त्वचा : वनस्पती व प्राणी यांच्यातील त्वचेचे स्वरूप, संरचना व कार्ये ही भिन्न असतात. प्रस्तुत नोंदीत फक्त प्राण्यांच्या त्वचेचे वर्णन केलेले असून मानवी त्वचेच्या व पशूंच्या त्वचेच्या रोगांची माहिती दिलेली आहे. वनस्पतींच्या त्वचेचे विविध स्तर व भाग यांसंबंधीची माहिती अपित्वचा, अभित्वचा, उपत्वचा, त्वक्षा, परित्वचा, मध्यत्वचा व वल्क या नोंदींत दिलेली असून यांशिवाय ‘शारीर, वनस्पतींचे’ ही नोंदही पहावी.
अपृष्ठवंशी प्राण्यांची त्वचा : (अपृष्ठवंशी म्हणजे पाठीचा कणा नसलेले प्राणी). पुष्कळ आदिजीवांमध्ये (प्रोटोझोआंमध्ये) शरीरावर (एककोशिक म्हणजे एकाच पेशीने बनलेल्या शरीरावर) फक्त नाजूक कोशिका–कलेचे (कोशिकेच्या बाह्यस्तराचे) वा जीवद्रव्यकलेचे (जिवंत कोशिकाद्रव्याच्या स्तराचे) बाह्य आवरण असते. पॅरामिशियमासारख्या इतर आदिजीवांत संरक्षक तनुत्वक (पेलिकल) उत्पन्न होते (आ. १). कित्येक जीवांत तनुत्वकावर कंगोरे अथवा सर्पिल रेखांकन असते (उदा., युग्लीना). बहुतेक बहुकोशिक अपृष्ठवंशी प्राण्यांच्या शरीरावर ऊतकाचे (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहाचे) एक प्रकारचे आवरण असते, त्याला बाह्यत्वचा म्हणतात. सिलेंटेरेट प्राणी, चापट कृमी आणि पिकळी यांच्यासारख्या पाण्यात अथवा जमिनीवरील दमट परिसरात राहणाऱ्या पुष्कळ प्राण्यांच्या शरीरावरील बाह्यत्वचा कोशिकांच्या एकाच थराची बनलेली असते. पुष्कळ कृमींच्या शरीरावरील बाह्यत्वचेपासून स्रावाने आणखी एक अकोशिक बाह्यावरण–उपत्वचा किंवा उपचर्म–उत्पन्न होते. ओबेलियासारख्या स्थानबद्ध सीलेंटेरेट प्राण्यांमध्ये बाह्यत्वचेवर एक संरक्षक कायटिनाभ (कायटीन या कठीण पदार्थाशी सदृश असलेले) आवरण असते. हायड्रामध्ये फक्त बाह्यत्वचा असते.
मॉलस्कांची बाह्यत्वचा नाजूक व मृदू असून तिच्यात श्लेष्म ग्रंथी असतात. त्यांच्यापैकी काही शंखांचे अथवा कवचाचे कॅल्शियम कार्बोनेट उत्पन्न करतात. सेफॅलोपोडांची त्वचा जास्त जटिल असून ती उपत्वचा, साधी बाह्यत्वचा, संयोजी (जोडणाऱ्या) ऊतकाचा एक स्तर, रंगदीप्त (निरनिराळ्या दिशांनी पाहिले असता निरनिराळे रंग दिसणाऱ्या) कोशिकांचा एक स्तर आणि अखेरचा संयोजी ऊतकाचा एक जाड स्तर यांची बनलेली असते.
संधिपादांमध्ये (आर्थ्रोपॉडांमध्ये) बाह्यत्वचा (अधस्त्वचा) कोशिकांच्या एकाच थराची असून तिच्या स्त्रावापासून कायटिनी बाह्यकंकाल (बाह्य सांगाडा) तयार होतो. भूचर संधिपाद प्राण्यांच्या शरीरावरील आच्छादन उपत्वचा आणि सामान्यतः मेणाचा एक पातळ थर यांचे बनलेले असते. यामुळे ते शरीरातील द्रवांची घट होऊ देत नाही. ही व्यवस्था आणि हवेतील जीवनाकरिता आवश्यक अनुकूलने (ज्या प्रक्रियांनी एखादा प्राणी विशिष्ट परिस्थितीत राहण्यास योग्य होतो त्या प्रक्रिया) यांच्यामुळे कीटक, कोळी आणि त्यांचे नातेवाईक शुष्क परिसरात राहू शकतात. कीटक आणि इतर काही प्राणी यांची बाह्यत्वचा आपल्या स्त्रावाने संरक्षक बाह्यकंकाल अथवा कवच उत्पन्न करते.
माशांची बाह्यत्वचा पातळ असून तिच्यातील पुष्कळ ग्रंथींपासून श्लेष्मा उत्पन्न होऊन शरीराच्या बाह्य पृष्ठावर पसरतो. यामुळे रोगजंतूंपासून व इतर जीवांपासून शरीराचे रक्षण होते. शार्क (मुशी) व रे (पाकट) या माशांच्या शरीरावर एनॅमलाचा थर असलेले उघडे पट्टाभ शल्क (खवले) असतात आणि बहुतेक अस्थिमत्स्यांच्या (ज्यांचा सांगाडा हाडांचा बनलेला असतो अशा माशांच्या) शरीरावरील चर्मशल्कांच्या आवरणामुळे त्यांचे रक्षण होते. भूचर पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये (उभयचरांपासून म्हणजे जमिनीवर व पाण्यात राहाणाऱ्या प्राण्यांपासून सस्तन प्राण्यांपर्यंत) कोशिकांचे कित्येक स्तर असलेली स्तरित बाह्यत्वचा असते. अगदी बाहेरचा स्तर कठीण अथवा शृंगीभूत होतो. काही काळाने तो निघून जातो. बाह्यत्वचेच्या बुडापासून (रोहिस्तरापासून) नवीन स्तर उत्पन्न होऊन यात एकसारखी भर पडत गेल्यामुळे तो पुन्हा नवा होतो. उभयचरांची त्वचा ग्रंथिमय आणि ओलसर असते (उदा., बेडूक). त्यांच्या बाह्यत्वचेच्या अगदी बाहेरच्या स्तराचे शृंगीभवन होते (आ. ३). काही काळाने तो गळून पडतो व त्याची जागा दुसरा स्तर घेतो. सरीसृप (सरपटणारे प्राणी), पक्षी आणि सस्तन प्राणी यांमध्ये शुष्क परिसरात विशेष झीज न होऊ देण्याकरिता शृंगी भाग कोरडा व जास्त कणखर असतो यामुळे बाष्पीभवनाच्या योगाने येणाऱ्या आर्द्रतेच्या तुटीला आळा बसतो आणि अशा प्रकारे शरीरातील द्रवांचे रक्षण होते. सरीसृपांच्या शरीरावरील बाह्यत्वचेपासून उत्पन्न झालेले शृंगी शल्क असतात. त्यांच्यामुळे शरीराला संरक्षण मिळते व शरीरातील पाणी बाहेर जाऊ शकत नाही. सरडे व साप यांच्या शृंगी बाह्यस्तराचे ठराविक काळाने निर्मोचन (कात टाकणे) होते. पक्ष्यांचे शरीर पिसांनी झाकलेले असते. ती बाह्यत्वचेपासून उत्पन्न झालेली असून कोरडी, निर्जीव आणि शृंगीभूत असतात. त्यांच्यामुळे शरीरातील उष्णतेचे निरोधन होते आणि शरीराचा आकार प्रवाहरेखित (उड्डाणावस्थेत हवेच्या प्रवाहाचा रोध कमीत कमी होईल असा) होतो. उड्डाणाकरिता उपयुक्त असणारी पंखांची आणि शेपटीची रूंद पृष्ठे पिसांच्या विशिष्ट व्यवस्थेमुळेच तयार होतात. बहुतेक सस्तन प्राण्यांची त्वचा केसांनी आच्छादिलेली असते. केस हा शृंगीभूत उत्पादांचा आणखी एक प्रकार आहे. यांचादेखील उष्णता निरोधनाकरिता उपयोग होतो. ठराविक मुदतीने पिसे व केस निर्मोचनाने गळून जाऊन त्यांच्या जागी नवीन उत्पन्न होतात आणि अशा तऱ्हेने नवीन आच्छादन निर्माण होते.
