तुर्कू : (स्वीडिश–ओबू). फिनलंडच्या नैर्ऋत्येकडील तुर्कू–पोरी प्रांताची राजधानी. लोकसंख्या १,६३,१६२ (१९७४). हे हेल्सिंकीच्या वायव्येस १६० किमी. आउरायोकी नदीच्या मुखाशी वसलेले, बारमहा खुले सागरी बंदर असून देशातील सर्वांत जुने गाव व व्यापार केंद्र आहे. १८१२ पर्यंत स्वीडिश व नंतर रशियन अंमलांखाली ते देशाची राजधानी होते. बाराव्या शतकात इंग्लंडमधून या बंदरातूनच फिनलंडवर आक्रमण झाले आणि त्यानंतर येथे धर्मपीठ व किल्ला स्थापन करण्यात आला. १६४० मध्ये येथे स्थापन झालेले राष्ट्रीय विद्यापीठ १८२७ मध्ये शहराला लागलेल्या प्रचंड आगीत जळाल्याने ते हेल्सिंकीस हलविण्यात आले. त्यानंतर १९१८ मध्ये स्वीडिश व १९२२ मध्ये फिनिश विद्यापीठे येथे स्थापण्यात आली. येथे स्वीडिश व फिनिश दोन्ही भाषा चालतात. हे शहर लोहमार्ग व रस्ते यांचे केंद्र आहे. शिवाय आर्तुकाइनेन येथे विमानतळ आहे. शहरात जहाजबांधणी हा प्रमुख व्यवसाय असून पोलाद, साखर, शुद्धीकरण, यंत्रोत्पादन, कापड व लाकूड गिरण्या, औषधे, अन्नप्रक्रिया, चिनी मातीची भांडी, तंबाखू–प्रक्रिया इ. उद्योगही महत्त्वाचे आहेत. हे शहर तेराव्या शतकातील किल्ल्यांचे अवशेष, तुर्कू कॅथीड्रल (१२९०), वस्तुसंग्रहालये, कलावीथी व स्वीडिश रंगभूमी इत्यादींमुळे पर्यटकांचे आकर्षण आहे.
लिमये, दि. ह.
“