सीतारंजन : ( इं. फिडल वुड ट्री लॅ. सिथरेझायलम सबसेरॅटम कुल-व्हर्बिनेसी ). या लहान शोभेच्या वृक्षाचे मूलस्थान वेस्ट इंडीज बेटे आहे. हा वृक्ष बागेत व लहान रस्त्याकडेस सामान्यपणे लावला जातो. याची पाने दीर्घवृत्ताकृती, दंतुर, साधारण जाड, चिवट व गुळगुळीत असून पाते दोन्हीकडे निमुळते असते. पांढऱ्या, सुवासिक व अनेक लहान फुलांच्या लोंबत्या कक्षस्थ मंजिऱ्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत येतात. याचे लाकूड उत्तम असते. नवीन लागवड कलमांनी करतात. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨व्हर्बिनेसी ( साग ) कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. ‘ बॉ फिदेल ’ या फ्रेंच शब्दावरुन इंग्र जी ‘ फिडल ट्री ’ हे अपभ्रष्ट रुप तयार झाले आहे.

चौगुले, द. सी.