पक्षी आणि सस्तन प्राणी यांच्या शरीरावरील आच्छादन उष्णतासंरक्षक असल्यामुळे फक्त हेच प्राणी नियततापी असून त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित असते. बाकीचे सगळे प्राणी बेडकाप्रमाणे शीतरुधिर अथवा अनियततापी असून ते ज्या परिसरात राहतात. त्याच्या तापमानातील फेरबदलाप्रमाणे त्यांच्या शरीराचे तापमानही बदलते. सील, देवमासे आणि इतर जलीय सस्तन प्राण्यांच्या त्वचेखाली चरबीचे (ब्लबरचे) अतिशय जाड थर असतात आणि ते शरीराच्या उष्णतेत पाण्यामुळे होणारी घट रोधू शकतात.
कर्वे, ज. नी.
मानवी त्वचा
मानवी त्वचा तीन थरांची मिळून बनलेली असते. बाहेरून आत त्यांना अनुक्रमे (अ) बाह्यत्वचा, (आ) अंतस्त्वचा आणि (इ) अधस्त्वचा म्हणतात.
बाह्यत्वचा : ०·०७ मिमी. ते ०·१२ मिमी. जाडीचा हा थर रक्तवाहिन्याविरहित स्तरित उपकलेचा बनलेला असतो. तळहात व तळपाय या ठिकाणी तो बराच जाड म्हणजे ०·८ ते १·४ मिमी. एवढा असतो. ही जाडी या भागावर अधूनमधून पडणाऱ्या दाबामुळे उत्पन्न होत असावी परंतु बाह्यदाबाशिवाय इतरही कारणे असावीत कारण गर्भावस्थेतही या ठिकाणचा हा थर उत्तम वाढलेला असतो. बाह्यत्वचेची सूक्ष्मदर्शकीय रचना खालीलप्रमाणे असते.
शृंगस्तर : सर्वांत बाहेरचा परिसरातील हवेशी संलग्न असलेला हा थर केंद्रकरहित (कोशिकेतील विविध क्रियांवर नियंत्रण ठेवणारा मध्यवर्ती गोलसर पुंज म्हणजे केंद्रक नसलेल्या) चपट्या शृंगी कोशिकांच्या पुष्कळ स्तरांचा बनलेला असतो. या स्तरातील बहुतेक कोशिकांचा नाश होत असतो. या थरावर दाब पडून त्याची जाडी वाढत जाते. तळहात व तळपाय येथे हाच थर जाडीस कारणीभूत असतो. ओठावरील त्वचेत हाच थर अतिशय पातळ स्वरूपात असतो. या कोशिकांतील केराटीन या पदार्थात गंधक असते. त्वचेतील खोल भागी असलेल्या कोशिकांतील प्रथिनांपासून तो बनतो.
स्वच्छस्तर : शृंगस्तराखालील या थरातील कोशिकांमध्येही केंद्रके नसतात. त्यांच्या कोशिकापिंडात तेलासारख्या पदार्थाचे छोटे छोटे गोळे असतात. या पदार्थाला इलेडीन म्हणतात व तो बहुधा केराटिनाचा पूर्वगामी (ज्याच्यापासून शरीरात केराटीन तयार होते असा) पदार्थ असावा.
अंतस्त्वचा : बाह्यस्तराखालील या थराला मूलत्वचा किंवा मुख्य त्वचा असेही म्हणतात. हा थर मुख्यत्वेकरून कोलॅजेनाचे (त्वचेला आधार देणाऱ्या प्रमुख प्रथिनाचे) जुडगे आणि लवचिक तंतूंच्या जाळ्याचा बनलेला असतो. त्यामध्ये भरपूर रक्तवाहिन्या असतात. या थराची बाह्यस्तराकडची बाजू घट्ट विणीची असून तिला ‘आधारकला’ म्हणतात व तिलाच बाह्यस्तरातील कोशिका चिकटलेल्या असतात. आधारकलेच्या खाली केशवाहिन्यांचे जाळे पसरलेले असते. याच थरामध्ये ‘त्वचांकुर’ पसरलेले असतात आणि ते रक्तवाहिन्या, संवेदी तंत्रिका तंतूंची टोके व लसीका वाहिन्या (ऊतकांकडून रक्तात जाणारा व रक्तद्रवाशी साम्य असलेला किंचित पिवळसर द्रव पदार्थ वाहून नेणाऱ्या नलिका) मिळून बनलेले असतात. वर वर्णिलेल्या जाळ्यामध्ये त्वक्–स्नेह ग्रंथी (एक प्रकारचा स्निग्ध पदार्थ स्रवणाऱ्या ग्रंथी), स्वेद ग्रंथी (घाम स्रवणाऱ्या ग्रंथी), केशपुटक आणि रोमहर्षक स्नायू (रोमांच म्हणजे सूक्ष्म कंपने उत्पन्न करून त्वचेवरील केस ताठ करणारे स्नायू) विखुरलेले असतात व त्यांच्याभोवती लवचिक तंतूंचा विळखा असतो. केशवाहिन्या आधारकलेतून वर जात नाहीत, परंतु तंत्रिका तंतू तीमधून बाह्यत्वचेत शिरतात व तेथे त्यांचे जाळे बनलेले असते. संवेदी तंत्रिकांची टोके विशिष्ट प्रकारची रचना असलेली असून त्यांना ‘अन्तांगे’ म्हणतात. ही अन्तांगे निरनिराळ्या प्रकारच्या संवेदना ग्राहकांचे कार्य करतात. उदा., पाचीनी (एफ्. पाचीनी या इटालियन शारीरविज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणारे) अन्तांग फक्त खोलवर जाणाऱ्या दाबाची संवेदना ग्रहण करते, तर माईसनर (जी. माईसनर या जर्मन शरीरक्रियावैज्ञानिकांच्या नावाने ओळखण्यात येणारे) अन्तांग स्पर्श संवेदनांचे ग्रहण करते.
अधस्त्वचा : अंतस्त्वचेच्या खाली व शरीराच्या पृष्ठभागावर पसरलेल्या वसा–ऊतक थराच्या वर असलेल्या संक्रमणशील थराला अधस्त्वचा म्हणतात. हा थर वसा–कोशिका आणि पिवळ्या संयोजी ऊतकाचा बनलेला असतो. स्वेद ग्रंथींची काही वेटोळी आणि काही केशमूले याच थरात असतात. त्वचेत द्यावयाची अंतःक्षेपणे (इंजेक्शने) देताना सुईचे टोक या थरात असताना औषध सोडतात म्हणून अशा प्रकारच्या अंतःक्षेपणांना अधस्त्वचीय (हायपोडर्मिक) अंतःक्षेपणे म्हणतात.
