर, मधे पिवळट व तळाशी पांढरट असतात. मलेशियात पोटातील तक्रारीवर या वेलीच्या पानांचा काढा घेतात पानांचे पोटीसही उपयुक्त असते.
थन्बर्जिया लेविस : ही जाती भारतात सर्वत्र आढळते पाने विविध व फुले पांढरी असून त्यांना वास नसतो. (चित्रपत्र ४८).
पहा: चिमणी – २.
पाटील, शा. दा. परांडेकर, शं. आ.
“