केस व नखे ही त्वचेची उपांगे असून त्यांवर मराठी विश्वकोशात स्वतंत्र नोंदी आहेत. यांशिवाय त्वक्–स्नेह ग्रंथी व स्वेद ग्रंथी [⟶ घर्म ग्रंथी] यांशिवाय स्वतंत्र नोंदी आहेत.
भ्रूणविज्ञान : शरीराचे विशिष्ट भाग मिळून निरनिराळी तंत्रे (संस्था) बनलेली आहेत. उदा., मूत्रपिंड, मूत्रवाहिन्या, मूत्राशय ही उत्सर्जन तंत्राचे भाग आहेत तर हृदय, रोहिण्या, नीला हे रूधिराभिसरण तंत्राचे भाग आहेत. त्वचेचे सर्व थर मिळून ते एक स्वतंत्र तंत्रच बनले आहे, असे म्हणावयास हरकत नाही. हे थर एकत्र मिळून कार्य करीत असले, तरी त्यांची उत्पत्ती मात्र भ्रूणाच्या दोन थरांपासून होते : बाह्यत्वचा बाह्यस्तरापासून आणि अंतस्त्वचा मध्यस्तरापासून.
भ्रूणाच्या सुरुवातीस बाह्यस्तर घनीय कोशिका एकीपुढे एक रचून बनलेला असतो. गर्भावस्थेच्या पाचव्या आठवड्याच्या सुमारास तो द्विस्तरीय बनतो. यांपैकी पृष्ठभागाकडेअसलेल्याकोशिका स्तराला परित्वचा म्हणतात. तिसऱ्या महिन्यात तीन थर दिसू लागतात व त्यांना बाहेरून आत (१) परित्वचा, (२) मध्यस्तर आणि (३) आधार स्तर म्हणतात. आधार स्तरातील कोशिका झपाट्याने वाढतात व त्यांच्यापैकी जुन्या कोशिका सतत वर परित्वचेकडे ढकलल्या जातात. अशा प्रकारे पाचव्या महिन्यात मालपीगी स्तर तयार होतो. मालपीगी स्तरावरील कोशिकांमध्ये केराटोहायालीन तयार होते व त्यापासून कणमय स्तर बनतो. खालच्या भागात तयार होणाऱ्या कोशिका जुन्यांना सतत वर ढकलत असतात व त्यातील अगदी वरच्यांपासून शृंगस्तर बनतो. मध्यस्तर कोशिकांपासून जननस्तर बनतो. चौथ्या महिन्याच्या शेवटास गर्भाच्या शरीरावरील सर्व परित्वचा (वसायुक्त कोशिकांचा थर) झडून पडते. गर्भाच्या वा झडून पडणाऱ्या आच्छादनाला ‘भ्रूणस्नेह’ म्हणतात. जननस्तर ज्या कोशिकांपासून बनतो त्यांपासून खाली भ्रूणमध्यस्तराकडे वाढणाऱ्या कोशिकांपासून त्वक्–स्नेह ग्रंथी व स्वेद ग्रंथी तयार होतात. जन्मानंतर जननस्तरातील कोशिकांमध्ये रंजकद्रव्य कृष्णरंजकजनक कोशिकांकडून उतरवले जाते.
भ्रूणमध्यस्तरापासून अंतस्त्वचा तयार होते. प्रथम अंतस्त्वचा फक्त दाटीदाटीने रचलेल्या तर्कूच्या आकाराच्या कोशिकांचीच बनलेली असते. त्यांपासून नंतर कोलॅजेन, लवचिक तंतू वगैरे तयार होतात. लवचिक तंतू गर्भावस्थेच्या सहाव्या महिन्यात तयार होतात. शेवटी शेवटी अंतस्त्वचा आणि तीखालील ऊतक यांमधील फरक स्पष्ट होऊ लागतो. या ऊतकातील अधस्त्वचीय वसा गर्भाच्या तिसऱ्या महिन्यापासून तयार होत असली, तरी तिचे प्रमाण गर्भकालाच्या शेवटी शेवटी वाढते. गर्भाच्या तिसऱ्या महिन्यात बोटांच्या टोकावर नखे दिसू लागतात व बाह्यत्वचेचे भाग असतात. भुवया, वरचा ओठ आणि हनुवटी या ठिकाणी गर्भावस्थेच्या दुसऱ्या महिन्याच्या शेवटास केस दिसू लागतात. चौथ्या महिन्याच्या सुमारास सर्व अंगभर सूक्ष्म मऊ केस येतात, त्यांना ‘गर्भरोम’ म्हणतात [⟶ केस].
कार्य : त्वचेची विविध कार्ये खालीलप्रमाणे आहेत.
स्रवण आणि उत्सर्जन : त्वचेत निरनिराळ्या ग्रंथी असतात आणि त्यांचा स्त्राव पृष्ठभागावर येत असतो. यांपैकी स्वेद ग्रंथी व त्वक्–स्नेह ग्रंथी यांचा उल्लेख वर आलाच आहे. स्वेद ग्रंथी दोन प्रकारच्या असून एका प्रकारातील स्राव पाण्यासारखा पातळ लवणयुक्त असतो, तर दुसऱ्यातील स्राव काहीसा घट्ट व गंधयुक्त असतो. त्यांना अनुक्रमे स्वेदोत्सर्गी (इक्राइन) ग्रंथी आणि कोशिकांशस्रावी वा गंधोत्सर्गी (अपोक्राइन) ग्रंथी म्हणतात. कनिष्ठ वर्गीय प्राण्यांमध्ये गंधोत्सर्गी ग्रंथींचा लैंगिक आकर्षणाकरिता उपयोग होत असावा. मानवामध्ये त्यांचा स्त्रियांच्या बाबतीत ऋतुचक्राशी संबंध असतो. या ग्रंथींच्या कोशिकांमध्ये ऋतुचक्रपूर्व अतिवृद्धी आणि मासिक पाळीच्या चार दिवसांत आकारमान कमी होऊन पूर्ववत होणे या क्रिया होतात. घामामध्ये ९८·८% पाणी व १·२% घन पदार्थ असतात. घामामधून सोडियम क्लोराइड, सोडियम फॉस्फेट, सोडियम बायकार्बोनेट, केराटीन व अल्प प्रमाणात यूरिया हे पदार्थ उत्सर्जित होतात. स्वेद ग्रंथीच्या स्रावणावर परिसरातील तापमानामुळे परिणाम होतो. तापमान वाढले म्हणजे घाम वाढतो. यालाच ‘उष्णताजन्य घाम’ म्हणतात. भीती, मानसिक ताण, चिंता इत्यादींमुळेही घाम वाढतो. याला ‘थंड घाम’ म्हणतात. या घामाचे स्रावण प्रस्तिमष्काच्या (मोठ्या मेंदूच्या) नियंत्रणाखाली असते. व्यायामामुळे येणारा घाम दोन्ही मिळून म्हणजे उष्णताजन्य आणि मानसिक ताणामुळेही येतो.
शरीर तापमानाचे नियंत्रण : मानव हा नियततापी प्राणी असल्यामुळे परिसरातील तापमानातील बदल त्याच्या शरीरांतर्गत तापमानात फारसा बदल करू शकत नाही. ते एकसारखे राहण्याकरिता उष्णताउत्पादन आणि उष्णतानाश यांत समतोल असणे आवश्यक असते. उष्णतानाशामध्ये त्वचेचा फार मोठा वाटा असतो. जवळजवळ ७०% उष्णतानाश त्वचेमुळे होतो. त्वचेमुळे होणाऱ्या उष्णतानाशाचे नियंत्रण त्वचेतील रक्तवाहिन्यांचे आकुंचन व प्रसरण, घाम येणे आणि त्वचेतील अरेखित (अनैच्छिक) स्नायूंची प्रतिक्रिया यांमुळे होते. थंडीत अंगावर काटा उभा राहून या स्नायूंच्या आकुंचनामुळे उष्णतानाश तात्पुरता थोपवला जातो.
याशिवाय त्वचेमध्ये उष्णताग्राही आणि शीतग्राही अशी संवेदी अन्तांगे असतात. या संवेदी ग्राहकांपासून येणारे संदेश थॅलॅमसातील (मेंदूच्या तिसऱ्या विवराच्या बाजूच्या भित्तीच्या वरच्या भागातील करड्या रंगाच्या मोठ्या भागातील) उष्णता नियंत्रक केंद्रात पोहोचतात. या संदेशास अनुरूप अशा त्वचेतील रक्तवाहिन्यांच्या संकोचक किंवा प्रसारक क्रिया या केंद्राद्वारे वाहिनी प्रेरक केंद्रामार्फत घडवून आणल्या जातात. स्वायत्त तंत्रिकांद्वारे थॅलॅमसाचे घामाच्या उत्पादनावरही नियंत्रण असते [⟶ तापमान, प्राणिशरीराचे].
मानवी त्वचारोग
त्वचा हे मानवी शरीरातील तंत्रांमध्ये सर्वांत मोठे तंत्र आहे. शरीराच्या एकूण वजनापैकी १६% वजन त्वचेचे असते. शरीराचा एकूण सु. १९,००० चौ. सेंमी. एवढा पृष्ठभाग त्वचेने व्यापलेला असतो. तिचे रोग प्रत्यक्ष तिच्याच विकृतींमुळे किंवा इतर तंत्रांच्या विकृतींमुळे तिच्यावर होणाऱ्या अप्रत्यक्ष परिणामांचे निदर्शक असू शकतात. तसेच ते एखाद्या स्थानापुरतेच मर्यादित किंवा सार्वदेहिक स्वरूपाचेही असतात. त्वचारोगांचा अभ्यास वैद्यकाच्या ज्या शाखेत केला जातो तीस त्वचारोगविज्ञान म्हणतात. मानवी रोगांमध्ये त्वचारोगाचे प्रमाण बरेच असते. त्वचारोगाचे काही परिणाम व लक्षणे पुष्कळ दुःख भोगावयास लावणारी असतात. उदा., असह्य खाज किंवा चेहऱ्याची विद्रुपता. त्वचारोगांची कारणेही पुष्कळ आहेत. त्वचारोगवैज्ञानिक त्वचारोगांचे वर्गीकरण निरनिराळ्या पद्धतींनी करतात. काही शास्त्रज्ञ त्वचेच्या रचनेतील थरांप्रमाणे, काही संप्राप्तिनुरूप (रोगांच्या कारणानुसार), तर आणखी काहीजण लक्षणानुरूप वर्गीकरण करतात. काही त्वचारोगांची कारणे अजूनही अज्ञात आहेत, ही लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट आहे. आ. ६ मध्ये त्वचारोगांच्या कारणांचा थोडक्यात आढावा दिला आहे.
त्वचेची रचना, शरीरक्रियाविज्ञान, जीवरसायनशास्त्र आणि जैव कार्य यांविषयीच्या माहितीत विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रगती झाली आहे. या माहितीच्या आधारे त्वचारोगांचे वर्गीकरण विकृतिवैज्ञानिक व जैव दृष्टिकोनातून करता येणे शक्य झाले आहे. शरीरातील इतर ऊतकांप्रमाणेच त्वचेतही विकृतिजन्य बदल घडून येतात. पुढील वर्गीकरण याच दृष्टिकोनावर आधारित आहे: (१) जन्मजात विकृती, (२) आघातजन्य विकृती, (३) शोथजन्य विकृती, (४) चयापचयात्मक विकृती, (५) अर्बुदे (कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या व शरीरक्रियेस निरुपयोगी असणाऱ्या गाठी), (६) अपकर्षयुक्त (ऱ्हासयुक्त)विकृती.
जन्मजात विकृती :(अ) मत्स्य-चर्मरोग : बाह्यत्वचेतील केराटीन उत्पादन दोष आणि त्वक्–स्नेह ग्रंथींचा अभाव यांमुळे त्वचेवर माशांच्या बाह्यांगाप्रमाणे लहानमोठे खवले दिसतात. ही विकृती आनुवंशिक असून तिचे कारण अजून अज्ञात आहे.
(इ) एपिडर्मोलायसीस बुलोसा : या जन्मजात विकृतीमध्ये बाह्यत्वचा व अंतस्त्वचा एकमेकींस चिकटतात त्या ठिकाणी दोष असतो. त्यामुळे लहान सहान आघातामुळेही हे दोन थर अलग होऊन त्यांच्यामधे ऊतक–द्रव्य साचून फोड येतात. कॉर्टिकोस्टेरॉइडे व अ आणि क जीवनसत्त्वे देतात. अर्भकावस्थेतच उद्भवणारा हा आनुवंशिक रोग वयाची तिशी उलटल्यानंतर सहसा उद्भवत नाही.
(ई)वर्णकित त्वचेचा खरखरीतपणा : (झीरोडर्मा पिगमेंटोसम). प्रकाशातील काही अदृश्य किरणांच्या बाबतीतील त्वचेची संवेदनक्षमता वाढल्यामुळे हा रोग उद्भवतो. हा क्वचित आढळणारा पण मारक रोग आहे. प्रकाश असह्यता (डोळ्यांना नेहमीचा प्रकाश सहन न होणे) हे प्रथम लक्षण आढळते. कालांतराने त्वचेवर लहान लहान गुठळ्या दिसू लागतात. त्वचेतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांचा विस्फार होऊन जागजागी लाली येते. याला वाहिकास्फीती म्हणतात. गुठळ्यांमध्ये कालांतराने कर्करोगास प्रारंभ होतो म्हणून या रोगाचा पूर्वगामी कर्करोगात समावेश करतात.
शोथजन्य विकृती : पुष्कळ त्वचारोग तीव्र किंवा चिरकारी (दीर्घकालीन) शोथामुळे उद्भवतात. संक्रामककारके, भौतिक आणि रासायनिक कारणे वप्रतिरक्षात्मक (रोगालाप्रतिकारकरण्याच्याक्षमतेतील) बदलयांमुळेत्वचाशोथउद्भवतात. व्हायरस, रिकेट् सिया (सूक्ष्मजीव), सूक्ष्मजंतू, कवके, कृमी, संधिपाद प्राणी किंबहुना प्रत्येक प्रकाराचा जैवकारक त्वचा संक्रामणास कारणीभूत होऊ शकतो. आधुनिक प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे आणि रसायनचिकित्सात्मक औषधे यांमुळेयाप्रकाराच्या त्वचाशोथास बराच आळा बसला आहे परंतु आफ्रिका व आशिया खंडांतील प्रगतिशील राष्ट्रांमध्ये आढळणाऱ्या त्वचारोगांपैकी ६०% रोग या प्रकारात मोडतात. याउलट प्रगत व औद्योगिकीकरण झालेल्या राष्ट्रांतून दुसऱ्या म्हणजे भौतिक आणि रासायनिककारणांमुळेउद्भवणाऱ्या शोथांचे प्रमाण अधिक आढळते. या त्वचा विकृतींना इसब किंवा त्वचाशोथ म्हणतात. या शोथांना इसब म्हणावयाचे किंवा नुसते त्वचाशोथ म्हणावयाचे याविषयी शास्त्रज्ञांमध्ये अजून एकमत झालेले नाही. बहुतेकांच्या मते दोन्ही शब्द एकाच अर्थी वापरावेत असे आहे. या विकृतीमध्ये बाह्यत्वचा आणि अंतस्त्वचेचा वरचा थर यांवर परिणाम होतात. ज्या प्रकारांत ही विकृती स्पर्शजन्य असते, त्याला ‘स्पर्शजन्य त्वचाशोथ’ म्हणतात. औषधे, सौंदर्यप्रसाधने, विशिष्ट कपडे, रबरी व प्लॅस्टिकच्या वस्तू इ. अनेक घरगुती व औद्योगिक वापरातील वस्तूंच्या संस्पर्शामुळे ही विकृती उद्भवते.
प्रतिरक्षा विज्ञानातील आधुनिक प्रगतीमुळे पूर्वी अज्ञात कारणांमुळे उद्भवणाऱ्या त्वचाशोथाविषयी अधिक माहिती उपलब्ध झाली आहे. त्यांचा प्रतिरक्षात्मक प्रतिक्रियांशी जवळचा संबंध असल्याचे ज्ञात झाले आहे. ⇨ आरक्त चर्मक्षय, जलपीटिका (त्वचेवर जागजागी द्रवयुक्त शिथिल फोड येणारा रोग), त्वचा–स्नायुशोथ (त्वचा, अधस्त्वचीय ऊतक व स्नायू यांची दाहयुक्त सूज), वाहिकाशोथ (त्वचेतील रक्तवाहिन्यांचा शोथ) या रोगांचा प्रतिरक्षात्मक उपायांशी संबंध असावा. पूर्वी हे रोग अज्ञात कारणांमुळे उद्भवतात अशीच समजूत होती.
अंगावर पित्त उठणे आणि पुरळ यांचा अधिहर्षतेशी (ॲदर्जीशी) घनिष्ठ संबंध आहेच. रक्तातील इम्युनोग्लोब्युलीन या प्रतिपिंडामुळे (सूक्ष्मजंतू, त्यांची विषे वा इतर बाह्य पदार्थ शरीरात आल्यामुळे त्यांना प्रतिकार करण्याकरिता निर्माण होणाऱ्या पदार्थामुळे) उत्पन्न झालेली ती प्रतिक्रिया असते. अधिहर्षतेमुळे होणाऱ्या स्पर्शजन्य त्वचाशोथामध्ये रक्तातील लसीका कोशिका भाग घेत असाव्यात. गाठाळ त्वक्–रक्तिमा (त्वचेवर लहान लहान वेदनायुक्त गाठी येऊन ती लाल होणारा, बहुधा दोन्ही पायांच्या पुढच्या भागावर दिसणारा रोग), बहुरूपी त्वक्–रक्तिमा (पीटिका, रंजिका, पुटिका इ. अवस्था एकाच वेळी दिसणारा व त्वचा लाल असणारा रोग), औषधिजन्य पुरळ, गोवर व लोहितांग ज्वर (स्कार्लेट फीव्हर) यांसारख्या संक्रामक ज्वरांतील त्वचेवर होणारा उत्स्फोट, क्षय, उपदंश आणि गजकर्ण यांसारख्या सार्वदेहिक रोगांतील त्वचेवर दिसणारे दुष्परिणाम या सर्वांचा संबंध प्रतिरक्षात्मक प्रतिक्रियेशी असावा.
चयापचयात्मक विकृती : शरीरातील चयापचयात्मक क्रियांमध्ये काही अंतस्त्यांच्या विकृतींमुळे बिघाड उत्पन्न होतो. यामुळे जे रोग उत्पन्न होतात त्यांचे विशिष्ट व निदानोपयोगी परिणाम त्वचेवर पुष्कळ वेळा दिसून येतात. प्रत्यक्ष त्वचेतील कोशिका चयापचयजन्य पदार्थांचे अती उत्पादन किंवा अपसामान्य उत्पादन करून त्वचा विकृतीस कारणीभूत होतात. लिपिडे, श्लेचष्मरस (श्लेष्म ग्रंथींचा स्राव), पिष्टाम (काँगो रेड या रंजकद्रव्याचे विशेष आकर्षण असणारे एक प्रकारचे प्रथिन) इत्यादींचा या पदार्थात समावेश होतो. प्रथिनन्यूनतेमुळे ⇨ क्वाशिओरकोर हा रोग होतो आणि त्यात त्वचेवर आणि केसावर निरनिराळे दुष्परिणाम होतात. अ जीवनसत्त्वाच्या न्यूनतेमुळे त्वक्–रुक्षता, ब१२ जीवनसत्त्वाच्या न्यूनतेमुळे ओष्ठ विदारण व जीभ येणे आणि क जीवनसत्त्वाच्या न्यूनतेमुळे त्वचेतील रक्तस्राव हे विकार होतात.
अर्बुदे : त्वचारचनेत भाग घेणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या कोशिकेपासून साधी अथवा मारक अर्बुदे उद्भवू शकतात [⟶ अर्बुदविज्ञान]. त्वचेतील साध्या अर्बुदांचे प्रमाण जास्त असते. ती ऊतकवाढीमुळे होतात आणि ती हानिरहित व बहुधा लक्षणविरहित असतात. त्यांचे मारक अर्बुदात सहसा रूपांतर होत नाही. वसार्बुद, तंत्वार्बुद, चर्मसूत्रण अर्बुद, अरेखित स्नायु–अर्बुद, तंत्रिकार्बुद, तीळ किंवा मस, कुरूप व घट्टे, वाहिकागुच्छार्बुद (सूक्ष्म रोहिण्या व नीला एकमेकींस मिळतात त्या जागी होणारे अर्बुद), द्रवार्बुद इत्यादींचा समावेश साध्या त्वचा अर्बुदांत होतो. काहींमध्ये वेदना उदा., तंत्रिका तंत्वार्बुद, तर काहींमध्ये खाज उदा., चर्मसूत्रण अर्बुद ही लक्षणे आढळतात. या अर्बुदांवर सहसा इलाज करावा लागत नाही.
त्वचा ही शरीरावर पसरलेली असल्यामुळे तीवर उद्भवणारी मारक अर्बुदे इतर शरीर भागांतील अर्बुदांपेक्षा लवकर लक्षात येण्याची शक्यता असते. त्वचेतील कोणताही गोळा, गाठ, लवकर बरा न होणारा किंवा जादा त्वचानाश करणारा व्रण इ. लक्षणे आढळल्यास त्वचारोगतज्ञांचा ताबडतोब सल्ला घेणे हितावह असते. मारक अर्बुदांमध्ये (अ) कर्करोग व (आ) मांसकर्क यांचा समावेश होतो.
अपकर्षयुक्त विकृती : वाढत्या वयाबरोबर त्वचा रचनेत काही बदल होतात. अंतस्त्वचेतील संयोजी ऊतकावर परिणाम होतो. या ऊतकाचे एकूण प्रमाण घटून त्याची लवचिकता कमी होते. जंबुपार किरणांच्या सतत प्रभावामुळे हे बदल वाढतात म्हणून सतत उन्हात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या, खलाशांच्या त्वचेवर ते अधिक स्पष्ट दिसतात. निग्रो व मंगोलियन लोकांच्या त्वचेवर हे फरक फारसा परिणाम करीत नाहीत. कॉकेशियनांमध्ये हे परिणाम अधिक स्पष्ट दिसतात व त्यातही काळे केस असणाऱ्यांपेक्षा सोनेरी केस असणाऱ्यांमध्ये जास्त स्पष्ट दिसतात.
कोंडा : (दारुणा). शिरोवल्काच्या बाह्यत्वचेतील कोशिकांच्या विकृतीमुळे केराटिनीकरणात बिघाड उत्पन्न होऊन डोक्यातून कोंड्यासारखा पदार्थ पडणाऱ्या रोगास ‘कोंडा’ म्हणतात. कोशिकांचे उत्पादन दुप्पट किंवा तिप्पट वाढलेले असते. कोंड्याचे दोन प्रकार आढळतात. (१) कोरडा कोंडा : यामध्ये सूक्ष्म, पातळ, पांढऱ्या किंवा करड्या रंगाचे कोरडे खवले पडतात. केस बहुधा कोरडे व तेजहीन असतात. पुष्कळ वेळा खवले आपोआप गळून पडतात. अशा व्यक्तीची त्वचा व शिरोवल्क नेहमीपेक्षा अधिक कोरडे असते व त्यांना तेल लावणे आवडत नाही. (२) त्वक्–स्नेहिक कोंडा : या प्रकारात त्वचा व शिरोवल्क दोन्ही तेलकट असतात. शिरोवल्कावर जागजागी पिवळसर, जाड, तेलकट खपल्या तयार होतात. या खपल्यांच्या खालची जागा लाल किंवा फिक्कट असून कोरडी असते. केसांचे जुडगे बनतात व खाजही असते. पुढे केस गळून पडून ⇨ चाई होते. हा प्रकार चिरकारी स्वरूपाचा असतो.
बहुधा तारुण्यावस्थेत उद्भवणाऱ्या या विकृतीचे कारण निश्चित माहीत नाही. अस्वच्छता, अंतःस्रावी ग्रंथींची (ज्या वाहिनीविहीन असून ज्यांचा स्राव एकदम रक्तात मिसळतो अशा ग्रंथींची) अपक्रिया, ब गटातील जीवनसत्त्वांची न्यूनता, भावना प्रक्षोभ, त्वक्–स्नेह ग्रंथींच्या स्रावातील बदल ही कारणे असावीत.
त्वक्पूयता : ज्या रोगांमध्ये सूक्ष्मजंतू संसर्गामुळे त्वचेमध्ये पू तयार होतो त्या रोगांचा समावेश त्वक्पूयता या संज्ञेत केला जातो. भारतातील या रोगाचे प्रमाण खरूज या रोगानंतर दुसऱ्या क्रमांकाचे आहे. त्वचारोगात खरजेचे प्रमाण १९·५% आहे, तर त्वक्पूयतेचे प्रमाण १३% आहे. स्ट्रेप्टोकोकाय, स्टॅफिलोकोकाय किंवा मिश्र सूक्ष्मजंतू बहुधा कारणीभूत असतात. या रोगांपैकी ‘इसब’ व ‘काळपुळी’ या रोगांवर स्वतंत्र नोंदी आहेत.
पूयस्फोटिका : (एक्थायमा). या विकृतीत स्ट्रेप्टोकोकायजन्य व्रण तयार होतात. पाय व ढुंगण या भागांवर रोग आढळतो. बहुधा अंतरत्वचेवरही परिणाम झालेला असतो. सुरुवात पूयिकेने होते व ती फुटून व्रण तयार होतो. ३ ते ४ आठवड्यांत हे व्रण बरे होतात परंतु त्या जागी वण उरतात. बोरिक अम्ल किंवा प्रतिजैव औषधांपासून (टेरामायसीन, निओमायसीन वगैरे) बनविलेली मलमे बाह्योपचारात गुणकारी असतात. कधीकधी प्रतिजैव औषधांचा तोंडाने वा अंतःक्षेपणाने उपयोग करावा लागतो.
त्वक्–स्नेह ग्रंथींचे विकार : मुरूम : चेहरा, मान, पाठ व छाती या ठिकाणी लहान पीटिका त्वचेवर दिसणाऱ्या व बहुधा तारुण्यावस्थेच्या सुरुवातीस उद्भवणाऱ्या रोगाला मुरूम म्हणतात. त्वचारोगामध्ये नेहमी आढळणाऱ्या या रोगात त्वक्–स्नेह ग्रंथी प्रमाणापेक्षा अधिक स्रावतात. तारुण्यावस्थेच्या सुरुवातीसच त्यांची क्रियाशीलता वाढलेली असते व म्हणून या रोगास तारुण्य पीटिका असेही म्हणतात. केशपुटक व त्वक्–स्नेह ग्रंथीतील रंध्रामध्ये अतिकेराटिनीकरणामुळे अडथळा उत्पन्न होतो व नलिकेची पोकळी बंद होते. ज्या ठिकाणी केस सारखे वाढत असतात त्या ठिकाणी (उदा., शिरोवल्क) या प्रकारचा अडथळा उत्पन्न होत नाही कारण वाढणारा केस रंध्रातील अडथळा ढकलून काढतो.
मुरूम प्रथम चेहऱ्यावर नंतर मानेवर, छातीच्या वरच्या भागावर व पाठीवर दिसतो. गडद करड्या किंवा काळ्या रंगाची कोरडी त्वक्–वसा, उपकला कोशिका केशपुटक व त्वक्–स्नेह ग्रंथीच्या नलिकेत अडकून बसते. त्वचापृष्ठावर पांढरा उंचवटा दिसू लागतो. कालांतराने त्वक्–वसेतील सल्फेटाचे सल्फाइडात रूपांतर होते व पांढरा उंचवटा काळा पडतो. या उंचवट्यात प्रोप्रिओनिबॅक्टेरियम ॲक्निस नावाचे सूक्ष्मजंतू अडकल्यास क्षोभक वसाम्ले तयार करतात त्यामुळे शोथ उत्पन्न होतो. पीटिका, पूयिका इ. अवस्थांतून मुरूम जाऊन छोटे छोटे विद्रधी (गळवे) तयार होतात. विद्रधी फुटून छोटे छोटे खोलगट वण तयार होतात. काही उंचवटे नाहीसे होतात, तर काहींमध्ये लालसर पातळ द्रव तयार होऊन तो अधूनमधून पृष्ठाभागावर ओघळतो. मुरुमामध्ये या निरनिराळ्या अवस्था एकाच वेळी आढळतात. ऋतुकालपूर्व दिवसांत रोग बळावतो. सर्वसाधारणपणे विशीच्या सुमारास त्याचा जोर कमी होऊ लागतो. पुरुष व स्त्रियांत आढळणारा हा रोग पौरुषजन (अँड्रोजेन) हॉर्मोनांच्या (अंतःस्रावी ग्रंथींच्या उत्तेजक स्रावांच्या) त्वक्–स्नेह ग्रंथीवरील परिणामामुळे होत असावा. मात्र हा परिणाम कसा होतो हे अजून समजलेले नाही.
कृष्णरंजक अल्पता किंवा न्यूनता असलेले त्वचाविकार : त्वचेच्या बाह्यत्वचा भागात असलेल्या कृष्णरंजी कोशिका त्वचेतील कृष्णरंजकाचे उत्पादन करतात. हे उत्पादन म्हणजे एक जटिल जैव क्रियाच असते. तांबेयुक्त टायरोसीनेज या एंझाइमाचा (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थाचा) त्यात भाग असतो. जंबुपार किरण या एंझाइमाला चेतविण्यासाठी आवश्यक असतात. कृष्णरंजी कोशिकांच्या कार्यावर ⇨ पोष ग्रंथींच्या कृष्णरंजी कोशिका चेतक हॉर्मोनाचे व ⇨ तृतीय नेत्र पिंडाच्या मेलॅटोनीन स्रावचे नियंत्रण असते.
त्वचेची निगा : शरीराचे स्वास्थ्य प्रतिबिंबित करणारा आरसा म्हणजे त्वचा होय. अनेक सार्वदेहिक व अंतस्थ बिघाड या आरशात प्रतिबिंबित होतात. योग्य आहार, पुरेसा व्यायाम आणि विश्रांती यांची त्वचा निरोगी ठेवण्याकरिता गरज असते. यांशिवाय त्वचा स्वच्छ ठेवण्याची गरजही असते. कारण बाह्य परिसरातील धूळ, सूक्ष्मजंतू इ. हानिकारके तिच्या सतत सान्निध्यात येत असतात. त्वचेची उपांगे म्हणजे केस व नखे सतत वाढत असतात आणि त्यांची योग्य काळजी घेणे जरूरीचे असते. मोकळी थंड हवा व मंद सूर्यप्रकाश त्वचा उत्तेजित करतात आणि त्यामुळे ⇨ अवटू ग्रंथी, ⇨ अधिवृक्क ग्रंथी आणि अनुकंपी तंत्रिका तंत्र [⟶ तंत्रिका तंत्र] यांसही योग्य उत्तेजन मिळते. परिणामी त्वचेचे व सबंध शरीराचे स्वास्थ्य टिकविण्यास मदत होते. अंगावरील कपडे अगदी जरूरीपुरतेच असावेत. त्यांमध्ये व पायमोज्यामध्ये नायलॉनासारख्या सूक्ष्मग्राही धाग्यांपासून बनविलेले कपडे नसावेत. नायलॉनाचे कपडे उष्ण कटिबंधातील प्रदेशात अयोग्य असतात कारण घामाच्या शोषणात आणि बाष्पीभवनात ते अडथळा उत्पन्न करतात. याशिवाय त्या घामामध्ये रसायने विरघळून ती स्पर्शजन्य त्वचाशोथास कारणीभूत होतात. त्वचेशी संपर्क येणाऱ्या चष्म्याची चौकट, गळ्यातील कृत्रिम अलंकार, घड्याळाचे पट्टे, रबरी किंवा प्लॅस्टिक पादत्राणे इत्यादींच्या बाबतींतही योग्य ती काळजी घेणे जरूर असते. उष्ण प्रदेशीय देशांत उन्हाळ्यात स्वच्छ व थंड पाण्याने अंघोळ करणे जरूरीचे असते. हिवाळ्यात गरम पाण्याची अंघोळ हितावह असते. प्रथम गरम पाण्याने अंग धुतल्यानंतर लगेच गार पाण्याने अंघोळ करणे त्वचेला तसेच अंतस्त्यांना हितावह असते. मात्र दोन्ही पाण्यांतील उष्णतेचा फरक हळूहळू व सहन होईल तसा वाढवीत जावा. काही त्वचारोगांना अशी अंघोळ आरामदायक असते. अल्प क्षारधर्मी (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवणे देण्याचा गुणधर्म असणारा, अल्कलाइन) साबण वापरावा. तेलकट त्वचा असणाऱ्यांना जादा साबण लागतो. ज्यांची त्वचा कोरडी असते त्यांनी जादा वसायुक्त साबण वापरावा. डोके धुण्याच्या शांपूची निवड करताना सूक्ष्मग्राहकतेचा धोका लक्षात ठेवावा. अंगास व डोक्यास लावावयाचे तेल साधे असावे. औषधियुक्त किंवा सुगंधयुक्त तेले अनेक वेळा इसबास कारणीभूत होतात. उत्तर भारतातील कडक हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी लॅनोलीन किंवा दुधावरील साय नेहमी उघड्या असणाऱ्या त्वचा भागावर लावणे हितावह असते. दाढी करताना पुढील गोष्टींकडे लक्ष द्यावे. (१) त्वचा ताणून वस्तरा फिरवू नये. (२) पाते एकाच दिशेने फिरवावे, उलट सुलट फिरवू नये. (३) हत्यारे नेहमी स्वच्छ आणि निर्जंतुक असावीत. (४) सुरक्षा वस्तऱ्याचे पाते दोनपेक्षा अधिक वेळा वापरू नये. (५) साबण किंवा क्रीम वापरून त्वचेला मऊपणा आणल्यानंतरच दाढी करावी. (६) दाढी केल्यामुळे त्वक्–वसा निघून जाते म्हणून त्वचा मऊ पडेल असा पदार्थ लावावा. (७) अती क्षारधर्मी साबण किंवा क्रीम वापरू नये.
सलगर, द. चि. भालेराव, य. त्र्यं.
आयुर्वेदीय चिकित्सा : त्वचाविकारांत कुष्ठ, धावरे, इसब, तीळ, वांग इ. अनेक विकारांचा समावेश होतो. त्यावर त्या त्या रोगाचे उपचार करावेत. पण रेचक, वामक व रक्तस्राव या विशेष उपचारांनी शरीरातील दोष काढून टाकून तन्नाशक तेल, तूप, मलम (लेप) यांचा उपयोग करावा.
पटवर्धन, शुभदा अ.
पशूंतील त्वचा व त्वचारोग
पाळीव पशूंच्या त्वचेची रचना मानवी त्वचेप्रमाणेच असते व ती बाह्यत्वचा, अंतस्त्वचा व अधस्त्वचा या तीन थरांची बनलेली असते. खूर, शिंगे, नख्या, केस (लोकर), स्वेद ग्रंथी, स्नेह ग्रंथी, दुग्ध ग्रंथी आणि पिसे ही त्वचेची उपांगे आहेत. दुग्ध ग्रंथीची उत्पत्ती स्नेह ग्रंथीपासून झालेली आहे. मनुष्यातील त्वचेप्रमाणे पशूमधील त्वचेचे कार्य शरीरसंरक्षण, शरीराच्या तापमानाचे नियंत्रण, चयापचयामुळे उत्पन्न होणाऱ्या निरुपयोगी द्रव्याचे उत्सर्जन व स्पर्शज्ञान करून देणे हेच आहे. धापा न टाकणाऱ्या घोड्यासारख्या प्राण्यांमध्ये तापमानाच्या नियंत्रणाचे महत्त्वाचे कार्य त्वचेमुळे होत असते. हे कार्य त्वचेतील स्वेद ग्रंथींमुळे येणाऱ्या घामाच्या बाष्पीभवनामुळे होत असते. कुत्रा व इतर धापा टाकणारे प्राणी काही प्रमाणात श्वासोच्छ्वासावाटे उष्णता शरीराबाहेर टाकण्याचे काम करीत असतात. हत्ती धापा टाकीत नाही व त्याच्या त्वचेमध्ये स्वेद ग्रंथीही आढळून येत नाहीत. नैसर्गिक अवस्थेमध्ये हत्ती सोंडेमध्ये पाणी घेऊन ते सर्वांगावर उडवून (त्याचे बाष्पीभवन होऊन) तापनियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो. पाणी उपलब्ध नसेल तेव्हा हेच कार्य सोंडेमध्ये लाळ गोळा करून ती सर्वांगावर उडवून करतो. उष्ण कटिबंधातील गायीगुरांना असणारी कांबळ (पोळी) व वशिंड यांची योजना जास्त प्रमाणात घाम येण्यासाठी व पर्यायाने तापमान कमी करण्यासाठी त्वचेचे क्षेत्रफळ वाढविण्याची साधने म्हणून असावी, असे मानण्यात येत असे. प्रयोगान्ती ते तितकेसे बरोबर नाही, असे आता दिसून आले आहे. निरनिराळ्या पशूंच्या त्वचेची जाडी कमीअधिक आहेच पण एकाच जातीच्या, निरनिराळ्या हवामानांमध्ये राहणाऱ्या पशूंच्या त्वचेच्या जाडीमध्येही फरक आढळून येतो. त्वचेची जाडी व रंग यांवर शरीरातून उष्णता बाहेर टाकण्याचे प्रमाण अवलंबून आहे. त्वचेच्या लगत असणाऱ्या व काही प्रमाणात त्वचेच्या सर्वांत खालच्या स्तरात पदरासारख्या पसरलेल्या स्नायूंच्या आकुंचन–प्रसरणामुळे–थरथरण्यामुळे–पशूंना अंगावरील माश्या व इतर नको असलेले पदार्थ झटकून टाकणे शक्य होते. मात्र हे प्रतिक्षेपी क्रियेमुळे होते कारण हे स्नायू अनैच्छिक आहेत. त्वचेतील उपकला स्तरातील कोशिका सारख्या झडत असतात व घामामुळे त्यांचा बाह्यत्वचेवर लेप बसलेला दिसून येतो. घोड्यामध्ये स्वेद ग्रंथी बऱ्याच असल्यामुळे त्याला पुष्कळ घाम येतो व त्यामुळे खरारा न केलेल्या घोड्याच्या अंगावर असा लेप दिसून येतो. घोड्याच्या घामामध्ये लसीका प्रथिने, यूरिया, यूरिक अम्ल, अमोनिया, फॉस्फेटे यांचे प्रमाण अधिक असते. याउलट गायीगुरांतील घाम म्हणजे मुख्यत्वे पाणीच असते. याच कारणासाठी त्वचेवाटे तापनियंत्रणाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी घोड्याला खरारा करणे आवश्यक असते. त्वचेमध्ये असणाऱ्या कृष्णरंजी कोशिका कृष्णरंजक द्रव्य उत्पादन करतात व त्यामुळे त्वचेला रंग येतो. पोष ग्रंथीच्या टायरोसीन या हॉर्मोनाच्या नियंत्रणाखाली रंजकद्रव्याचे उत्पादन होत असते. या हॉर्मोनामध्ये तांब्याचे प्रमाण बरेच असते, त्यामुळे त्वचेचा रंग कायम राहण्यासाठी पशुखाद्यामध्ये तांबे असणे आवश्यक आहे.
त्वचेचे रोग : त्वचेचे काही विकार त्वचेपुरतेच मर्यादित असतात, तर काही दुसऱ्या एखाद्या विशिष्ट रोगाचा लक्षणात्मक आविष्कार असू शकतात. देवी या रोगात येणारे फोड दुसऱ्या वर्गात मोडतात, तर इसब हे पहिल्या वर्गातील रोगाचे उदाहरण आहे. त्वचा रंगहीन होणे, खाज सुटणे, केस गळणे, स्नेह ग्रंथींचा किंवा स्वेद ग्रंथींचा अतिरिक्त स्राव, बाह्यत्वचेची व अंतस्त्वचेची सूज ही सर्वसामान्य त्वचारोगांची लक्षणे दिसून येतात. पशूमध्ये त्वचेच्या जन्मजात विकृती फारशा दिसून येत नसल्या, तरी आघातजन्य त्वचारोगांचे प्रमाण अधिक आहे. वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या पशूंच्या त्वचेला खोगीर व इतर सरंजामाच्या घर्षणामुळे बाह्यत्वचेला वारंवार सूज येऊन तेथील त्वचा जाड होते. कधीकधी त्या ठिकाणी लहानमोठी त्वचाअर्बुदे तयार होतात. त्वचेच्या तीव्र अगर चिरकारी शोथामुळे ज्या विकृती पशूंमध्ये आढळतात त्यांत सूक्ष्मजंतू, कवक, व्हायरस व कृमिजन्य त्वचारोग अधिक प्रमाणात आढळून येतात. अधिहर्षतेमुळे त्वचेवर उठणारे पुरळ, पित्त उठणे इ. प्रकारच्या त्वचेच्या विकारांचा पशूंच्या बाबतीत नीटसा उलगडा झालेला नाही. तथापि काही पदार्थांच्या संपर्कामुळे घोड्यामध्ये एक प्रकारचा त्वचाशोथ आढळून आला आहे. सर्व जातींच्या पशूंना कवकजन्य गजकर्ण हा रोग होत असतो. महाराष्ट्रात म्हशींच्या वासरांमध्ये हा साथीच्या स्वरूपात आढळून आला आहे. डर्मोफिलस काँगोलन्स व ड. डर्मॅटोनोमस यांमुळे घोडे, मेंढ्या व गायीगुरे यांमध्ये त्वचाशोथ होतो, तर स्ट्रेप्टोकॉकस व स्टॅफिलोकॉकस ऑरियस यांमुळे डुकरामध्ये हा रोग झाल्याचे आढळून आले आहे. त्वचेला लाली येऊन तो भाग हाताला गरम लागणे, सूजलेल्या भागावर लसीका झिरपणे किंवा त्वचेखाली द्रव जमून त्वचेचा शोफ (द्रवयुक्त सूज) होणे ही त्वचाशोथाची सर्वसामान्य लक्षणे असतात. शोथ वाढत गेल्यास कधीकधी त्या भागातील कोशिका मृत होतात व अशा वेळी तयार झालेल्या विषामुळे अवसाद (शॉक), विषरक्तता (सूक्ष्मजंतुजन्य विषांचे रक्तात शोषण झाल्यामुळे निर्माण होणारी अवस्था) इ. सार्वदेहिक विकारलक्षणे दिसून येतात.
इसब, खरूज, आगपैण, दारुणा हे मनुष्यमात्रात आढळून येणारे त्वचारोग पशूंमध्येही आढळून येतात व त्यांमध्ये दिसून येणारी लक्षणे ही मनुष्यातील लक्षणांशी मिळतीजुळती असतात. पशूंमध्ये होणाऱ्या किरणकवक रोग, गांधी उठणे, धावरे व चामखीळ या त्वचारोगांची माहिती त्या त्या स्वतंत्र नोंदीमध्ये दिलेली आहे. यांशिवाय पशूंमधील काही महत्त्वाच्या त्वचारोगांसंबंधीची माहिती त्या त्या पशूंच्या नावांच्या नोंदींमध्ये पहावी.
संदर्भ : 1. Behl, P. N. Practice of Dermatology, Bombay, 1962.
2. Blood, D. C. Henderson, J. A. Veterinary Medicine, London, 1973.
3. Borradiale, L. A. Potts, F. A. The Invertebrata, Cambridge, 1961.
4. Mackemackenna, R. M. B. Cohen, E. L. Dermatology, London, 1964.
5. Scott, R. B., Ed. Price’s Textbook of the Practice of Medicine, London, 1973.
6. Vakil, R. V. Ed. Textbook of Medicine, Bombay, 1969.
7. Walter, H. E. Sayles, L. P., Biology of the Vertebrates, New York, 1957.
दीक्षित, श्री. गं.
“